हि बातमी ईतर भाषेत वाचा
राजकीय

निंबाळकर की मोहिते पाटील…? भाजपसमोर माढ्याचा गड राखण्याचं आव्हान, तर पवारांच्या मनात नेमकं काय..?

(फलटण/प्रतिनिधी) : माढा लोकसभा मदरासंघातून 2024 ला कोण निवडणूक लढवणार याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. 2019 ला भाजपचे रणजितसिंह निबांळकर हे विजयी झाले होते. त्यांनी संजय मामा शिंदेचा पराभव केला होता.निंबाळकर की मोहिते पाटील? भाजपसमोर माढ्याचा गड राखण्याचं आव्हान, तर पवारांच्या मनात नेमकं काय..?

माढा लोकसभा मतदारसंघ हा पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ म्हणजे पवारांचा बालेकिल्ला असं मानलं जात होतं. मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडलं. 2019 ला भाजपचे रणजितसिंह नाईक निबांळकर हे विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष उभे राहिलेल्या संजय मामा शिंदे यांचा पराभव केला होता. यावेळी म्हणजे 2024 च्या लोकसभेसाठी या मतदारसंघातून अनेकजण इच्छूक आहेत. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील हे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. यामुळं भाजपमधील अंतर्गत कलह समोर आला आहे.

माढा लोकसभा मतदारसंघावर कायम शरद पवार यांचे वर्चस्व राहिल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, 2019 च्या लोकसभेत या मतदारसंघात भाजपने मुंसडी मारली होती. रणजितसिंह निंबाळकरांनी अकलूजच्या मोहिते पाटलांच्या साथीनं माढ्याचा गड सर केला होता. मात्र, आता या दोघांमध्ये सगळं काही ठिक नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यामुळं या मतदारसंघात भाजपमधून कोणाला उमेदवारी मिळणार? हा प्रश्न उपस्थित केला जातोय. सध्या धैर्यशील मोहिते पाटील हे गावोगावी दौरे करत आहेत, तर रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी देखील पुन्हा मीच असं म्हणत गाठी भेटी सुरु केल्या आहेत. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील या मतदारसंघात निवडणूक लढवणार असल्याची घोषणा राजू शेट्टी  यांनी केली आहे. पाहुयात माढा लोकसभा मतदारसंघातील सध्याची स्थिती.

माढा लोकसभा मतदारसंघात किती विधानसभा मतदारसंघ..?

माढा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील काही तालुके आणि सातारा जिल्ह्यातील काही तालुक्यांचा समावेश होतो. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, करमाळा, सांगोला आणि माढा हे चार विधानसभा मतदारसंघ येतात. तर सातारा जिल्ह्यातील माण-खटाव आणि फलटण हे दोन विधानसभा मतदारसंघ माढा लोकसभा मतदारसंघात येतात. त्यामुळं या मतदारसंघात अटीतटीची लढत होते.

मतदारसंघात कोणत्या पक्षाचे किती आमदार.?

माढा – बबनदादा शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट)
करमाळा – संजय मामा शिंदे (अपक्ष, अजित पवार गटाला पाठिंबा)
सांगोला – शहाजीबापू पाटील (शिवसेना, शिंदे गट)
माळशिरस – राम सातपुते (भाजप)
माण-खटाव – जयकुमार गोरे (भाजप)
फलटण – दिपक चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट)

पक्षीय बलाबल, सध्याची स्थिती..?

2019 नंतर माढा लोकसभा मतदारसंघात बरेच बदल झाले आहेत. या मतदारसंघात भाजपची ताकद वाढल्याचे चित्र दित आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचीही या मतदारसंघात मोठी ताकद आहे. पण सध्या शिवसेनेत आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यामुळं नेतेमंडळींची विभागणी झाली आहे. राष्ट्रवादीचे नेत्यांनी अजित पवार गटाला साथ दिली आहे. सध्या अजित पवार भाजपसोबत गेल्यानं या मतदारसंघाच महायुतीची ताकद वाढली आहे. पण या मतदारसंघात महायुतीकडून कोणाला तिकीट मिळणार? यावर बरीच राजकीय गणित ठरणार आहेत.

माढा लोकसभा मतदार संघाचा 2009 पासूनची स्थिती.. ?

माढा लोकसभा मतदारसंघात 2009 च्या निवडणूक राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लाढवली होते. त्यांनी 3 लाखाहून अधिक मताधिक्क्य घेत भाजपचे उमेदवार सुभाष देशमुख यांचा पराभव केला होता. त्यानंतर 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्याचे माजी मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवली होती. त्यांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सदाभाऊ खोत यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत अटितटीच्या लढतीत विजयसिंह मोहिते पाटील यांनी विजय मिळवला होता. 25 हजार मताच्या फरकाने विजयसिंह मोहिते पाटील निवडून आले होते. मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी माढा मतदासंघातील सर्व वातावरण बदलले. विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं या मतदारसंघात भाजपची ताकद वाढली. त्यामुळं 2019 च्या निवडणुकीत मोहिते पाटलांनी भाजपचा उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला होता. या निवडणुकीत निंबाळकरांनी राष्ट्रावादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर उभे असलेल्या अपक्ष उमेदवार संजय मामा शिंदे यांचा पराभव केला होता.

