आपला जिल्हा

79 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या बापूराव गुंजवटे दादांची 45 वर्षांची अखंडित, निर्भीड आणि मूल्यनिष्ठ पत्रकारिता…!

 (सोमिनाथ घोरपडे  /प्रतिनिधी )क्रांतिकारी सातारा जिल्ह्यातील पत्रकारितेच्या इतिहासात जेष्ठ पत्रकार म्हणून ज्यांचे नाव आजही आदराने आणि अभिमानाने घेतले जाते, असे माण तालुक्यातील बिजवडी (ता. माण) येथील बापूराव लक्ष्मण गुंजवटे (दादा) हे नाव आहे. आपल्या परखड, स्पष्टवक्त्या व निर्भीड लेखणीच्या जोरावर त्यांनी पत्रकारितेत स्वतःची स्वतंत्र आणि ठळक ओळख निर्माण केली आहे. समाजाच्या प्रश्नांशी प्रामाणिक राहून, कोणत्याही दबावाला न झुकता त्यांनी तब्बल 45 वर्षे अखंडित पत्रकारिता केली असून, आज दिनांक 15 जानेवारी रोजी ते 79 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत.

सन 1981 पासून बिजवडी (ता. माण) येथून डेटलाईन घेत त्यांनी दैनिक शिवसंदेश, ग्रामोद्धार, कर्मयोगी, सह्याद्री एक्सप्रेस, तरुण भारत, ऐक्य, पुण्यनगरी, लोकमत यांसह अनेक नामांकित दैनिके व विविध साप्ताहिकांमध्ये सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील विषयांवर सातत्याने व निर्भीडपणे लेखन केले. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य माणूस राहिला आहे. अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देणे आणि चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्यांवर लेखणीच्या माध्यमातून अंकुश ठेवणे, ही भूमिका त्यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणे निभावली.
दुष्काळी माण तालुक्याचे प्रश्न हे गुंजवटे दादांच्या पत्रकारितेचे आत्मकेंद्र राहिले आहेत. सततच्या दुष्काळाने होरपळणारा शेतकरी, कष्टकरी, मजूर, मेंढपाळ, कामगार वर्ग, रोजगारासाठी होणारे स्थलांतर, कोरड्या पडणाऱ्या विहिरी व बोअरवेल, टँकरवर अवलंबून असलेले पाणी, महिलांची पाण्यासाठीची पायपीट, जनावरांचा चारा-पाणी प्रश्न – या साऱ्या जळजळीत वास्तवाला त्यांनी सातत्याने लेखणीतून मांडले. पाणी प्रश्न, जलसंधारण, बंधारे, तलाव, पाणीपुरवठा योजना, पीक विमा, नुकसान भरपाई, रोजगार हमी योजना यांतील त्रुटी आणि दिरंगाई त्यांनी निर्भीडपणे उघड केली.

आपल्या सत्यनिष्ठ पत्रकारितेमुळे अनेक वेळा त्यांच्यावर न्यायालयीन केसेसही दाखल झाल्या, मात्र अशा कठीण प्रसंगांतही त्यांनी कधीही न्यायाची आणि सत्याची बाजू सोडली नाही. कोर्टकचेऱ्या, मानसिक ताणतणाव आणि अडचणी असूनही त्यांच्या लेखणीची धार कधीही बोथट झाली नाही. कोणत्याही भीतीला किंवा दबावाला न जुमानता त्यांनी समाजहितालाच सर्वोच्च स्थान दिले.

कोणाचीही लाचारी न पत्करता, स्वाभिमानाने व निःपक्षपातीपणे पत्रकारिता केल्यामुळे त्यांना पत्रकारितेतील ‘भीष्माचार्य’ अशी उपाधी बहाल करण्यात आली. त्यांच्या या प्रदीर्घ व मूल्यनिष्ठ कार्याची दखल घेत विविध दैनिके, साप्ताहिके, संस्था, मंडळे तसेच माणदेश फाउंडेशन (पुणे), फलटण ग्रामीण पत्रकार संघ, माण तालुका पत्रकार संघ आदी संघटनांनी त्यांना अनेक पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
दादांची पत्रकारिता केवळ बातमीपुरती मर्यादित न राहता ती घडवणारी आणि दिशा देणारी पत्रकारिता ठरली आहे. अनेक तरुणांना पत्रकारितेचे धडे देत, त्यांना या प्रवाहात आणण्याचे मोलाचे काम त्यांनी केले. सर्व पत्रकारांना एकत्र आणत सहकाऱ्यांच्या मदतीने माण तालुका पत्रकार संघाची स्थापना करून पत्रकारांमध्ये एकजूट निर्माण करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.

पूर्वी तालुक्यात केवळ दोन-तीनच पत्रकार कार्यरत होते. त्या काळात ना मोबाईल, ना वाहन, ना आधुनिक साधने उपलब्ध होती. बातमी मिळवण्यासाठी एसटीने गावोगावी फिरावे लागत होते, अनेकदा पायी चालत पत्रकारिता करावी लागत होती. लिहिलेली बातमी पोस्टाने साताराला पाठवली जायची आणि दोन-तीन दिवसांनी ती प्रसिद्ध व्हायची. आजच्या झपाट्याने बदलणाऱ्या डिजिटल युगातही त्या बदलांना सामोरे जात सातत्य, विश्वासार्हता आणि प्रामाणिकपणा जपण्याचे काम गुंजवटे दादांनी यशस्वीपणे केले आहे.
दादांचा हा पत्रकारितेचा व सामाजिक जाणिवेचा वारसा आज त्यांचे चिरंजीव विशाल गुंजवटे समर्थपणे पुढे नेत आहेत. आधुनिक माध्यमांचा स्वीकार करत असतानाही ग्रामीण भागातील प्रश्न, शेतकरी-कष्टकरी आणि सामान्य माणसाचा आवाज बुलंद ठेवण्याची परंपरा त्यांनी जपली आहे. त्यामुळे गुंजवटे कुटुंबाची पत्रकारिता ही केवळ नावापुरती न राहता मूल्यांवर आधारित समाजाभिमुख परंपरा म्हणून पुढे चालली आहे.

गुंजवटे दादांचे कार्य, त्याग, संघर्ष आणि पत्रकारितेवरील निष्ठा याबद्दल बोलावे तेवढे कमीच आहे. आज त्यांच्या 79 व्या वाढदिवसानिमित्त त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देत, त्यांनी उत्तम आरोग्यासह शंभरी पार करावी, आणि हा प्रेरणादायी वारसा पुढील पिढ्यांपर्यंत अखंडितपणे पोहोचावा, हीच सर्वांची मनापासून सदिच्छा…!

Related Articles

Back to top button
Don`t copy text!