आपला जिल्हा

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात झळकला ‘आदर्कीचा तारा’-

सोहम भोईटेचा प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड

(फलटण / प्रतिनिधी)फलटण तालुक्याचा मान उंचावत आदर्की बुद्रुक येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील इयत्ता सातवीचा विद्यार्थी सोहम परमेश्वर भोईटे याने विज्ञान क्षेत्रात दमदार कामगिरी करत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक पटकावला असून, त्याची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी अधिकृत निवड करण्यात आली आहे.

या प्रदर्शनात सोहमने सादर केलेले ‘उस कांडे बियाणे व मुजविणे यंत्र’ हे मॉडेल परीक्षकांनी अत्यंत अचूक, उपयोगी व नाविन्यपूर्ण असल्याचे ठळकपणे नोंदवले. त्याच्या सादरीकरणाने उपस्थितांना विशेष प्रभावित केले आहे.

सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती फलटण (शिक्षण विभाग) तसेच सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५३ व्या फलटण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात, प्राथमिक छोट्या गटातून सोहम भोईटेने सादर केलेल्या उपकरणाला एकमताने प्रथम क्रमांक देण्यात आला. विजेत्या स्पर्धकाचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करताना कार्यक्रमस्थळी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

या यशामागे मुख्याध्यापक (प्र.) शिवाजी गायकवाड व विज्ञान शिक्षिका सौ. वृषाली पाटील यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि आई, वडील यांचे प्रोत्साहन असल्याचे सोहमने सांगितले. मार्गदर्शन आणि सततच्या सरावाच्या जोरावर त्याने हे उपकरण तालुकास्तरावर प्रभावीपणे सादर केले. न्यू इंग्लिश स्कूल, आदर्की बुद्रुकला अनेक वर्षांनंतर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याने शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांत आनंदाचे वातावरण आहे.कार्यक्रमात सरस्वती शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक संध्या गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली सोहमचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरु ज्ञानदेव म्हस्के, प्राचार्य कृष्णदेव क्षीरसागर, माजी प्राचार्य रवींद्र येवले, ग्रामीण कथाकार प्रा. रवींद्र कोकरे, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य रणजित निंबाळकर, मोहनराव डांगे, उपसरपंच अशोक नाळे, गटशिक्षणाधिकारी चन्नया मठपती, तालुका समन्वयक दमयंती कुंभार आदी उपस्थित होते.

या यशाबद्दल शिक्षक दिनेश कोकणी, रोडू पवार, सौ. वृषाली पाटील, फिरोज मुजावर, सुनील भवरे, सौ. सुनीता क्षीरसागर, सौ. नंदा लोखंडे, चंद्रकांत किकले, सौ. तृप्ती भोईटे-भोसले आदींनी सोहमचे अभिनंदन केले.

 

आदर्कीचा विज्ञानतारा उजळला

फलटण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी तयारी करताना मुख्याध्यापक शिवाजी गायकवाड व विज्ञान शिक्षिका सौ. वृषाली पाटील यांनी सोहमला अचूक मार्गदर्शन, साहित्य उपलब्ध करून देणे, सतत प्रात्यक्षिके घेणे अशा पद्धतीने त्याचा आत्मविश्वास वाढवला. या मेहनतीमुळे सोहमने अत्यंत प्रभावी सादरीकरण करीत तालुक्याचा मान उंचावला. आता या पुढेही शाळेतून अधिकाधिक विद्यार्थी विज्ञान क्षेत्रात सहभागी होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.-शिवाजी गायकवाड, प्र. मुख्याध्यापक आदर्की बुद्रुक.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!