   भाजप कोणाला तिकीट देणार..?

दरम्यान, 2024 च्या लोकसभेसाठी भाजप कोणाला उमेदवारी देणार हा महत्वाचा मुद्दा आहे. कारण रणजितसिंह निंबाळकरांनी आपण पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे सांगितले आहे. तर भाजपमधूनच धैर्यशील मोहिते पाटील हेदेखील इच्छुक आहेत. त्यामुळं भाजप या दोघांपैकी कोणाला उमेदवारी देणार..? हा चर्चेचा विषय आहे. की दोघांच्या वादात तिसऱ्याचा लाभ असे काही समीकरण माढा मतदारसंघात पाहायला मिळते का? हा सुध्दा प्रश्न उपस्थित होतोय. दरम्यान, भाजपने जर रणजितसिंह निंबाळकरांना पुन्हा तिकीट दिले तर धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळं भाजपची डोकेदुखी वाढण्याची चिन्ह दिसत आहेत.

शरद पवारांच्या मनात नेमकं काय..?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग या माढा लोकसभा मतदारसंघात आहेत. कारण 2009 साली खुद्द शरद पवारांनी या मतदारसंघात निवडणूक लढवली होती. मोठ्या फरकाने शरद पवार या मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यामुळं या मतदारसंघात पवारांचे मोठे नेटवर्क आहे. मोहिते पाटील भाजपमध्ये जाण्यापूर्वी शरद पवार यांचे निकवर्ती होते. तसेच सध्या अजित पवार गटात सामील झालेले आमदार बबनदादा शिंदे आणि आमदार संजयमामा शिंदे हेदेखील शरद पवार यांचे विश्वासू समजले जात होते. शिंदे बंधुसह मोहिते पाटलांची देखील मोठी ताकद या मतदारसंघात आहे. त्यामुळं आता शरद पवार यांच्या मनाते नेमकं काय? याची देखील चर्चा सुरु आहे.

शरद पवारांनी घेतली होती मोहिते पाटलांची भेट…!

मध्यंतरी शरद पवार यांनी घरी जाऊन विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली होती. विजयसिंहे मोहिते पाटील यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठई ही भेट झाल्याचे माहिती जरी सांगितली होती. पण यावेळी काही राजकीय चर्चा झाली का? हा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय. तसेच दुसरीकडे फलटणचे रामराजे नाईक निंबाकर यांनी देखील मोहिते पाटलांची भेट घेतली होती. त्यामुळं भाजपनं जर रणजितसिंह निंबाळकरांना पुन्हा भाजपचे तिकीट दिले तर धैर्यशील मोहिते पाटील यांना शरद पवार ताकद देऊ शकतात अशी माहिती राजकीय विश्लेषकांनी दिली आहे. महायुती असली तरी रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजितसिंह निंबाळकर यांचे राजकीय वैर सर्वश्रूत आहे. त्यामुळं रामराजे नाईक निंबाळकर रणजितसिंह निंबाळकर यांचे काम करतील अशी स्थिती नाही. त्यामुळं पवारांच्या पाठिंब्यावर मोहिते पाटलांनी निवडणूक लढवली तर नवल वाटायला नको अशी चर्चा मतदारसंघात सुरु आहे. याबरोबर पवार अन्य कोणी उमेदवार उभा करतात का हेसुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातील प्रश्न...?

माण, सांगोला हे परंपरागत दुष्काळी तालुके या मतदारसंघात आहेत. येथे पाणीटंचाई खूप आहे. सिंचनाची कामे होत असली तरी त्याचा वेग कमी आहे. माढा मतदारसंघात साखर कारखानदारी असली तरी ती सध्या आर्थिक अडचणीत आहेत. काहीच कारखाने ऊसाला चांगला दर देत आहेत. अन्य कृषीमालाचे दर कमी आहेत. सुशिक्षित बरोजगारी खूप आहे. त्यामानाने कृषी अधारित अन्य व्यवसाय व उद्योग येथे आले नाहीत. सहकारी संस्था अडचणीत असल्याने आता नोकर्‍यांची संख्या रोडावली आहे. मोठ्या शिक्षणाच्या सुविधा मतदारसंघात नाहीत. तसेच मतदारसंघात अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था चांगली नाही. अनेक ठिकाणी वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. माढा तालुक्यातील काही भाग, तसेच करमाळा तालुक्यातील काही भागात अद्यापही पाण्याच्या समस्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!