जय भारत, यश, विश्वशांतीसह मुंबई पोस्टलचीही आगेकूच महिला, कुमार आणि व्यावसायिक गटांत चुरशीचे सामने; अमर हिंद, जय भारत, यश, विश्वशांती आणि मुंबई पोस्टलचे दमदार विजय
(मुंबई/ प्रतिनिधी ): शिवनेरी सेवा मंडळाच्या वतीने आयोजित शिवनेरी कबड्डी स्पर्धेत महिला गटात अमर हिंद मंडळाने, तर कुमार गटात जय भारत सेवा मंडळ आणि यश क्रीडा मंडळाने दमदार विजय नोंदवले. महिला गटात सेजल कांबळेच्या आक्रमक चढायांनी अमर हिंदच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. विश्वशांती क्रीडा मंडळानेही विजय मिळवत आगेकूच केली. व्यावसायिक गटात बेस्ट, पी. डी. हिंदुजा हॉस्पिटल आणि मुंबई पोस्टल यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत स्पर्धेतील रंगत वाढवली.
सेजलच्या चढाया, अमर हिंदचा १५ गुणांनी विजय.!
महिला गटात अमर हिंद मंडळाने भारतमाता महिला संघाचा ४५-३० असा १५ गुणांनी पराभव केला. अमर हिंदकडून सेजल कांबळेने चढाईत, तर सलोनी नाक्तीने पकडीत प्रभावी कामगिरी केली. भारतमाताकडून पायल कांचनने चढाईत, तर दृष्टी कुंभारने पकडीत चांगला प्रतिकार केला. मात्र, अमर हिंदने संपूर्ण सामन्यात वर्चस्व राखत विजयावर शिक्कामोर्तब केले.
जय भारतची आकांक्षावर मात ; यशची पंचगंगावर सरशी
कुमार गटात जय भारत सेवा मंडळाने आकांक्षा क्रीडा मंडळाचा ३६-२४ असा १२ गुणांनी पराभव केला. जय भारतकडून आर्यन बावडेकरने चढाईत, तर तन्मय बावकरने पकडीत प्रभावी खेळ केला. आकांक्षाकडून ओमकार पवारने चढाईत, तर स्वप्निल पाटीलने पकडीत योगदान दिले.
याच गटात यश क्रीडा मंडळाने पंचगंगा सेवा मंडळावर ३५-३१ अशी चार गुणांनी मात केली. यशकडून केतन चौघुलेने चढाईत, तर विवेक पवारने पकडीत चमक दाखवली. पंचगंगाकडून शिवांश मगर आणि सक्षम सूर्यवंशी यांनी प्रतिकार केला; मात्र यशने चार गुणांची आघाडी कायम राखत विजय मिळवला.
विश्वशांतीची गोल्फादेवीवर सात गुणांनी मात
महिला गटातील दुसऱ्या सामन्यात विश्वशांती क्रीडा मंडळाने गोल्फादेवी प्रतिष्ठानचा ३२-२५ असा सात गुणांनी पराभव केला. विश्वशांतीकडून रोझी डिसोझाने चढाईत, तर शितल मेरांडेने पकडीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. गोल्फादेवी प्रतिष्ठानकडून रचना म्हात्रेने चढाईत, तर जागृती घोसाळकरने पकडीत चांगला खेळ केला.
बेस्टची टीबीएमवर मात; हिंदुजाचा आरबीएससीला धक्का
व्यावसायिक गटात बेस्ट संघाने टीबीएमवर ३६-३१ अशी पाच गुणांनी मात केली. बेस्टकडून सुरेश पाटीलने चढाईत, तर राहुल परबने पकडीत प्रभावी कामगिरी केली. टीबीएमकडून पारस शिर्केने चढाईत, तर विकास जोगलेने पकडीत प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
दुसऱ्या सामन्यात पी. डी. हिंदुजा हॉस्पिटलने आरबीएससीचा ४५-३७ असा आठ गुणांनी पराभव केला. हिंदुजाकडून जतिन विंदेने चढाईत, तर संतोष वारकरीने पकडीत दमदार खेळ केला. आरबीएससीकडून सोहम मोरे आणि लौकिक कदम यांनी संघाच्या कामगिरीत योगदान दिले.
मुंबई पोस्टलचा माझगाव डॉकवर मोठा विजय
व्यावसायिक गटातील आणखी एका सामन्यात मुंबई पोस्टलने माझगाव डॉकचा २५-१० असा १५ गुणांनी पराभव केला. मुंबई पोस्टलकडून अभिषेक भोजनेने चढाईत, तर ओमकार मोरेने पकडीत प्रभावी कामगिरी केली. माझगाव डॉककडून भावेश भोईरने चढाईत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. कुमार, महिला आणि व्यावसायिक गटांतील या निकालांमुळे शिवनेरी कबड्डी महोत्सवातील चुरस आणखी वाढली.
संक्षिप्त धावफलक
व्यावसायिक गट : बेस्ट (३६) विजयी विरुद्ध टीबीएम (३१); पी. डी. हिंदुजा हॉस्पिटल (४५) विजयी विरुद्ध आरबीएससी (३७); मुंबई पोस्टल (२५) विजयी विरुद्ध माझगाव डॉक (१०).
महिला गट : विश्वशांती क्रीडा मंडळ (३२) विजयी विरुद्ध गोल्फादेवी प्रतिष्ठान (२५); अमर हिंद मंडळ (४५) विजयी विरुद्ध भारतमाता महिला संघ (३०).
कुमार गट : यश क्रीडा मंडळ (३५) विजयी विरुद्ध पंचगंगा सेवा मंडळ (३१); जय भारत सेवा मंडळ (३६) विजयी विरुद्ध आकांक्षा क्रीडा मंडळ (२४).