(फलटण/ प्रतिनिधी) दि. 24 : वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीत ॲड. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळातील सर्व निवडणुका पूर्ण ताकदीनिशी लढवून राजकीय सत्ता हस्तगत करणे, संविधानाचे संरक्षण करणे आणि सर्वसमावेशक विकासाचे स्वप्न साकार करणे याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. वाड्या-वस्त्या व गावागावांत वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवणे हे मुख्य उद्दिष्ट असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.
बुद्ध, फुले, शाहू आंबेडकर सामाजिक सभागृह कोळकी, ता. फलटण येथे वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा पूर्व यांच्यावतीने सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सातारा जिल्हा पूर्वचे अध्यक्ष रामदास कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बैठक संपन्न झाली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी, भारतीय बौद्ध महासभा फलटण तालुका पदाधिकारी उपस्थित होते.
नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमधील कामगिरीचा सविस्तर आढावा, आगामी महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत रणनीती यावर सखोल चर्चा करण्यात आली.
प्रारंभी भारतीय बौद्ध महासभा फलटण तालुक्याच्यावतीने तालुकाध्यक्ष महावीर भालेराव व कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते यांनी वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा पूर्वचे अध्यक्ष रामदास कांबळे यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ देवून सन्मान केला, सातारा जिल्हा पूर्व व फलटण तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची प्रत देऊन सन्मानित करण्यात आले.
बैठकीस जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, उपाध्यक्ष विजय लोंढे, सचिव ॲड. तेजस मोरे, निकाळजे सर, कांबळे सर, फलटण तालुकाध्यक्ष संदीपभाऊ काकडे, अजित कांबळे, सुमित मोरे, फलटण शहराध्यक्ष उमेश कांबळे, मान तालुकाध्यक्ष युवराज भोसले, महिला जिल्हा उपाध्यक्षा चित्राताई गायकवाड, सचिव अरविंद आढाव, शाहू, फुले, आंबेडकर विद्वद्य विचारधारा चे अशोक भोसले, कांता काकडे, भारतीय बौध्द महासभा सातारा जिल्हा पूर्व चे सचिव सुनिल कदम यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते