इतिहासातील खोटेपणा
डॉ. आ. ह. साळुंखे यांचे प्रतिपादन; ‘राजर्षी छत्रपती शाहू इतिहास संशोधक व लेखक पुरस्कार’ प्रदान
मुधोजी महाविद्यालयात सातारा इतिहास संशोधन मंडळाचे १७ वे राष्ट्रीय अधिवेशन उत्साहात
फलटण, प्रतिनिधी : इतिहासलेखन करताना केवळ कागदपत्री पुराव्यांवर अवलंबून न राहता, त्या पुराव्यांचा लेखक कोण आहे, त्यामागील हेतू काय आहे, त्याची विचारसरणी कोणती आहे आणि त्याने मांडलेली माहिती कितपत सत्य आहे, याची चिकित्सक तपासणी करणे आवश्यक आहे. इतिहासातील चुकीची, बदनामीकारक आणि खोटी माहिती पुराव्यांच्या आधारे खोडून काढत सत्य इतिहास समाजासमोर आणला पाहिजे. ही जबाबदारी पुढील पिढीने स्वीकारली पाहिजे, असे परखड प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, संशोधक आणि लेखक डॉ. आ. ह. साळुंखे यांनी केले.
फलटण येथील मुधोजी महाविद्यालयात शनिवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी सातारा इतिहास संशोधन मंडळ, सातारा आणि मुधोजी महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १७ व्या वार्षिक अधिवेशन व राष्ट्रीय इतिहास परिषदेत ते बोलत होते. इतिहास संशोधन व लेखन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. आ. ह. साळुंखे यांना ‘राजर्षी छत्रपती शाहू इतिहास संशोधक व लेखक पुरस्कार’ फलटण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
खोटेपणाला खोटेपणाने नव्हे, तर सत्य पुराव्यांनी उत्तर द्या!
पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना डॉ. आ. ह. साळुंखे म्हणाले, “‘No Document, No History’ हे खरे असले, तरी आपल्याला मिळालेला कागदपत्री पुरावा कोणी लिहिला, का लिहिला, तो कोणाचा हस्तक होता, त्याची विचारसरणी कोणती होती, तो लोकहितदक्ष होता की विध्वंसक होता, याची खात्री केली पाहिजे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी इतिहास चुकीच्या पद्धतीने लिहिला गेला आहे. त्यामुळे इतिहास डोळसपणे तपासण्याची गरज आहे. खोटेपणाला खोटेपणाने उत्तर न देता सत्य पुराव्यांच्या आधारे उत्तर दिले पाहिजे.”
मानसिक गुलामी आणि आंधळ्या श्रद्धेत खरेपणा नसतो, असे स्पष्ट करत ते पुढे म्हणाले की, खोट्या गोष्टींपुढे नतमस्तक न होता खोट्याला खोटे आणि खऱ्याला खरे म्हणण्याचे सामर्थ्य प्रत्येकामध्ये असले पाहिजे. इतिहासलेखनाच्या क्षेत्रात काही स्वार्थी प्रवृत्तींनी चुकीची व बदनामीकारक माहिती तसेच धादांत खोटे पुरावे वापरून लेखन केले आहे. अशा चुकीच्या नोंदी पुसून सत्य इतिहासाची मांडणी करण्यासाठी पुढील पिढीने पुढाकार घेणे आवश्यक आहे.
फलटणच्या राजघराण्याच्या इतिहासाला न्याय मिळावा : श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर
परिषदेचे उद्घाटन फलटण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते झाले. उद्घाटनपर भाषणात ते म्हणाले की, फलटणच्या नाईक-निंबाळकर घराण्याचा इतिहास पुरोगामी आणि लोकाभिमुख आहे. मात्र, इतिहासलेखनाच्या अनेक ठिकाणी या घराण्याचा इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आला आहे. या चुकीच्या मांडणीविरोधात आपण अनेक बाबींमध्ये आव्हान देऊन नाईक-निंबाळकर घराण्याविषयीचा खोटा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला आहे.
पुढील इतिहासकारांनी सत्यता आणि सारासार विवेकबुद्धीने तपासलेल्या पुराव्यांच्या आधारे फलटणच्या नाईक-निंबाळकर घराण्याच्या इतिहासाचे वस्तुनिष्ठ लेखन करून या ऐतिहासिक घराण्याला न्याय द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.