(प्रतिनिधी/ फलटण ) देशातील बेरोजगार युवकांची आर्थिक प्रगती व्यवसायनिर्मितीच्या माध्यमातून व्हावी यासाठी पद्मश्री डॉ.मिलिंद कांबळे यांनी दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की) द्वारे भारत सरकारला स्टार्टअप योजना दिली, या योजनेचा लाभ नवउद्योजकांनी घ्यावा असे आवाहन डिक्कीच्या राष्ट्रीय मार्गदर्शक श्रीमती सीमा कांबळे यांनी केले.
दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री सातारा विभागाच्या वतीने जिल्ह्यातील अनुसूचित प्रवर्गातील उद्योजकांकरीता सातारा येथील हॉटेल या ठिकाणी उद्योग कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या प्रसंगी श्रीमती कांबळे बोलत होत्या. यावेळी पश्चिम भारत विभाग अध्यक्ष अविनाश जगताप, राष्ट्रीय समन्वयक श्रीमती मैत्रेयी कांबळे, महाराष्ट्र उपाध्यक्ष श्रीमती निवेदिता कांबळे, सातारा प्रमुख प्रसन्न भिसे, कोअर कमिटी सदस्य सचिन दिघोळकर, पुणे कार्यालयाचे प्रमुख रितेश रंगारी, सातारा जिल्हा उद्योग केंद्राच्या प्रकल्प अधिकारी श्रीमती शितल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्त २००५ साली सरकारने एक समिती नियुक्त केली होती. या समितीमध्ये पद्मश्री डॉ.कांबळे यांच्यासह १२ कॅबिनेट मंत्री व ६ तज्ञ लोकांचा समावेश असल्याचे सांगत स्टार्टअप योजना डॉ.आंबेडकरांना आदरांजली म्हणून भारत सरकारने सुरू केली. समाजाच्या आर्थिक विकासासाठीचा विचार डिक्कीचे प्रमुख डॉ.मिलिंद कांबळे यांचा होता म्हणून ही योजना भारत सरकारने कार्यान्वित केली. देशातील सुमारे सव्वा लाख बँकांमध्ये ही योजना सुरू केली आहे. या बँकांद्वारे विनातारण पतपुरवठा केला जात असून यातून सव्वा लाख उद्योजक तयार होणार असल्याचा विश्वास श्रीमती कांबळे यांनी यावेळी व्यक्त केला.
कार्यशाळेत अविनाश जगताप, सचिन दिघोळकर, श्रीमती मैत्रेयी कांबळे, यशस्वी उद्योजक प्रसन्न भिसे यांनी व्यवसाय विषयक मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रशांत गवळी, शुभम लादे, बाळासाहेब अहिवळे, संघराज अहिवळे, सुमित वायदंडे आदींनी परिश्रम घेतले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रसन्न भिसे यांनी केले. कार्यशाळेत सातारा, सांगली, पुणे जिल्ह्यातून नव उद्योजक उपस्थित होते.