(फलटण /प्रतिनिधी): माणुसकी अजूनही जिवंत आहे.याची प्रचिती देणारी एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे.गुरुवार, ६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री मा. श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर अर्थात बाळराजे हे पिराचीवाडीहून ताथवड्याकडे जात असताना त्यांच्या गाडीसमोर अचानक एका गायीचे वासरू आले.
काही क्षण ते वासरू गाडीसमोरून बाजूला जात नव्हते. अखेर एका बाजूने गाडी पुढे निघाली. मात्र, त्या निराधार वासराकडे पाहून बाळराजेंच्या मनात एक विचार आला…”या माळरानावर हे वासरू जास्त काळ जिवंत राहणार नाही… याला सुरक्षित ठिकाणी नेले पाहिजे.”हा विचार मनात येताच त्यांनी गाडी पुन्हा माघारी वळवली.
मात्र, घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांना जे दृश्य दिसले, ते मनाला समाधान आणि आनंद देणारे होते.
ताथवडा गावातील श्री. सत्यवान शिंदे, जे HDFC बँकेत कार्यरत आहेत, आणि श्री. ऋषिकेश शिंदे हे दोघे त्या वासराला पाणी, दूध आणि खाद्य देत होते.
विशेष म्हणजे, ही सेवा एखाद्या दिवसापुरती नव्हती.
गेल्या तब्बल १५ दिवसांपासून हे दोघे तरुण नित्यनेमाने त्या वासराची काळजी घेत आहेत. नोकरी, संसार आणि दैनंदिन जबाबदाऱ्या सांभाळत असतानाही या मुक्या जीवासाठी वेळ काढून त्याला पाणी, दूध आणि फीड देण्याचे काम ते करत आहेत.
ना कोणती प्रसिद्धीची अपेक्षा…
ना कोणता स्वार्थ…
फक्त एका मुक्या जीवाबद्दलची माणुसकी!
हे दृश्य पाहून मा. श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी दोन्ही तरुणांचे मनापासून कौतुक केले आणि त्यांच्या सेवाभावी कार्याबद्दल आभार मानले.
तसेच, यापुढे या वासरासाठी आणि ते करत असलेल्या सेवेसाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थाच्या जगात एखाद्या मुक्या जीवासाठी सलग १५ दिवस निःस्वार्थपणे सेवा करणारे हे दोन तरुण खऱ्या अर्थाने समाजासमोर एक आदर्श निर्माण करत आहेत.
कारण माणूस म्हणून जन्माला येणे ही निसर्गाची देणगी आहे; पण माणुसकी जपणे ही आपली जबाबदारी आहे.आणि म्हणूनच “मानवतेचा खरंच एक हात असाही असतो.”सत्यवान शिंदे आणि ऋषिकेश शिंदे यांच्या या संवेदनशील कार्याला मनापासून सलाम!