(फलटण / प्रतिनिधी)फलटण नगरपरिषद हद्दीतील जुना प्रभाग क्रमांक १० मधील रस्ते विकासाची कामे दीर्घकाळापासून अपूर्ण राहिल्याने नागरिकांच्या अडचणी वाढल्या असून, याप्रकरणी प्रीतसिंह अमरसिंह खानविलकर यांनी मुख्याधिकारी, फलटण नगरपरिषद यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली आहे.
तक्रारीनुसार, प्रभागातील विविध रस्त्यांची कामे व्ही स्क्वेअर कन्स्ट्रक्शन यांना देण्यात आली होती. वर्क ऑर्डरनुसार ठरलेल्या कालमर्यादेत कामे पूर्ण होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात आजतागायत अनेक रस्त्यांची कामे अपूर्ण असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अपूर्ण राहिलेल्या रस्त्यांमध्ये ह. बा. कुलकर्णी घर ते रवी शिंदे गिरण रस्ता, जय हिंद कोल्ड्रिंक्स ते डॉ. जगताप दवाखाना, बाजरे गुरुजी ते परडेकर मठ रस्ता, डॉ. राजवैद्य पिछाडी रस्ता, अवस्थान मंदिर ते गणदास घर रस्ता, माने घर ते कानसेल घर रस्ता तसेच कदम घर ते माठपती घर रस्ता यांचा समावेश आहे.
संबंधित ठेकेदारास याबाबत तीन वेळा नोटिसा देण्यात आल्याचा उल्लेख तक्रारीत असूनही काम सुरू न झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा व नगरपरिषद प्रशासन शाखेमार्फत दंडात्मक कारवाई व काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश असतानाही प्रत्यक्ष अंमलबजावणी न झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी अमरसिंह भाऊसाहेब खानविलकर यांनी उपोषण केले असता तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी काम पूर्ण करण्याबाबत लेखी आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतरही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नसल्याचे तक्रारीत नमूद आहे.
याशिवाय, एका रस्त्याचे काम त्याच ठेकेदारास वेगळ्या निविदेतून देण्यात आल्याचा तसेच यातून अनुचित लाभ देण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, संभाव्य भ्रष्टाचाराबाबत चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, कामे तातडीने सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनासह आत्मा दहनाचा टोकाच्या स्वरूपाचा इशारा दिला असल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणावर नगरपरिषद प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे फलटण शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.