हि बातमी ईतर भाषेत वाचा
ताज्या घडामोडी

“धोबी पछाड” कथासंग्रहाचे आगमन व लेखन साहित्य श्रेत्रात आदर्शवत ठरेल – श्रीमंत संजीवराजे निंबाळकर

(जावली/अजिंक्य आढाव) लेखक व साहित्यिक शिवाजीराव घोरपडे यांनी लिहिलेल्या ‘धोबी पछाड’ या ग्रामीण विनोदी कथा संग्रहाने मराठी साहित्यात आगमन केले असून हा कथासंग्रह साहित्य क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करेल असे सांगत ‘धोबी पछाड’ कथासंग्रह मराठी साहित्याची उंची वाढवेल असे मत पुणे येथील प्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक बबनराव पोतदार यांनी व्यक्त केले.

शिवाजीराव घोरपडे – गजेंद्रगडकर लिखित ‘धोबी पछाड’ या कथासंग्रहाचा प्रकाशन समारंभ येथील महाराजा मंगल कार्यालयात पार पडला, यावेळी पोतदार बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य विश्वासराव देशमुख होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य रविंद्र बेडकीहाळ, प्रसिद्ध लेखिका समाजशास्त्रज्ञ डॉ.अश्विनी घोरपडे – गजेंद्रगडकर, लेखक शिवाजीराव घोरपडे , सत्यजित घोरपडे सौ.धनश्री घोरपडे उपस्थित होते.

श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, शिवाजीराव घोरपडे श्रीराम कारखान्यात प्रतिकूल परिस्थितीत काम करीत होते. श्रीमंत शिवाजीराजे यांच्या समवेत असणाऱ्या व्यक्तींपैकी ते एक होते. त्यांनी कथासंग्रह लिहिल्यामुळे त्यांचे साहित्य क्षेत्रातील आगमन व लेखन इतरांना आदर्शवत ठरेल. यापुढे चांगल्या लिखाणासह दर्जेदार साहित्याची निर्मिती त्यांच्या हातून होईल. त्यांचा कथासंग्रह साहित्य क्षेत्राला समृद्ध करण्यासाठी उपयुक्त ठरेल.

रविंद्र बेडकीहाळ म्हणाले, साहित्य हे देशातील विविध क्षेत्रांना ऊर्जा आणि प्रेरणा देते. ‘धोबी पछाड’ याला अपवाद राहणार नाही. समाज व राजकारण यांना दिशा देण्याचे काम साहित्य करीत असते. साहित्यातील सर्व प्रकार लिहिले पाहिजेत. मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून आम्ही अनेक साहित्यिकांना घडविले आहे. शिवाजीराव घोरपडे यांना आम्ही मराठी साहित्य परिषदेत आजच आमंत्रित करीत आहोत.

वाचन, मनन, चिंतन, व्यासंग आपला अंगभूत गुण असल्यामुळे आपल्या हातून लेखन होत गेले. ग्रामीण भागाचे सूक्ष्म निरीक्षण व परीक्षण लेखनास उपयुक्त ठरले आणि यातूनच पुस्तकाने आकार घेतला. प्रसिद्धी माध्यमातील अनेक मित्रांनी माझ्या कथारुपी लेखनाला प्रसिद्धी दिल्यामुळे आणखी लिहिण्याची प्रेरणा आणि ऊर्जा मिळाली. लेखन करतेवेळी घरातील वातावरण लेखनास पोषक ठेवण्यासाठी कुटुंबाचे सहकार्य मिळाले. साहित्य क्षेत्रातील मित्रांनी मार्गदर्शन केले, याचा परिपाक म्हणजे ‘धोबी पछाड’ची निर्मिती असल्याच्या भावना लेखक शिवाजीराव घोरपडे यांनी यावेळी व्यक्त केल्या.

अध्यक्षीय भाषणात मा.प्राचार्य देशमुख म्हणाले, महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा सहवास लाभलेले फलटण भूमीतील अनेक लोक आपापल्या क्षेत्रात काम करीत आहेत. आजही आम्ही त्यांच्या विचारधारेवर चालत आहोत. फलटणला श्रीमंत घराण्याचा मोठा वारसा आहे. या शहरातील अनेक विचारवंत, लेखक, साहित्यिक यांनी आपल्या लेखनशैलीतून मार्गदर्शन केले तोच वसा आणि वारसा पुढे जाताना दिसतोय. साहित्य निर्माण व्हावे, साहित्यातून समाजाला दिशा मिळावी, तरुणांना मार्गदर्शन व्हावे, या सर्व कृती फलटण शहर व तालुक्यात घडताना दिसत आहेत. ‘धोबी पछाड’ कथासंग्रह सर्वांनी वाचावा व लेखकाला आशीर्वाद द्यावेत.

दरम्यान , लेखकाची नात कु.दिव्या आणि ज्येष्ठ सुपुत्र सत्यजित घोरपडे यांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या.प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्याहस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर ‘धोबी पछाड’ कथासंग्रहाचे प्रकाशन श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्याहस्ते करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत घोरपडे कुटुंबाच्यावतीने करण्यात आले. प्रास्ताविक डॉ.प्रा.अशोक शिंदे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ.प्रा.संजय दीक्षित यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा.नीलम देशमुख यांनी केले. आभार सत्यजित घोरपडे यांनी मानले. प्रकाशन समारंभास फलटण एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी, मराठी साहित्य परिषदेचे सदस्य, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!