(जावली/ अजिंक्य आढाव ): सातारा तालुक्यातील शिवथरनजीक न्हाळेवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण असतानाच फलटण तालुक्यातील जावली परिसरातही बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जावली येथील गणेश मकर यांच्या दोन जनावरांवर बिबट्याने हल्ला करून त्यांना ठार केल्याची घटना समोर आली
जावली परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी शेत परिसरात बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकरी, पशुपालक आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशातच गणेश मकर यांच्या दोन जनावरांचा बिबट्याने फडशा पाडल्याने नागरिकांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.
बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात जाणेही धोकादायक ठरत आहे. पशुधनावर हल्ले होत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून, भविष्यात बिबट्याचा मानवी वस्तीकडे मोर्चा वळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
शिवथरनजीक न्हाळेवाडी येथील गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने जावली परिसरातील बिबट्याच्या वावराची तातडीने दखल घेऊन पाहणी करावी, बिबट्याचा ठावठिकाणा शोधून आवश्यक ठिकाणी पिंजरे लावावेत आणि त्याला जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात जनावरे गमावलेल्या गणेश मकर यांना वनविभागाने तातडीने पंचनामा करून शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई द्यावी, अशीही मागणी करण्यात येत आहे.
शिवथरच्या घटनेनंतर तरी वनविभाग जावली परिसरातील बिबट्याच्या वाढत्या वावराची गांभीर्याने दखल घेणार का, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.