फलटणकरांना ६० कि.मी. परिघात एकत्रित टोल पास द्या ! स्थानिक वाहनधारकांसाठी वार्षिक पासची मागणी ; टीआर-एनटीचा भेद न करता ५०० ते ६०० रुपयांत सवलत देण्याची ॲड. कांचनकन्होजा खरात यांची मागणी..!
(जावली /अजिंक्य आढाव )फलटण एस.टी. स्टँड हे मध्यबिंदू मानून त्यापासून ६० किलोमीटरच्या परिघातील सर्व विद्यमान तसेच भविष्यातील संबंधित टोल प्लाझांसाठी फलटण तालुक्यातील पात्र वाहनधारकांना विशेष सवलतीचा ‘फलटण तालुका स्थानिक वार्षिक एकत्रित टोल पास’ सुरू करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
फलटण हे सातारा जिल्ह्यातील भौगोलिक, व्यापारी, कृषी, औद्योगिक आणि वाहतूकदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र आहे. फलटण शहरातून विविध दिशांना राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख रस्त्यांचे जाळे विकसित होत असून फलटण-पंढरपूर, फलटण-पुणे/जेजुरी, फलटण-इंदापूर/बारामती, फलटण-दहिवडी तसेच फलटण-लोणंद-शिरवळ या मार्गांवर वाहतूक सुविधा विकसित होत आहेत.
या रस्त्यांच्या विकासामुळे फलटणसह सातारा जिल्हा, महाराष्ट्र आणि देशाच्या वाहतूक व्यवस्थेला मोठा फायदा होत असला तरी या विकासाच्या काळात स्थानिक नागरिकांना अनेक वर्षे वाहतुकीचा त्रास, धुळीचा सामना, अपघात, वाहतूक कोंडी, वाहनांचे नुकसान तसेच शेती व स्थानिक मालमत्तेवरील परिणाम सहन करावे लागले आहेत. काही ठिकाणी अपघातांमध्ये नागरिकांना जीवही गमवावा लागला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
रस्ते झाले; आता टोलचा आर्थिक भार का? असा सवाल उपस्थित करत ॲड. खरात यांनी म्हटले आहे की, दैनंदिन नोकरी, व्यवसाय, शेतीमालाची वाहतूक, शिक्षण व इतर कामांसाठी फलटण तालुक्यातील नागरिकांना वारंवार तालुक्याबाहेर प्रवास करावा लागतो. त्यामुळे विविध दिशांना निर्माण होणाऱ्या टोल प्लाझांमुळे स्थानिक वाहनधारकांवर वर्षभर मोठा आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे.
सध्याच्या व्यवस्थेत टोल प्लाझापासून २० किलोमीटर अंतरातील स्थानिक वाहनांसाठी स्वतंत्र पासाची तरतूद आहे. मात्र, विस्तृत भौगोलिक क्षेत्र असलेल्या फलटण तालुक्यासाठी प्रत्येक टोल प्लाझाची स्वतंत्र २० किलोमीटरची मर्यादा स्थानिक नागरिकांच्या प्रत्यक्ष प्रवासाच्या गरजा पूर्ण करीत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
५०० ते ६०० रुपयांत वार्षिक पासची मागणी
फलटण एस.टी. स्टँडपासून ६० किलोमीटर परिघातील सर्व संबंधित टोल प्लाझांवर लागू होईल असा एकत्रित वार्षिक पास सुरू करावा. या पासची वार्षिक फी सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी असून ५०० ते ६०० रुपयांपेक्षा अधिक नसावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच वाहन ट्रान्सपोर्ट (TR) किंवा नॉन-ट्रान्सपोर्ट (NT) आहे, या आधारावर स्थानिक नागरिकांमध्ये भेदभाव करू नये, अशीही स्पष्ट भूमिका घेण्यात आली आहे. एका फास्टटॅग अथवा डिजिटल प्रणालीद्वारे संबंधित सर्व टोल प्लाझांवर ही सवलत आपोआप लागू होईल, अशी व्यवस्था करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
भविष्यात या ६० किलोमीटरच्या परिघात नवीन टोल प्लाझा सुरू झाल्यास तोदेखील या योजनेत आपोआप समाविष्ट करावा. फलटण तालुक्यातील रहिवासी व वाहनांची पात्रता निश्चित करण्याची प्रक्रिया सोपी, पारदर्शक आणि ऑनलाइन करण्यात यावी, अशी मागणी आहे.
“राष्ट्रीय महामार्गांच्या विकासाला विरोध नाही; मात्र विकासाचा सर्वाधिक प्रत्यक्ष वापर करणाऱ्या आणि त्याचा आर्थिक भार सहन करणाऱ्या स्थानिक नागरिकांना न्याय्य व परवडणारी सवलत मिळणे आवश्यक आहे,” अशी भूमिका ॲड. खरात यांनी मांडली आहे.
फलटण तालुक्यासाठी स्वतंत्र ६० किलोमीटर स्थानिक परिघ निश्चित करून ५०० ते ६०० रुपये वार्षिक दराचा, टीआर-एनटीचा भेद न करणारा एकत्रित टोल पास लागू करण्याचा सकारात्मक निर्णय शासनाने तातडीने घ्यावा. तसेच खासदार व आमदारांनी हा प्रश्न लोकसभा आणि विधानसभेत प्रभावीपणे मांडून फलटणकरांना टोलच्या आर्थिक भारातून दिलासा मिळवून द्यावा, अशी मागणी ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी केली आहे.
“राष्ट्रीय महामार्गांचा विकास — स्थानिक नागरिकांवर आर्थिक अन्याय नको” या भूमिकेतून ही मागणी करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.