(जावली/ अजिंक्य आढाव )फलटण पूर्व भागातील जावली व परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाची वाहतूक सुविधा उपलब्ध होण्याच्या मार्गावर आहे. जावली ते बारामती एसटी बससेवा सुरू करण्यासाठी बारामती आगाराकडून मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून, पुढील काही दिवसांत ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.
जावली गावासह आंदरूड, मिरढे, कोथळे परिसरातील नागरिकांना बारामती येथे जाण्यासाठी सध्या विविध मार्गांचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे वेळ व खर्च दोन्ही वाढत असून, थेट एसटी बससेवेची मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती.
या पार्श्वभूमीवर सहाय्यक वाहतूक निरीक्षक मारुती खळदकर, चालक खांदरे व वाहक सुरेश दुर्वे यांनी जावली येथे येऊन प्रस्तावित मार्गाची पाहणी केली. यावेळी ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बारामती हे शिक्षण, रोजगार, बाजारपेठ तसेच शासकीय कामांसाठी महत्त्वाचे केंद्र असल्याने जावली परिसरातून दररोज मोठ्या संख्येने नागरिक बारामतीकडे प्रवास करतात. थेट एसटी सेवा सुरू झाल्यास जावलीसह परिसरातील प्रवाशांना सुरक्षित, सोयीस्कर आणि थेट सार्वजनिक वाहतूक उपलब्ध होणार आहे.
दरम्यान, बारामती आगाराकडे सध्या बससेवा वाढविण्याची मागणी विविध मार्गांवरून होत असल्याचे अलीकडील वृत्तांतही दिसून येते.