ताज्या घडामोडी

स्व.सौ. वेणूताई यशवंतराव चव्हाण यांचा जन्मशताब्दी सांगता समारंभ श्रीराम संकुलामध्ये उत्साहात संपन्न

फलटण प्रतिनिधी – श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे आज सोमवार, दिनांक: २ फेब्रुवारी २०२६ रोजी स्वर्गीय सौ. वेणूताई यशवंतराव चव्हाण यांचा जन्मशताब्दी सोहळा संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती सविता सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), उपाध्यक्ष मा.श्री. सी. एल. पवार श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव मा.डॉ.श्री. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), प्रमुख पाहुणे महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा फलटण अध्यक्ष मा.श्री. रविंद्र बेडकीहाळ, ज्येष्ठ पत्रकार श्री.अरविंद मेहता, ‘सह्याद्रीची सावली’ पुस्तकाचे लेखक डॉ.श्री. अमर शेंड, नियामक मंडळाचे सदस्य श्री. महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) सौ. ज्योती सचिन सूर्यवंशी (बेडके), श्री. शिवाजीराव बेडके, श्री.प्रकाश तारळकर, श्री.मंगेश दोशी, श्री. दीपक मेहता, श्री. हनुमंतराव निकम, श्री.भरत बेडके व  श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाखांचे प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने व प्रतिमापूजनाने करण्यात आली. यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री कै.ना.अजितदादा पवार व त्यांचे अंगरक्षक श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या सौ. वेणूताई चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, तरडगावचे माजी विद्यार्थी कै. विदीप जाधव यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाले. श्रीराम संकुलाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यानंतर पाहुण्यांचा स्वागत समारंभ संपन्न झाला व ज्युनिअर कॉलेज कला शाखेच्या विद्यार्थिनींनी तयार केलेल्या  वेणूनाद या हस्तलिखिताचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

स्व.सौ वेणूताई चव्हाण यांच्या जन्मशताब्दी निमित्त विद्यालयामध्ये संस्थास्तरीय निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, हे आयोजन प्राथमिक गट (इ.३ री ते इ.५ वी) उच्च प्राथमिक गट (इ.६ वी ते इ.८ वी) माध्यमिक व उच्च माध्यमिक गट (इ.९ वी ते इ.१२ वी) व महाविद्यालयीन गट या चार गटांमध्ये करण्यात आले. या चारही गटातून प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक, सन्मानचिन्ह, सह्याद्रीची सावली या पुस्तकाची प्रत व गुलाबपुष्प देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला.

गुणगौरव कार्यक्रमानंतर वक्तृत्व स्पर्धेत चारही गटांमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थिनींच्या मनोगतानंतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये सर्वप्रथम श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव मा.डॉ.श्री. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांनी सौ. वेणूताई चव्हाण यांच्या आदर्श जीवनाबद्दल माहिती सांगून फलटणचे सूर्यवंशी बेडके कुटुंबीय व सौ. वेणूताई चव्हाण यांच्याबरोबर असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांना उजाळा दिला. याचबरोबर आदरणीय भैय्यासाहेबांनी निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेत यश मिळविलेल्या व सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे लेखन संस्थेच्या फेसबुक पेजवर दररोज प्रकाशित करण्याचा मानस व्यक्त केला.

ज्येष्ठ पत्रकार श्री. अरविंद मेहता यांनी मा.यशवंतराव चव्हाण व सौ वेणूताई चव्हाण यांचा आदर्श राजकीय प्रवास, समाजाप्रती असलेले प्रेम, त्यांनी जपलेली मूल्ये या सर्व गोष्टींना उजाळा देण्याचे काम श्रीराम एज्युकेशन सोसायटी अविरत करत आहे यासाठी संस्थेबद्दल गौरवोद्गार काढले.

महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा फलटण अध्यक्ष श्री.रविंद्र बेडकीहाळ सर यांनी सौ. वेणुताईंच्या जीवनाचे विविध पैलू उलगडून आजच्या मुलींनी त्यांच्याकडून काय आदर्श घ्यावा यावर प्रकाशझोत टाकला. याशिवाय सौ. वेणूताईं चव्हाण यांच्यावर विद्यार्थिनी कु.आरती कानडे (तरडगाव) हिने केलेले भाषण, कु. सोनाली गावडे (सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण) हिने रचलेली कविता यांचे तोंडभरून कौतुक केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या उपशिक्षिका सौ. सुजाता जाधव, प्रास्ताविक प्रा.सौ. शितल घनवट, बक्षीस वितरणाचे वाचन प्रा.सौ. रूपाली घोरपडे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार उपशिक्षिका सौ.मंदाकिनी सोनवणे यांनी मानले. वरील कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रशालेच्या प्राचार्या सौ. विजया सुरवसे, पर्यवेक्षिका सौ.आरती भट्टड, जूनियर कॉलेजचे प्रा. श्री. पंकज बोबडे यांनी मार्गदर्शन केले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!