ताज्या घडामोडी

पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर २३ व २४ जून रोजी दर्शनासाठी बंद

(पंढरपूर /प्रतिनिधी ): श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर यांच्या वतीने भाविक, वारकरी व नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI), राज्य पुरातत्त्व विभाग व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार दिनांक २२ ते २४ जून २०२६ या कालावधीत श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातांच्या मूर्तींचे जतन व संवर्धन (Conservation) कार्य करण्यात येणार आहे.

या कामामुळे २३ व २४ जून २०२६ रोजी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद राहणार असून, मुखदर्शन व पदस्पर्श दर्शनही पूर्णपणे बंद राहील. या कालावधीत मंदिरामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रत्यक्ष दर्शन उपलब्ध राहणार नसल्याचे मंदिर समितीने स्पष्ट केले आहे.

मंदिर समितीच्या माहितीनुसार, श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या मूर्तींवर यापूर्वी १९८८, २००१, २०१२ आणि २०२० मध्ये संवर्धनाचे काम करण्यात आले होते. गेल्या काही वर्षांत मूर्तींच्या काही भागांमध्ये नैसर्गिक झीज झाल्याचे निदर्शनास आल्याने दुरुस्ती तसेच मूर्तींच्या आयुष्यमानात वाढ करण्यासाठी संरक्षक आवरण (Protective Coating) देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

संपूर्ण प्रक्रिया भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, छत्रपती संभाजीनगर येथील तज्ज्ञ आणि राज्य पुरातत्त्व विभाग, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.

मंदिर समितीने सर्व वारकरी, भाविक व नागरिकांनी याची नोंद घेऊन प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

– श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर

Related Articles

Back to top button
Don`t copy text!