(फलटण | प्रतिनिधी )संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊली यांच्या भगिनी श्री संत आदिशक्ती मुक्ताई यांच्या पालखी सोहळ्याचे विडणी गावात गुरुवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. पालखी सोहळ्याचे चालक-मालक ह.भ.प. कृष्णा महाराज परेराव यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदीहून पंढरपूरकडे निघालेला पालखी सोहळा विडणी येथे दाखल होताच ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले.
सकाळी सुमारे १० वाजता पालखी गावाच्या वेशीवर पोहोचताच रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी आकर्षक रांगोळ्या काढून भाविकांनी पालखी रथावर फुलांची उधळण केली. ऊन, सावली आणि रिमझिम पावसाच्या साक्षीने “विठ्ठल… विठ्ठल…”च्या अखंड जयघोषात वारकरी पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करत होते.
उत्तरेश्वर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी वारकरी, विठ्ठल-रुक्मिणी, वीणेकरी तसेच विविध संतांच्या वेशभूषा साकारून पालखीचे स्वागत केले. त्यानंतर विठोबा-रखुमाईच्या जयघोषात ग्रामस्थांच्या उपस्थितीत पालखीची गावातून ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली.
ग्रामप्रदक्षिणेनंतर पालखी उत्तरेश्वर विद्यालयात दाखल झाली. यावेळी डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्या हस्ते पालखीची विधिवत आरती करण्यात आली. त्यानंतर पालखीचा मुक्कामासाठी विसावा करण्यात आला.
या संपूर्ण सोहळ्यामुळे विडणी गाव विठ्ठल-रखुमाईच्या नामघोषाने दुमदुमून गेले असून सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.