सातारा दि. 5 :- सातारा सिंचन मंडळाने 2023-2024 मध्ये टंचाई परिस्थिती असतानाही विक्रमी 22 कोटी 88 लाख रुपये एवढी पाणीपट्टी वसुली केली आहे. या मंडळामार्फत यापूर्वी 19 कोटी 41 लाख रुपये इतकी महत्तम पाणीपट्टी वसुली करण्यात आली होती.
सातारा सिंचन मंडळ, सातारा यांच्याकडे सातारा जिल्ह्यातील पूर्ण झालेल्या सिंचन प्रकल्पांच्या सिंचन व्यवस्थापनाचे व देखभाल-दुरुस्तीची कामे आहेत. या मंडळाकडे धोम, धोमबलकवडी, कण्हेर, उरमोडी व कोयना हे 5 मोठे प्रकल्प, येरळवाडी, राणंद, नेर व आंधळी हे 4 मध्यम प्रकल्प व 28 लघु प्रकल्प आणि 64 को.प. बंधारे सिंचन व्यवस्थापनासाठी आहेत.
या विक्रमी पाणीपट्टी वसुलीबाबत सातारा सिंचन मंडळ अधीक्षक अभियंता अरुण नाईक यांनी लाभक्षेत्रातील बागायतदार, कालवा पाणी वापर संस्था, सहकारी साखर कारखाने, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, वाई, सातारा, तासवडे (कराड), व लघु औद्योगिक वसाहत पाटण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सातारा, नगरपरिषद सातारा, वाई, पाटण व रहिमतपूर यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले आहेत.
तसेच मंडळांतर्गत सर्व विभागांतील कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता, शाखा अभियंता, दप्तर कारकून, मोजणीदार, कालवा निरीक्षक व सिंचन व्यवस्थापनातील क्षेत्रीय कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.