हि बातमी ईतर भाषेत वाचा
क्रीडा व मनोरंजनदेश विदेश

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे सन 2024 चे ‘दर्पण पुरस्कार’ जाहीर

फलटण मधील अ‍ॅड.रोहित शामराव अहिवळे (संपादक, दै.गंधवार्ता, फलटण), यशवंत भिमराव खलाटे - पाटील (प्रतिनिधी, दै.पुण्यनगरी, फलटण) यांना पुरस्कार जाहीर

(फलटण/ प्रतिनिधी) : महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या संस्थेतर्फे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणार्‍या 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा आज संस्थेचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी केली.

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी, पोंभुर्ले ग्रामपंचायत, जांभे – देऊळवाडी ग्रामस्थ, जांभेकर कुटूंबिय यांच्या संयुक्त सहकार्याने ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या 178 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना
आदरांजली वाहण्याचा विशेष कार्यक्रम पोंभुर्ले, ता.देवगड, जि.सिंधुदुर्ग येथील दर्पण सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्रीराम एज्युकेशन सोसायटी (फलटण) चे मानद सचिव डॉ.सचिन सूर्यवंशी – बेडके व विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र, शिरवली (माणगांव) चे सचिव सुरेश गोखले यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य रविंद्र बेडकिहाळ होते. व्यासपीठावर महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे कार्यकारी विश्‍वस्त विजय मांडके, पोंभुर्ले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सादिक डोंगरकर, सुधाकर जांभेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

जाहीर झालेले राज्यस्तरीय ‘दर्पण पुरस्कार’ याप्रमाणे –

श्रीकांत रामभाऊ साबळे (आवृत्ती संपादक, दै.पुण्यनगरी, पुणे), दिपक एस. शिंदे (आवृत्ती प्रमुख, दैनिक लोकमत, सातारा), नवनाथ कुताळ (प्रतिनिधी, दै.दिव्यमराठी, श्रीरामपूर), सौ.विमल विठ्ठलराव नलवडे (संपादिका, सा.धनसंतोष, कोरेगाव, जि.सातारा), अ‍ॅड.रोहित शामराव अहिवळे (संपादक, दै.गंधवार्ता, फलटण), यशवंत भिमराव खलाटे – पाटील (प्रतिनिधी, दै.पुण्यनगरी, फलटण) ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील (कराड) पुरस्कृत राज्यस्तरीय ‘धाडसी पत्रकार’ पुरस्कार – डॉ.प्रमोद श्रीरंग फरांदे (वरिष्ठ उपसंपादक, दै.सकाळ, सातारा) आचार्य बाळशास्त्री जांभेकर ‘दर्पण’ साहित्यिक पुरस्कार – निर्मलकुमार सूर्यवंशी (रा.हडसणी, ता.हदगाव, जि.नांदेड).

या सर्व पुरस्कारप्रपाप्त पत्रकारांचे महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्यावतीने अभिनंदन करुन आगामी 6 जानेवारी रोजी राज्यस्तरीय पत्रकार दिनी सदर पुरस्कारांचे समारंभपूर्वक वितरण होणार असल्याचेही रविंद्र बेडकिहाळ यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाप्रसंगी सचिन सूर्यवंशी – बेडके व सुरेश गोखले यांनी रविंद्र बेडकिहाळ यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीकडून बाळशास्त्रींच्या स्मृती जपण्यासाठी सुरु असलेल्या कामाचे कौतुक केले. प्रास्ताविक संस्थेचे विश्‍वस्त अमर शेंडे यांनी केले. कार्यक्रमास सौ.सुलभा गोखले, सौ.ज्योती सुर्यवंशी – बेडके, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या विश्‍वस्त सौ.अलका बेडकिहाळ, रोहित वाकडे, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाचे संचालक प्रसन्न रुद्रभटे आदींसह पत्रकार, पोंभुर्ले ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!