क्रीडा व मनोरंजन
५८ वी वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिलांचा डंका, पुरुष गटात रेल्वेची बाजी
महाराष्ट्राच्या महिलांचे २७ वे तर रेल्वेचे १३ वे अजिंक्यपद

(तेलगणा/ काझीपेठ): काझीपेठ येथील रेल्वे ग्राऊंडवर रंगलेली ५८ वी वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा शेवटच्या क्षणापर्यंत थरारक ठरली. भारतीय खो-खो महासंघाच्या मान्यतेने व तेलंगणा खो-खो असोसिएशनच्या आयोजनाखाली पार पडलेल्या या महास्पर्धेत महाराष्ट्राच्या रणरागिणींनी महिलांच्या गटात अजिंक्यपदाचा झेंडा फडकावला, तर रेल्वेच्या शिलेदारांनी पुरुष गटात आपले वर्चस्व सिद्ध केले. महिलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने ओडिशाला नमवले, तर पुरुषांच्या अंतिम लढतीत रेल्वेने महाराष्ट्रावर रोमहर्षक विजय मिळवला. या स्पर्धेत धाराशिव, महाराष्ट्राच्या संध्या सुरवसेला राणी लक्ष्मीबाई पुरस्कार, तर रेल्वेच्या रामजी कश्यपला (सोलापूर) एकलव्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. महिलांमध्ये महाराष्ट्राचे हे २७ वे, तर पुरुषांमध्ये रेल्वेचे १३ वे अजिंक्यपद ठरले.

पुरुषांमध्ये महाराष्ट्राला तर महिलांमध्ये ओडीसाला रौप्य पदक अटीतटीच्या लढतीत खेळाडूंचा ऐतिहासिक खेळ
पुरुष गटात महाराष्ट्राला १७ वे तर महिला गटात ओडिशाला २ रे उपविजेतेपदधाराशिव, महाराष्ट्राच्या संध्या सुरवसेला राणी लक्ष्मीबाई तर रेल्वेच्या रामजी कश्यपला (सोलापूर) एकलव्य पुरस्कार
महिलांचा थरार: महाराष्ट्राच्या रणरागिणींनी राखले वर्चस्व, महिला गटात महाराष्ट्राच्या अजिंक्यपदाचा धडाका कायम
महिलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने ओडिशावर २३–२२ असा १ गुणाने थरारक विजय मिळवला. महाराष्ट्राच्या विजयात प्रियंका इंगळे (२.१० मि. संरक्षण व १० गुण), संध्या मोरे (२.४० मि. संरक्षण), संध्या सुरवसे (२.३० मि. संरक्षण) आणि अश्विनी शिंदे (१.२० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी निर्णायक योगदान दिले. पराभूत ओडिशाकडून अर्चना प्रधान (२.१० मि. संरक्षण व २ गुण), अर्चना माझी (नाबाद १.५० मि. संरक्षण), मधुस्मिता ओझा (१.४० मि. संरक्षण व २ गुण) आणि शोभाश्री सिंग (१.५० मि. संरक्षण व २ गुण) यांनी जबरदस्त लढत दिली; मात्र त्यांचा प्रयत्न अपुरा ठरला.
पुरुषांचा महाअंतिम सामना: रेल्वेची विजयी धडाकेबाजी
पुरुषांच्या अंतिम सामन्यात रेल्वेने महाराष्ट्राचा २६–२१ असा ५ गुणांनी पराभव करत जेतेपद पटकावले. मध्यंतराला रेल्वे संघ १४–११ ने आघाडीवर होता. विजयी रेल्वे संघाकडून रामजी कश्यप (नाबाद २.३० मि. संरक्षण व २ गुण), महेश शिंदे (१.४० मि. झुंज), जगन्नाथ दास (१.४० मि. संरक्षण व ४ गुण), अरुण गुणकी (१.३७ मि. संरक्षण व २ गुण) आणि अभिनंदन पाटील (४ गुण) यांनी चमकदार कामगिरी केली. महाराष्ट्राकडून प्रतीक वाईकर (१.५५ मि. संरक्षण व २ गुण), अनिकेट चेंदवणकर (१.३० मि. संरक्षण व ६ गुण) आणि शुभम उतेकर (नाबाद १ मि. संरक्षण व २ गुण) यांनी झुंजार खेळ केला.
उपांत्य फेरीतील धमाका: महाराष्ट्राचा पुरुषांमध्ये कोल्हापूरवर तर महिलांमध्ये दिल्लीवर एकतर्फी विजयपुरुषांच्या उपांत्य फेरीत महाराष्ट्राने कोल्हापूरवर २९–२७ असा २ गुणांनी विजय मिळवला, तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात रेल्वेने ओडिशाचा २५–१७ असा ८ गुणांनी पराभव केला. महिलांच्या उपांत्य फेरीत महाराष्ट्राने दिल्लीवर २७–०६ असा एक डाव व २१ गुणांनी दणदणीत विजय नोंदवला, तर ओडिशाने विमान प्राधिकरणावर २७–१९ असा ८ गुणांनी विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेतील मानकरी: उत्कृष्टतेचा गौरव
महिला गट : राणी लक्ष्मीबाई पुरस्कार – संध्या सुरवसे (महाराष्ट्र)
सर्वोत्कृष्ट संरक्षक – अर्चना प्रधान (ओडिशा) सर्वोत्कृष्ट आक्रमक – प्रियंका इंगळे (महाराष्ट्र)



