मुंबई : मुंबईतील क्रीडा संस्कृतीला अधिक बळकटी देण्याच्या ध्येयाने कार्यरत असलेल्या मुंबई स्पोर्ट्स संस्थेने यंदाच्या २०२५-२६ च्या ‘स्पोर्ट्सपर्सन्स ऑफ द ईयर’ पुरस्कारासाठी नामांकन प्रक्रिया सुरू केली असून ३१ जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विविध क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावणाऱ्या मुंबईतील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार दिला जातो. गेल्या दोन वर्षांपासून या उपक्रमामुळे अनेक उभरत्या खेळाडूंना नवे व्यासपीठ मिळाले आहे.
दिग्गजांच्या समितीकडून होणार अंतिम निवड
पुरस्कारासाठी आलेल्या अर्जांची छाननी मधुकर तळवलकर यांच्या अध्यक्षतेखालील समिती करणार असून श्रीमती नीलिमा अडसूळ (जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई शहर), जया शेट्टी, प्रदीप गंधे, संजय घारपुरे आणि संदीप कदम हे सदस्य अंतिम विजेत्यांची निवड करतील. या निवड प्रक्रियेत मुंबईतील नामवंत खेळाडू, क्रीडा विभाग, मुंबई स्पोर्ट्स जर्नलिस्ट असोसिएशन तसेच मुंबई मराठी क्रीडा पत्रकार संघ यांचे प्रतिनिधीही सहभागी असल्याने निवड प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह ठरणार आहे.
२९ ऑगस्टला होणार दिमाखदार पुरस्कार सोहळा
निवड झालेल्या खेळाडूंचा गौरव २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी कुर्ला येथील बंटस संघ सभागृहात आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात करण्यात येणार आहे. विजेत्या खेळाडूला ₹१ लाखांचे पारितोषिक आणि मानाचे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार असून, या पुरस्कारामुळे मुंबईच्या क्रीडाक्षेत्रातील गुणवंतांना मोठी प्रेरणा मिळणार आहे.
अर्जासाठी पात्रता आणि संपर्क
या पुरस्कारासाठी मुंबईतील स्थायी रहिवासी असलेला तसेच राज्य, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी केलेला कोणताही खेळाडू अर्ज करू शकतो. खेळाडू स्वतः किंवा संबंधित संघटना अथवा फेडरेशन त्यांच्या वतीने नामांकन पाठवू शकतात. अधिक माहितीसाठी क्षितीज वेदक यांच्याशी ९८७०३३७३०८ या क्रमांकावर संपर्क साधता येईल किंवा mumbaisports2021@gmail.com या ई-मेलवर अर्ज पाठविता येईल.
क्रीडाप्रेमींच्या सहकार्याने उभा राहिलेला उपक्रम
या पुरस्कारासाठी क्रीडा महर्षी मधुकर तळवलकर यांच्या वतीने पाच वर्षे दरवर्षी ₹१ लाखांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच यंदाच्या पुरस्कारासाठी जय कवळी यांनी ₹१ लाखांचे योगदान दिले असून मुंबईच्या शेरदिल बंट्स महासंघा कडून सभागृहासह इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
क्रीडाविकासासाठी कार्यरत सक्षम टीम
मुंबई स्पोर्ट्स संस्थेचे अध्यक्ष अदिल सुमारिवाला, संयोजक जय कवळी असून जया शेट्टी, प्रदीप गंधे, उदय देशपांडे, सुदर्शन नायर, संजय शेटे, भास्कर सावंत, अरविंद प्रभू आणि नामदेव शिरगावकर यांच्यासह विविध क्रीडा क्षेत्रातील मान्यवर कार्यकर्ते मुंबईच्या क्रीडा विकासासाठी सातत्याने योगदान देत आहेत. त्यांच्या या उपक्रमामुळे मुंबईतील गुणवंत खेळाडूंना नवसंजीवनी मिळत असून, शहराच्या क्रीडा चळवळीला नवे बळ प्राप्त होत आहे.