(कोळकी/प्रतिनिधी ): विडणी येथे नाभिक समाजाच्या वतीने पारंपरिक पद्धतीने नागपंचमी सण उत्साहात साजरा करण्यात आला. सालाबादप्रमाणे यंदाही नागपंचमी सणाचा मान नाभिक समाजातील कर्वे व साळुंखे घराण्याला मिळाला.
नागपंचमीच्या तयारीसाठी सुमारे पंधरा दिवस आधीपासून नागदेवतेची मूर्ती तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. शेतातील माती गोळा करून ती भिजवून चिखलाचा गोळा तयार करण्यात आला. त्यातून नागाचा आकार देऊन त्यावर खपली, करडी डाळ, ज्वारीच्या लाह्या आदी कडधान्ये चिकटवून नक्षीकाम करण्यात आले. नाभिक समाजातील सर्वजण एकत्र येऊन आकर्षक नागदेवतेची मूर्ती तयार करतात.
नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची विधिवत पूजा करून वाजत-गाजत गावचे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात मूर्ती आणण्यात आली. यावेळी गावातील भाविकांनी भक्तिभावाने नागदेवतेचे दर्शन घेतले.सायंकाळी महिला मोठ्या संख्येने मंदिरात सहभागी झाल्या. नागदेवतेची तसेच सासर-माहेरची पारंपरिक गाणी म्हणत महिलांनी आपल्या मनातील भावना सखी-मैत्रिणींसोबत हितगुजाच्या माध्यमातून व्यक्त केल्या. यावेळी झिम्मा, फुगडी, पिंगा, हुंतुतू आणि झोका यांसारखे पारंपरिक खेळही मोठ्या उत्साहात खेळण्यात आले.
सायंकाळी सात वाजता मंदिरातून नागदेवतेची मूर्ती वाजत-गाजत मिरवणुकीने गावानजीक असलेल्या नीरा उजवा कालव्यात नेण्यात आली. तेथे विधिवत पूजा व आरती करून नागदेवतेच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. यावेळी चिरमुरे व शेंगदाणे एकत्र करून भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
या पारंपरिक सोहळ्यामुळे विडणी गावात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. नाभिक समाजाने जपलेली ही परंपरा नव्या पिढीला आपल्या संस्कृतीशी जोडणारी ठरली.