डॉ. कलाम यांच्या जयंतीनिमित्त मुधोजी महाविद्यालयात आज ‘वाचन प्रेरणा दिन’ विशेष व्याख्यान! प्रा. डॉ. सीता जगताप यांचे व्याख्यान; प्राचार्य डॉ. पी. एच. कदम अध्यक्षस्थानी
(जावली /अजिंक्य आढाव ): भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी फ. ए. सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालयात गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘वाचन प्रेरणा दिन – २०२६’ निमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
मुधोजी महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर मराठी विभाग, विवेकवाहिनी आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम सकाळी १० वाजता प्राचार्य शिवाजीराव भोसले सभागृहात होणार आहे.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या व वक्त्या म्हणून प्रा. डॉ. सीता जगताप उपस्थित राहणार असून, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. पी. एच. कदम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.
वाचन संस्कृती रुजविण्याचा उद्देश
भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रेरणादायी जीवनकार्यातून आणि विचारांतून विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी, ज्ञानाची कक्षा विस्तारावी तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, हा या व्याख्यानाच्या आयोजनामागील प्रमुख उद्देश आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी आणि व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी वाचनाचे महत्त्व अधोरेखित करण्याची संधी या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.
या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. डॉ. प्रभाकर पवार व प्रा. डॉ. अशोक शिंदे, तर सहसंयोजक म्हणून प्रा. शैला क्षीरसागर व डॉ. गौरी गायकवाड काम पाहत आहेत.या व्याख्यानाचा लाभ महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक तसेच वाचनप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन मुधोजी महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.