ओडिशाला २७-१९ असे नमवत ४५ व्या ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकावर मोहोर; २७ वे राष्ट्रीय जेतेपद, सलग १२ व्या विजेतेपदाचा ऐतिहासिक विक्रम
गुजरात (क्रीडा प्रतिनिधी) : आक्रमणातील वेग, संरक्षणातील चपळाई आणि सांघिक खेळाच्या जोरावर महाराष्ट्राच्या मुलींनी ४५ व्या ज्युनियर राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. अंतिम सामन्यात ओडिशाच्या संघाला २७-१९ अशा आठ गुणांनी पराभूत करत महाराष्ट्राने २७ वे राष्ट्रीय विजेतेपद संपादन केले. विशेष म्हणजे, सलग १२ व्या विजेतेपदाची ऐतिहासिक कामगिरी करत महाराष्ट्राच्या मुलींनी राष्ट्रीय खो-खोच्या मैदानावर सुवर्णदबदबा कायम राखला.
विद्यापीठाच्या मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात ओडिशाने नाणेफेक जिंकून प्रथम संरक्षण स्वीकारले. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत पहिल्या डावात १२ गुण व ३ बोनस गुणांसह १५ गुणांची कमाई केली. याउलट ओडिशाला पहिल्या डावात केवळ ६ गुण मिळवता आले. पहिल्याच डावात मिळवलेली आघाडी महाराष्ट्राच्या विजयाचा पाया ठरली.
दुसऱ्या डावातही महाराष्ट्राने आक्रमण आणि संरक्षण या दोन्ही आघाड्यांवर प्रभावी खेळ केला. महाराष्ट्राने १० गुणांची कमाई केली, तर ओडिशानेही १० गुण मिळवत सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पहिल्या डावातील पिछाडी भरून काढण्यात ओडिशाला अपयश आले. अखेर महाराष्ट्राने २७-१९ अशा फरकाने दणदणीत विजय मिळवत सुवर्णपदकावर नाव कोरले.
खेळाडूंच्या अष्टपैलू कामगिरीने विजय सुकर
महाराष्ट्राच्या विजयात स्नेहा लामकाने (२.३० मिनिटे संरक्षण व ६ गुण), धनश्री कंक (२ मिनिटे संरक्षण व ४ गुण), मैथिली पवार (१.३० मिनिटे संरक्षण व ६ गुण), अनुष्का ताम्हाणे (१.२० व २.१० मिनिटे संरक्षण), श्वेता नवले (१.४० मिनिटे संरक्षण), गुड्डी राठोड (१.१० मिनिटे संरक्षण) आणि प्रणिती जगदाळे (४ गुण) यांनी मोलाची भूमिका बजावली.
ओडिशाच्या संघाकडून तृप्तीरेखा बारीक, सुभाश्री मल्लिक, लिसारानी रैना, चिन्मयी प्रधान, रक्तिमा भांडा, कादिला मेनका आणि सुभालक्ष्मी नाथा यांनीही चांगली झुंज दिली. मात्र महाराष्ट्राच्या संघातील उत्कृष्ट समन्वय आणि आक्रमणाचा वेग यापुढे त्यांचा टिकाव लागला नाही.
सलग १२ सुवर्णपदकांचा ऐतिहासिक पराक्रम.!
महाराष्ट्राच्या मुलींनी मिळवलेले हे २७ वे राष्ट्रीय विजेतेपद आणि सलग १२ वे जेतेपद राज्याच्या खो-खो क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरले आहे. खेळाडूंची मेहनत, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, संघ व्यवस्थापनाचे नियोजन आणि सांघिक एकजूट यांचा हा विजय असल्याची भावना क्रीडाप्रेमींमधून व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र खो-खो संघटनेचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी या ऐतिहासिक विजयाबद्दल खेळाडू, प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापनाचे अभिनंदन केले. महाराष्ट्राच्या मुलींनी मेहनत, जिद्द आणि उत्कृष्ट सांघिक समन्वयाच्या जोरावर हे यश मिळवले असून आगामी स्पर्धांमध्येही विजयी घोडदौड कायम ठेवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्राच्या मुलींनी मिळवलेल्या या सुवर्णविजयामुळे राज्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून राष्ट्रीय खो-खोच्या इतिहासात आणखी एका सुवर्णपानाची भर पडली आहे.