(फलटण /प्रतिनिधी) : फलटणचे माजी उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी आणि कार्यक्षम प्रशासकीय अधिकारी म्हणून ओळख निर्माण केलेले सचिन ढोले-पाटील यांची रायगडच्या अपर जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यातील ८० उपजिल्हाधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी पदावर नियुक्त्या दिल्या असून, त्यामध्ये सचिन ढोले-पाटील यांचा समावेश आहे. यापूर्वी दि. २३ एप्रिल २०२५ रोजी त्यांची पदोन्नतीने मुंबई उपनगरच्या अपर जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली होती. आता रायगडसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्याच्या अपर जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल फलटणसह विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
फलटणमध्ये कार्यक्षम अधिकारी म्हणून ठसा
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त म्हणून जबाबदारी सांभाळल्यानंतर सचिन ढोले-पाटील यांची फलटण उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी म्हणून बदली झाली होती. फलटणमध्ये कार्यरत असताना त्यांनी सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, गरीब, वंचित आणि दिव्यांगांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले.
त्यांचे कार्यालय सर्वसामान्य नागरिकांसाठी कायम खुले असल्याची भावना फलटणकरांमध्ये निर्माण झाली होती. आपल्या समस्या मांडण्यासाठी कोणाची शिफारस किंवा मध्यस्थीची गरज भासू नये, अशी प्रशासनाची कार्यपद्धती त्यांनी निर्माण केली.
विशेष म्हणजे सकाळी लवकर कार्यालयात उपस्थित राहून रात्री उशिरापर्यंत नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी ते कार्यरत असायचे. त्यांच्या कार्यकाळात अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यास मदत झाली. त्यांच्या कामकाजामुळे फलटणच्या प्रशासकीय यंत्रणेत कार्यक्षमतेचा नवा आदर्श निर्माण झाल्याची भावना नागरिकांमध्ये होती.
लोकसभा, विधानसभा निवडणुकाही पारदर्शकपणे
सचिन ढोले-पाटील यांच्या कार्यकाळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पारदर्शक व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडल्या. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत जिल्हा प्रशासनाकडून त्यांचा विशेष गौरवही करण्यात आला होता.
यापूर्वी त्यांनी तत्कालीन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. विविध प्रशासकीय जबाबदाऱ्यांचा अनुभव आणि कार्यक्षम कार्यपद्धती यामुळे त्यांची कारकीर्द उल्लेखनीय ठरली आहे.
रायगडच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा
सचिन ढोले-पाटील यांच्या प्रशासकीय अनुभवाला आणि कार्यक्षम नेतृत्वाला रायगडसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्याची नवी जबाबदारी मिळाली आहे. त्यामुळे रायगडच्या महसूल प्रशासनाला अधिक गतिमानता मिळण्यासोबतच जिल्ह्याच्या विकासकामांना नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
रायगड जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, हिराकोट तलावाजवळ, अलिबाग येथे असून महसूल प्रशासनातील हे अत्यंत महत्त्वाचे पद मानले जाते.