जावली (प्रतिनिधी): श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त उद्या जावली व मिरढे गावातील ग्रामस्थांच्या वतीने वारकरी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमासाठी दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सेवा कार्याची जबाबदारी स्वीकारली आहे. वारकरी भाविकांना प्रेमाने व भक्तिभावाने महाप्रसाद देण्यात येणार असून, यासाठी आवश्यक सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
जावली व मिरढे ग्रामस्थांनी वारकऱ्यांच्या सेवेसाठी भाकरी, अन्नधान्य तसेच इतर आवश्यक साहित्याचे योगदान दिले असून, स्वयंसेवकही सेवेसाठी सज्ज झाले आहेत. महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील वारकरी संप्रदायाची सेवा हीच ईश्वरसेवा मानत हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
तरी परिसरातील नागरिकांनी या सेवाकार्यात सहभागी होऊन वारकरी भाविकांच्या सेवेत आपले योगदान द्यावे, असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.