मजुरांना काम द्या,मस्टर उपलब्ध करा.! दुष्काळात रोजगारासाठी सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी ; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन
(जावली /अजिंक्य आढाव )फलटण तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतीची कामे ठप्प झाल्यामुळे शेतमजूर आणि ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांसमोर रोजगाराचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. या पार्श्वभूमीवर मनरेगाअंतर्गत मजुरांना तातडीने काम उपलब्ध करून द्यावे, मंजूर कामे सुरू करावीत आणि कामांसाठी आवश्यक मस्टर त्वरित उपलब्ध करून द्यावे, अशी ठाम मागणी जिल्हा परिषद सदस्य सौ. वैशाली संदीप कांबळे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी पंचायत समिती, फलटण येथील गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
फलटण तालुक्यातील प्रत्येक गावात १०० जणांना रोजगार उपलब्ध करून देणार!
‘फलटण तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक गावात १०० लोकांना रोजगाराची कामे देण्याचे आश्वासन देण्यात फलटणचे गटविकास अधिकारी मा. अक्षय धावटे यांनी दिले “
मजुरांच्या प्रमुख मागण्या ठळक..!
सौ. वैशाली कांबळे यांनी निवेदनातून पुढील मागण्या केल्या आहेत.
मनरेगाची कामे तातडीने सुरू करा..! — फलटण तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेऊन रोजगार हमी योजनेची कामे तातडीने सुरू करावीत.
– बरड गटातील गावांना प्राधान्य द्या! — बरड जिल्हा परिषद गटातील गावांमध्ये मनरेगाअंतर्गत विविध कामांना प्राधान्याने मंजुरी द्यावी.
मंजूर कामे प्रत्यक्ष सुरू करा.! — मंजूर कामे कागदावर न ठेवता प्रत्यक्ष सुरू करण्यासाठी संबंधित विभागाला तातडीने आदेश द्यावेत.
– मजुरांचे मस्टर त्वरित उपलब्ध करा! — सुरू असलेल्या कामांसाठी मजुरांची उपस्थिती नोंदविणारे मस्टर वेळेत उपलब्ध करून द्यावे.
– मजुरांची गैरसोय टाळा.! —
कामावर येणाऱ्या मजुरांना प्रशासकीय अडचणींमुळे रोजगारापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी आवश्यक कार्यवाही करावी.
– स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करा! — रोजगाराअभावी ग्रामीण कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवू नये आणि स्थलांतराची वेळ येऊ नये, यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात.
दुष्काळात मजुरांच्या हाताला काम मिळणार कधी..?
फलटण तालुक्यात पावसाअभावी शेतीची कामे कमी झाल्याने ग्रामीण मजुरांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत मनरेगा ही ग्रामीण कुटुंबांसाठी रोजगाराची महत्त्वाची योजना ठरू शकते. त्यामुळे प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रोजगार हमीची कामे सुरू करण्यासाठी गतिमान कार्यवाही करावी, अशी भूमिका सौ. कांबळे यांनी मांडली आहे.
प्रशासनाच्या कार्यवाहीकडे लक्ष
दुष्काळसदृश परिस्थितीत ग्रामीण मजुरांना रोजगार उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांनी निवेदनाची तातडीने दखल घेऊन संबंधित विभागाला आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. आता मनरेगाची कामे कधी सुरू होणार आणि मजुरांना प्रत्यक्ष रोजगार कधी मिळणार, याकडे बरड गटातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.