(जावली /अजिंक्य आढाव): फलटण तालुक्यातील जावली येथील श्री सिद्धनाथ मंदिरात श्री सिद्धनाथ जन्मोत्सवानिमित्त 37 वा अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी व नवनाथ पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, दि. २५ नोव्हेंबर ते बुधवार, दि. २ डिसेंबर २०२६ या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडणार आहेत.
या सोहळ्यानिमित्त दररोज पहाटे ४ ते ६ काकडा आरती, सकाळी ६ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, तर सायंकाळी ६ ते ९ कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहादरम्यान नामवंत कीर्तनकार व प्रवचनकार यांची उपस्थिती लाभणार आहे.
सप्ताहकाळात मांसाहार पूर्णतः बंद ठेवण्याचे आवाहन
श्री सिद्धनाथ जन्मोत्सव व अखंड हरिनाम सप्ताहाचे धार्मिक पावित्र्य जपण्यासाठी संपूर्ण सप्ताह काळात जावली गावात मांसाहार पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. ग्रामस्थ व भाविकांनी धार्मिक परंपरा आणि सोहळ्याचे पावित्र्य राखत या नियमाचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
सप्ताहकाळात विविध भाविकांच्या वतीने अखंड वीणावादन, धार्मिक प्रवचन, कीर्तन आणि हरिनामाचा गजर होणार आहे. बुधवार, दि. २ डिसेंबर रोजी काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे.
याचबरोबर सप्ताहकाळात विविध भाविकांच्या वतीने अन्नदानाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीनाथ पुजारी मंडळ, श्रीनाथ भजनी मंडळ, समस्त ग्रामस्थ मंडळी तसेच श्री संत ज्ञानेश्वर पारायण मंडळ, जावली यांच्या वतीने या धार्मिक सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्याचा जावली व परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.