(फलटण/ प्रतिनिधी ) : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) अंतर्गत विद्यार्थ्यांना कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षणाची प्रभावी जोड देण्यासाठी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालयात “Implementation of OJT (On Job Training)” या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) व OJT Cell यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यशाळेला प्राध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाची सुरुवात श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. (डॉ.) पी. एच. कदम होते.
कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. (डॉ.) विकास काकडे, प्राचार्य, एस. बी. आर. कॉलेज, म्हसवड यांनी On Job Training (OJT) ही केवळ अभ्यासक्रमातील औपचारिक बाब नसून विद्यार्थ्यांच्या ज्ञान, कौशल्य, उद्योगसंवाद आणि रोजगारक्षमतेला बळकटी देणारी प्रभावी शैक्षणिक प्रक्रिया असल्याचे सांगितले. आंतरवासितेचे नियोजन, उद्योगांशी समन्वय, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन, आवश्यक दस्तऐवजीकरण तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने OJT ची प्रभावी अंमलबजावणी याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांच्या अनुभवसमृद्ध विवेचनामुळे उपस्थित प्राध्यापकांना OJT प्रभावीपणे राबविण्यासाठी व्यावहारिक दिशा मिळाली.
कार्यक्रमास प्रा. (डॉ.) पी. आर. पवार, NEP नोडल अधिकारी तथा मराठी विभागप्रमुख आणि प्रा. (डॉ.) टी. पी. शिंदे, IQAC समन्वयक यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य प्रा. (डॉ.) पी. एच. कदम यांनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीमध्ये आंतरवासिता (OJT) ची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे अधोरेखित केले. विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य, आत्मविश्वास आणि उद्योगाभिमुख दृष्टिकोन विकसित करण्यासाठी प्रत्येक विभागाने OJT प्रभावीपणे राबविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
कार्यशाळेनंतर झालेल्या प्रश्नोत्तर सत्रात प्राध्यापकांनी OJT अंमलबजावणीसंदर्भातील विविध शंकांचे निरसन करून घेतले.कार्यक्रमाचे नियोजन OJT Cell चे समन्वयक डॉ. ए. के. शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. ललित वेलेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. गायकवाड पी. एम. यांनी केले.
महाविद्यालयातील विविध विभागांचे प्राध्यापक मोठ्या संख्येने या कार्यशाळेस उपस्थित होते. विद्यार्थ्यांना उद्योगविश्वाशी जोडणारे, कौशल्याधारित शिक्षणाला चालना देणारे आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शक ठरणारे हे आयोजन मुधोजी महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेतील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.