आपला जिल्हा

भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुका आयोजित धम्मदीक्षा समारंभ उत्साहात व धम्ममय वातावरणात संपन्न

(फलटण/ प्रतिनिधी ) : भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने राज्याचे संघटक तथा सातारा व पुणे जिल्ह्याचे प्रभारी, समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर दादासाहेब भोसले आणि भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे अध्यक्ष महावीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित धम्मदीक्षा समारंभ अत्यंत शांत, धम्ममय व प्रेरणादायी वातावरणात यशस्वीपणे पार पडला. या कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी तालुका सरचिटणीस बाबासाहेब जगताप, कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते, कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे, संघटक अरविंद निकाळजे, संस्कार सचिव अमोल काकडे, संरक्षण सचिव राजेंद्र गायकवाड यांच्या सक्रिय सहभागातून अत्यंत चांगल्या प्रकारे पार पडले.

या धम्मदीक्षा समारंभास भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा (पूर्व) यांचे संस्कार सचिव मा. सोमीनाथ घोरपडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते भारतीय बौद्ध महासभेच्या संस्कार पाठपद्धतीनुसार विधीपूर्वक गाथांसह बौद्ध धम्माची दीक्षा देण्यात आली. धम्मदीक्षा स्वीकारणाऱ्या उपासक व उपासिकांना भंते काश्यप यांनी त्रिशरण व पंचशील दिले.यानंतर मा. सोमीनाथ घोरपडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे दिलेल्या बावीस धम्म प्रतिज्ञा उपस्थित उपासक-उपासिकांकडून विधिवत स्वीकारून घेतल्या.

मिशन २५ अंतर्गत धम्म चळवळ गतिमान करण्याचे आवाहन

या वेळी बोलताना मा. सोमीनाथ घोरपडे म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारत बुद्धमय करण्याचा जो संकल्प केला होता, तो पूर्णत्वास नेण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेने ‘मिशन २५’ अंतर्गत विविध कार्यक्रम, शिबिरे व धम्मदीक्षा समारंभ राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे तालुका पातळीवर विविध ठिकाणी धम्मदीक्षा घेऊन ही उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय राहिले पाहिजे.

धम्मदीक्षा घेतलेल्या उपासक-उपासिकांनी भारतीय बौद्ध महासभेमध्ये सक्रिय सहभाग घेऊन धम्म चळवळ अधिक गतिमान करावी, असे आवाहन त्यांनी केले. “सम्राट अशोकाने युद्धाचा मार्ग सोडून बुद्धाचा मार्ग स्वीकारला. त्याने महेंद्र व संघमित्रा यांना धम्म प्रचारासाठी पाठवले. आज तुम्हा सर्वांचा नवा जन्म झाला असून, तुम्हीही धम्म प्रचारक बनून समाजात बुद्धाचा विचार पोहोचवावा,” असे प्रेरणादायी उद्गार त्यांनी काढले.

भंते काश्यप यांनी धम्मदेसना देताना सांगितले की, “धम्म हा वाहत्या पाण्यासारखा आहे. जसे गंगेचे पाणी सतत वाहत राहते, तसाच धम्माचा विचारही समाजात प्रवाही राहिला पाहिजे. पाणी साचले की दुर्गंधी निर्माण होते; तसेच धम्म आचरणात न आणल्यास तो केवळ शब्दरूपातच उरतो.”
परित्राण पाठाचे महत्त्व स्पष्ट करताना ते म्हणाले, “परित्राण म्हणजे मनाचे संरक्षण. रोजच्या जीवनात धम्माचे आचरण, पंचशील पालन आणि दसपारमिता पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्यासच खरी धम्मदीक्षा सफल ठरते.” सर्व उपासक-उपासिकांनी शुद्ध आचरण, करुणा, मैत्री व प्रज्ञेचा मार्ग स्वीकारून भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून धम्मविचार समाजात रुजवावा, असे आवाहन त्यांनी केले.

या समारंभात एकूण ११ उपासक-उपासिकांनी धम्मदीक्षा स्वीकारली. त्यामध्ये प्रतिभा बाळासाहेब माने, वेदांती बाळासाहेब माने, शोभा रमेश झेंडे, रमेश दुष्यासन झेंडे, किशोर रामचंद्र माने, पौर्णिमा किशोर माने, रजनी सुहास माने, सुहास रामचंद्र माने, बेबीनंदा रामचंद्र माने, माया सचिन गायकवाड व सचिन सर्जेराव गायकवाड यांचा समावेश होता.
यावेळी कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते यांनी १० सक्रिय सभासदांची तसेच ११ नवीन बौद्ध सभासदांची नोंदणी करून घेतली.

या समारंभात सुहास रामचंद्र माने व किशोर रामचंद्र माने यांनी संपूर्ण कुटुंबासह धम्मदीक्षा घेतली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांनी विशेष पुढाकार घेतला तसेच उपस्थित पदाधिकारी व उपासक – उपासिकांसाठी भोजनदान केले.
या धम्मदीक्षा समारंभात बौद्धाचार्य म्हणून भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. संपूर्ण विधीचे संचालन तालुका सरचिटणीस बाबासाहेब जगताप, कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते, कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे, संघटक अरविंद निकाळजे, संस्कार सचिव अमोल काकडे व संरक्षण सचिव राजेंद्र गायकवाड यांच्या सहकार्याने पार पडले.

या वेळी वंचित चित्राताई गायकवाड, ॲड. श्याम अहिवळे, विशाल पाटील, मंगेश सावंत, कुणाल मोरे, शरद मोरे, निलेश सुरेश अहिवळे, आरती विशाल पाटील, परिणिता सुनील कांबळे, विद्या खंदारे, श्रुतिका अहिवळे, ज्योती अमोल काकडे, स्नेहल निलेश अहिवळे, संध्या काकडे, त्रिशला जावळे, मनिषा काटकर, चंद्रकांत काटकर, प्रथमेश काटकर व ज्योतीराम काटकर उपस्थित होते.

येत्या तीन-चार दिवसांत खुंटे व कोळकी येथे उपासिका शिबिर आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.अशा प्रकारे हा धम्मदीक्षा समारंभ बौद्ध विचारांचा प्रसार, संघटन बळकटी आणि सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!