ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांनी धम्मसंस्कारासोबत शिक्षणावर ही लक्ष केंद्रित करावे – सोमीनाथ घोरपडे

(फलटण /प्रतिनिधी ): सोमवार पेठ, फलटण येथे लहान मुला-मुलींसाठी संस्कार वर्ग उत्साहात संपन्न झाला. या संस्कार वर्गात भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा (पूर्व) चे संस्कार सचिव व प्रमुख धम्म प्रचारक सोमीनाथ घोरपडे यांनी मार्गदर्शक म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी धम्म संस्कारासोबतच आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे. धम्म म्हणजे निर्मळ जीवन जगण्याचा मार्ग आहे आणि हे जगण्यासाठी आपल्याला उच्च शिक्षणाची सुद्धा गरज आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

यावेळी सोमीनाथ घोरपडे यांनी विद्यार्थ्यांना धम्माचे मूलभूत विचार सोप्या व सहज भाषेत समजावून सांगितले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तीन गुरु भगवान बुद्ध, महात्मा ज्योतिराव फुले आणि संत कबीर यांच्या विचारांचा बाबासाहेबांच्या जीवनावर व विचारसरणीवर कसा प्रभाव होता, याविषयी उदाहरणांसह मार्गदर्शन केले. बाबासाहेबांनी या तिघांना गुरु का मानले, हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे स्पष्ट केले.

कार्यक्रमादरम्यान संत कबीर यांच्या जीवनातील एका प्रसंगाचा संदर्भ देत समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. अंधश्रद्धा, रूढी-परंपरा यांना नकार देत विवेक, तर्क आणि मानवतावादी विचार स्वीकारण्याचा संदेश त्यांनी मुलांना दिला.
या संस्कार वर्गात लहान बालक-बालिकांना सुत्त पठण, वंदना, तसेच भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी गोष्टी सांगण्यात आल्या. या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांमध्ये नैतिक मूल्ये, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवतावादी विचार रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या संस्कार वर्गाचे आयोजन भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेचे कार्यालयीन सचिव आयुष्यमान चंद्रकांत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली लोकांच्या आग्रहास्तव सुरू करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना त्रिसरण-पंचशील यांचे महत्त्व समजावून सांगितले तसेच पंचांग प्रणामाचे महत्त्व स्पष्ट केले.

या उपक्रमासाठी प्रदीप खरात, विशाल शिंदे, विकी भोसले, प्रकाश शिलवंत व वाघमारे परिवार यांनी विशेष पुढाकार घेतला. तसेच शिंदे परिवार, खरात परिवार यांच्यासह सोमवार पेठ परिसरातील उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या संस्कार वर्गामुळे परिसरातील पालक व नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, भविष्यातही असे संस्कारात्मक व धम्मप्रेरित उपक्रम नियमितपणे राबविण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!