(फलटण/प्रतिनिधी ) : “महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाने वृत्तपत्र संपादक व पत्रकारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत केलेल्या मागण्यांचा शासन सकारात्मक विचार करेल. हे प्रश्न सोडवण्यासाठी आपण मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून निश्चित प्रयत्न करू”, असे आश्वासन उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी दिले.
नागपूर हिवाळी अधिवेशनाचे औचित्य साधून उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार व फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक चव्हाण यांना संपादक संघाच्या वतीने अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ, उपाध्यक्ष कृष्णा शेवडीकर यांच्या मार्गदर्शनात संचालक बापूराव जगताप यांनी निवेदन सादर केले. त्यावेळी ना. अजितदादा पवार बोलत होते.
“वृत्तपत्रांचे अस्तित्व टिकले पाहिजे. त्याकरिता वृत्तपत्र संपादक व पत्रकारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सुटण्यासाठी अधिवेशनात लक्षवेधीद्वारे सभागृहाचे या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा आपण प्रयत्न करू”, असे आमदार दीपक चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान सदर निवेदनात, शासनमान्य वृत्तपत्रांना अधिस्वीकृती पत्रिका देण्याची मर्यादा वाढवावी, शासनाचे विभाग, महामंडळे यांच्या जाहिरातींचे वितरण शासकीय संदेश प्रसारण धोरणाप्रमाणे व्हावे, वृत्तपत्र पडताळणीतील जीएसटी देयकाची अट शिथिल करावी, डिजिटल माध्यमात काम करणाऱ्या पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका देण्याची तरतूद व्हावी, फलटण येथे उपजिल्हा माहिती कार्यालय सुरू करावे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विविध समित्यांवर संपादक संघाला प्रतिनिधित्व मिळावे आदी मागण्यांचा समावेश आहे.