ग्रामीण भागातील व्याख्यानमाला ही समाजपरिवर्तनाची चळवळ ; दुधेबावी प्रतिष्ठानचे कार्य प्रेरणादायी.! उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल पानसरे यांचे प्रतिपादन..!
(फलटण | प्रतिनिधी)ग्रामीण भागात सातत्याने व्याख्यानमाला आयोजित करून समाजप्रबोधनाची परंपरा जपणे ही अत्यंत उल्लेखनीय बाब आहे. दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबविण्यात येणारे विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहेत. अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील युवकांना स्पर्धा परीक्षांसह विविध क्षेत्रांत यश मिळविण्याची प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल पानसरे यांनी केले.
दुधेबावी (ता. फलटण) येथील ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘दुधेबावी फेस्टिव्हल’ अंतर्गत संत गाडगेबाबा व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुंडल वन प्रबोधिनी, सांगलीचे प्रशासक व व्यवस्थापक हरिश्चंद्र वाघमोडे होते.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष हणमंतराव सोनवलकर, पंचायत समिती सदस्य विजयाताई सोनवलकर, ग्रामपंचायत सरपंच भावनाताई सोनवलकर, ज्येष्ठ पत्रकार प्रा. पोपटराव मिंड, सामाजिक कार्यकर्ते संपतराव नाळे, सोसायटीचे चेअरमन सचिन सोनवलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी यूपीएससी परीक्षेत यश संपादन केलेले सोहम नामदेव शेंडे, मंडल कृषी अधिकारीपदी निवड झालेल्या प्राजक्ता अनिल नाळे तसेच राज्यकर निरीक्षकपदी निवड झालेल्या सुप्रिया संपत आडके यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
न्यायमूर्ती अनिल पानसरे पुढे म्हणाले की, जीवनात जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाची जोड असेल तर यश मिळविणे कठीण नाही. द्वेष, मत्सर आणि तिरस्काराला दूर ठेवून सकारात्मक विचारांच्या बळावर प्रत्येकाने आपली प्रगती साधली पाहिजे. दुधेबावी येथे गेल्या २६ वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या संत गाडगेबाबा व्याख्यानमालेमुळे गावातील युवकांना एमपीएससी आणि यूपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांची प्रेरणा मिळत आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थीही आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर यशाचे शिखर गाठू शकतात, हे अनेक उदाहरणांतून सिद्ध होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय मनोगतात हरिश्चंद्र वाघमोडे म्हणाले की, प्रबोधनाच्या माध्यमातून सकारात्मक समाजपरिवर्तन घडवून आणता येते. आर्थिक प्रगतीइतकीच वैचारिक प्रगतीही महत्त्वाची आहे. धनसंपत्तीपेक्षा ज्ञानसंपत्ती श्रेष्ठ असून, समाजाची वैचारिक जडणघडण करण्यासाठी संत गाडगेबाबा व्याख्यानमालेसारखे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत.
हणमंतराव सोनवलकर यांनी दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, प्रतिष्ठानच्या माध्यमातून युवकांना सातत्याने योग्य दिशा आणि प्रेरणा दिली जात आहे. गावातील युवक अधिकारी पदांपर्यंत पोहोचण्यामागे प्रतिष्ठानचा सिंहाचा वाटा आहे.
यूपीएससी परीक्षेत यश मिळविलेले सोहम शेंडे यांनी आपल्या मनोगतात सातत्यपूर्ण अध्ययन, प्रचंड इच्छाशक्ती आणि सकारात्मक दृष्टिकोनाच्या जोरावर कोणतेही ध्येय साध्य करता येते, असा विश्वास व्यक्त केला.
उद्योजक राजेंद्र नाळे यांनी ग्रामीण भागात उद्योग उभारताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला; मात्र जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आम्ही बंधूंनी ग्रामीण भागात उद्योग उभा केला. या माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देता आला, याचे मनस्वी समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे स्वागत प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत सोनवलकर यांनी केले. प्रास्ताविक व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष डॉ. सागर कराडे यांनी केले. सूत्रसंचालन उपाध्यक्ष विजयकुमार नाळे व खजिनदार डॉ. युवराज एकळ यांनी केले, तर आभार सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष सचिन सोनवलकर यांनी मानले.
यावेळी फलटण तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष धनंजय सोनवलकर, माजी उपसरपंच अविनाश चांगण, सर्जेराव सोनवलकर, उद्योजक राजेंद्र नाळे, किरण नाळे, वृक्षमित्र सचिन सोनवलकर, संदीप ठोंबरे, सौरभ एकळ यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.