आपला जिल्हा

फलटणमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची भाजप बरोबर होतेय फरपट..!

मंत्री मकरंद पाटील व खा. नितीन पाटील हि फरपट थांबवणार का..?

(फलटण /प्रतिनिधी )- गेली २५ वर्ष फलटण तालुक्यामध्येच नाही तर सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्वत्र दबदबा तर होताच व सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानला जात होता.

मात्र दरम्यानच्या काळात या बालेकिल्लाला हळूहळू भगदाड पडू लागले व अनेक जणांनी कोणत्या ना कोणत्या कारणाने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला तरी देखील सातारा जिल्ह्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व जिल्हा मध्यवर्ती बँक या महत्त्वाच्या संस्थांवर महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची एक हाती पकड होती.

मात्र गेल्या अडीच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडली व त्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये देखील मोठा फेरबदल झाला मंत्री मकरंद पाटील वगळता श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या नेत्यांनी शरद पवार यांची साथ करण्याचा निर्णय केला उघड उघड श्रीमंत रामराजे जरी शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये गेले नाही तरी श्रीमंत रामराजे यांचे बंधू श्रीमंत संजीवराजे श्रीमंत रघुनाथराजे व माजी आमदार दीपक चव्हाण यांनी शरदचंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये तुतारीचा प्रचार केला होता.तरीदेखील राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दीपक चव्हाण यांनी तुतारीचा प्रचार केला याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करून विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वप्रथम फलटण व कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून
आ. दीपक चव्हाण यांना विधानसभेची उमेदवारी देऊन तिकीट जाहीर केले.मात्र दीपक चव्हाण यांनी हे तिकीट डावलून माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्रजी पवारांच्या तुतारीवर निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला.परिणामी दिपक चव्हाण यांचा पराभव झाला व फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला ही जागा असल्यामुळे ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे उमेदवार नसल्यामुळे भाजपाने आपला उमेदवार अजित पवार यांना देऊन घड्याळ या चिन्हावर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे कट्टर समर्थक सचिन कांबळे पाटील हे घड्याळाच्या चिन्हावर विजयी झाले. तेव्हापासून फलटणच्या राष्ट्रवादीची भाजपा बरोबर फरपट चालू झाली नावाला आमदार जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असला तरी त्यांचे विचार हे भाजपाचे असल्यामुळे त्यांनी फलटण तालुक्यामध्ये कधीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी प्रयत्न केले नाहीत उलट भाजपा हाच पक्ष कसा मजबूत होईल या दृष्टीनेच निर्णय करण्याचे ठरवले परिणामी फलटण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कमकुवत होत गेला.

फलटण तालुक्याचा आमदार जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असला तरी फलटण नगर परिषदेमध्ये भाजपाने नगराध्यक्ष पदासह २० उमेदवार उभे केले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ ७ जागांवर समाधान मानावे लागले. उमेदवार ठरविण्याचे अधिकार सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना ठेवण्यात आले नाहीत. आता येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किती जागा भाजपा सोडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
नुकतीच फलटण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पार्श्वभूमीवर मंत्री मकरंद व खासदार नितीन पाटील यांच्या उपस्थितीत एक बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये फलटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्ष सौ. प्रतिभा शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली व सांगितले की, फलटण नगरपरिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसवर अन्याय झाला आम्हाला सन्मानाची वागणूक मिळाली नाही. त्यांनी ज्या मोजक्या जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडल्या त्यातीलही काही जागी भाजपाचेच उमेदवार घड्याळ या चिन्हावर उभा केले अशा प्रतिक्रिया जनतेतून आम्हास ऐकावयास मिळाल्या. तरी येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये ५० टक्के जागा भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडल्या पाहिजेत व या जागी उमेदवार ठरवण्याचे अधिकार सुद्धा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाच राहिले पाहिजेत अन्यथा आम्ही स्वबळावयास लढावयास तयार आहोत अशी खदखद हि वरिष्ठांच्या समोर व्यक्त केली.
फलटण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये देखील दोन मतमतांतरे आहेत त्यामधील एक गट माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विचाराचा असून तो दुसऱ्या गटाला फरफटत नेहण्याचे काम करीत आहे असा सूर दबक्या आवाजात निघत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचा दुसरा निष्ठावंत व स्वाभिमानी गट सन्मान जनक जागा दिल्या नाही तर स्वतंत्र निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत.

मात्र येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये तरी फलटण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भाजप बरोबर होणारी ही फरपट मंत्री मकरंद आबा पाटील व खासदार नितीन पाटील हे थांबवणार की, काय याकडे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!