(फलटण /प्रतिनिधी) – शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्या उच्चशिक्षित मुलगी सुषमा व व उच्चशिक्षित मुलगा शुभम यांचा विवाह सोहळा कोर्टामध्ये अगदी साध्या पद्धतीने संपन्न झाला.
यावर प्रतिक्रिया देताना माजी आमदार दत्तात्रय सावंत म्हणाले की, या दोघांच्या निर्णयामुळे आज माझे मन आनंदाने आणि अभिमानाने भरून आले आहे. दोघेही उच्चशिक्षित आहेत, पण त्यांचे विचार त्याहूनही प्रगल्भ आहेत. कोणत्याही थाटामाटाला फाटा देत, अत्यंत साधेपणाने ‘कोर्ट मॅरेज’ करण्याचा निर्णय या दोघांनी घेतला. पण केवळ साधेपणाने लग्न करून ते थांबले नाहीत तर लग्नातील अनावश्यक खर्चाला फाटा देऊन जो पैसा वाचला, तो त्यांनी माझ्या विनाअनुदानित शिक्षक बांधवांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे.वर्षानुवर्षे विनावेतन किंवा तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या माझ्या शिक्षक सहकाऱ्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी त्यांनी दिलेला हा हात खरोखरच कौतुकास्पद आहे.
यामुळे ”संस्कारांची श्रीमंती काय असते, हे आज माझ्या मुलीने आणि जावयाने कृतीतून दाखवून दिले आहे.”सावंत पुढे म्हणतात की, सुषमा, तुझा बाप म्हणून मला तुझा सार्थ अभिमान आहे ! तुमच्या या नव्या प्रवासाची सुरुवात इतक्या पवित्र कार्याने होत आहे, याचा मला खूप आनंद आहे.तुम्हा दोघांनाही पुढील सुखी वैवाहिक जीवनासाठी मनापासून शुभेच्छा !