फलटण संस्थानच्या ऐतिहासिक योगदानावर राष्ट्रीय परिषदेत मंथन
(फलटण/ प्रतिनिधी) :फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्याने आधुनिक आणि पुरोगामी विचारांची परंपरा जोपासत शिक्षण, सामाजिक सुधारणा आणि सर्वांगीण विकासाला नेहमीच प्राधान्य दिले. स्वकीय संस्कार, प्रथा, परंपरा, संस्कृती आणि लोकभावना जपत विकासाचा मार्ग स्वीकारणाऱ्या फलटण संस्थानाने ब्रिटिश काळातही आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली, असे प्रतिपादन मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
सातारा इतिहास संशोधन मंडळ आणि मुधोजी महाविद्यालय, फलटण येथील इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘२० व्या शतकातील संस्थाने : फलटण संस्थानचा विशेष संदर्भ’ या विषयावर आयोजित १७ व्या वार्षिक अधिवेशनाच्या आणि एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या समारोपप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. अवनीश पाटील उपस्थित होते.
मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर पुढे म्हणाले की, ब्रिटिश राजवटीच्या काळात कोल्हापूर, सातारा, बडोदा आणि फलटण या संस्थानांनी पुरोगामी धोरणांचा स्वीकार करून सामाजिक व शैक्षणिक विकासाला चालना दिली. फलटण संस्थानात १८८३ मध्ये मुधोजीराजे यांनी शिक्षणाचा पाया घातला. या संस्थानांच्या इतिहासाची माहिती समकालीन कागदपत्रांतून मिळते. ग्रँट डफ यांनी लिहिलेल्या मराठ्यांच्या इतिहासातही या ऐतिहासिक घडामोडींचे संदर्भ आढळतात.
राजर्षी शाहू महाराज, प्रतापसिंह महाराज, श्रीमंत मालोजीराजे आणि महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी आपल्या संस्थानांमध्ये शैक्षणिक व सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला. शिक्षणाचा प्रसार, सहकाराची चळवळ आणि आधुनिक विचारांचा स्वीकार यांमुळे पुढील काळात कर्मवीर भाऊराव पाटील व महर्षी धोंडो केशव कर्वे यांसारख्या शिक्षणमहर्षींना शिक्षण तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रेरणा व पोषक वातावरण मिळाले.
आधुनिक शेती, पाणी व्यवस्थापन, पाटबंधारे, कालवे, धरणे, लघुउद्योग, व्यावसायिक शिक्षण, स्त्री शिक्षण, लोकशाही मूल्ये, सामाजिक समता आणि अस्पृश्यता निवारण अशा विविध क्षेत्रांत संस्थानांनी केलेले कार्य अभ्यासण्याची आवश्यकता आहे. या ऐतिहासिक योगदानाचे वस्तुनिष्ठ संशोधन झाले, तर पुढील पिढ्यांना विकासाच्या या समृद्ध वारशाची ओळख होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
फलटण संस्थानाच्या पुरोगामी कार्याचे संशोधन आवश्यक प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. अवनीश पाटील यांनी सातारा इतिहास संशोधन मंडळ आणि मुधोजी महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या उपक्रमांचे कौतुक केले. कोल्हापूर, सातारा आणि फलटण ही संस्थाने सामाजिक व राजकीयदृष्ट्या पुरोगामी आणि मानवतावादी विचारांची होती. फलटण संस्थानाने आधुनिक शिक्षणप्रणाली आणि पुरोगामी विचारांना प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली. संस्थानात रुजलेल्या या विचारांचा तत्कालीन समाजावर झालेला परिणाम अभ्यासणे महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.
फलटण संस्थानाच्या प्रगतीचा आलेख सत्यशोधक पालेकर यांनी १९४३ मध्ये तुलनात्मक पद्धतीने मांडल्याचा उल्लेख करून त्यांनी या विषयावरील संशोधनाचे महत्त्व अधोरेखित केले. कोल्हापूर, फलटण, सातारा आणि बडोदा या संस्थानांनी ब्रिटिश अमदानीत आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत आधुनिक लोकशाही मूल्ये रुजविण्याचा प्रयत्न केला. या संस्थानांच्या कार्याचा अभ्यास ऐतिहासिक दृष्टिकोनातून होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
देणगीदारांचा सन्मान या राष्ट्रीय परिषदेसाठी प्रा. डॉ. मधुकर जाधव यांनी भोजनखर्च प्रायोजित केला. तसेच प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांनी २५ हजार रुपये, प्रा. डॉ. संतोष कदम यांनी ११ हजार रुपये, तर प्रताप गावडे, मनोज कदम, कौशल्या रणदिवे, संदीप रिशे आणि माळवदे मॅडम यांनी प्रत्येकी पाच हजार रुपये देणगी स्वरूपात दिले. या सर्व देणगीदारांसह सातारा इतिहास संशोधन मंडळाच्या कार्यकारिणी सदस्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
या राष्ट्रीय परिषदेला महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांतील प्राध्यापक, इतिहास अभ्यासक आणि संशोधक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. लक्ष्मीकांत वेळेकर यांनी केले, तर आभार प्रा. अभिजित कदम यांनी मानले.
फलटण संस्थानाचा पुरोगामी वारसा, शैक्षणिक योगदान आणि सामाजिक परिवर्तनातील भूमिका यांचा अभ्यास करण्यासाठी या राष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध झाले.