हि बातमी ईतर भाषेत वाचा
ताज्या घडामोडी

‘ज्येष्ठ पत्रकार, लेखक, विचारवंत संजय आवटे’ यांचा ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने गौरव

पुणे, दि. २८ नोव्हेंबर : महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जे हक्क आपल्याला मिळवून दिले, ते जतन करण्यासाठी सर्वांनी एकत्रित लढण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले स्मृती दिनाच्या दिवशी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली दिला जाणारा ‘समता पुरस्कार’ यावर्षी ज्येष्ठ पत्रकार, लेखक, विचारवंत संजय आवटे यांना देण्यात आला. आज समताभूमी, फुलेवाडा, पुणे येथील कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामध्ये रुपये एक लक्ष, फुले पगडी, मानपत्र शाल आणि स्मृतीचिन्ह यांचा समावेश आहे. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, माजी मंत्री दिलीप कांबळे, मुस्लिम ओबीसी संघाचे शब्बीर अन्सारी, माजी सनदी अधिकारी महेश झगडे, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, श्रीमती संगीता नरके, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापू भुजबळ, महिला प्रदेशाध्यक्ष मंजिरी धाडगे, प्रदेश उपाध्यक्ष ॲड.सुभाष राऊत, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, सल्लागार गौतम बेंगाळे, पुणे विभागीय अध्यक्ष प्रीतेश गवळी, शहर अध्यक्ष पंढरीनाथ बनकर, महिला शहर अध्यक्ष वैष्णवी सातव,प्रयागा लोंढे यांच्यासह सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर तसेच राज्यभरातील समता सैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी रामटेक येथे एका दलीत बांधवांच्या झालेल्या हत्याकांडाविषयी चिंता व्यक्त केली. तसेच सध्याच्या परिस्थितीत उच्च नीचतेचे विषाणू कमी होण्या ऐवजी वाढताय का असा प्रश्न निर्माण होत आहे असा सवाल केला. तसेच हे चित्र बदलण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार समाजात तळागाळापर्यंत रुजवून त्यांचा वारसा पुढे नेण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत वर्णव्यवस्था पुन्हा डोकं वर काढत आहे. मात्र आपल्याला फुले, शाहू, आंबेडकरांनी समतेचा विचार दिला आहे. त्यामुळे अन्याय झाला झाला तर त्यावर आवाज उठवावाच लागेल. यासाठी सर्व समाजाने एकत्र येऊन आपला आवाज बुलंद करण्याची आवश्यकता असून आपल्या हक्कावर गदा येत असेल तर थांबायचे नाही असे आवाहन त्यांनी केलं.

ते म्हणाले की, भिडे वाड्यातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचा प्रश्न मार्गी लावला गेला आहे. हे काम लवकर सुरू करण्याची आवश्यकता आहे. तसेच फुलेवाडा स्मारकाचे विस्तारीकरण ही दोन्ही कामे मनपा प्रशासनाने पुढील दोन तीन महिन्यात हे काम सुरू करावे. अन्यथा जर काम सुरू झाले नाही तर आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नये असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला.

ते म्हणाले की, समता भूमी हे आपलं ऊर्जास्थान असून मागे काय केलं आणि पुढे काय करायचं याचा आढावा आपण या भूमीत दरवर्षी घेत असतो असे सांगत आजच्या कार्यक्रमात कितीही कल्पना केली तर हरी नरके हे आपल्यात नाही याचा विचार सुद्धा करता येत नाही. त्यांच्या जाण्याने आपलं मोठं नुकसान झालं असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.

ते म्हणाले की, राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू असून हे चित्र पहावत नाही. राज्यशासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी सत्काराला उत्तर देताना ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे म्हणाले की, अखिल महात्मा फुले समता पुरस्कार मिळाल्याने काम करण्याची जबाबदारी वाढली आहे. हा पुरस्कार म्हणजे जातीअंतासाठी असलेला पुरस्कार आहे. आपल्याला महात्मा फुले सारख्या महापुरुषांचा वारसा लाभला आहे. त्यांचा हा वारसा आपल्याला सर्वांना पुढे घेऊन जायचा आहे. जातीय तेढ वाढला की तोडगा धर्म पुढे येतो. त्यामुळे यातून बाहेर पाडण्यासाठी फुले, शाहू आंबेडकरांचेच विचारांवर जावं लागत असे प्रतिपादन त्यांनी केले. समतेमुळे सर्व समाजाच परिवर्तन झालं आहे. त्यामुळे परिवर्तनाच्या दिशेने गेलो तर माणसं नक्की बदलतात यावर आपला दृढ विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.

श्रद्धांजली

यावेळी स्व.शरद यादव, लेखक विचारवंत प्रा. हरी नरके, प्रा.शंकर बोऱ्हाडे यांच्या स्मृतीस अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आदरांजली अर्पण करण्यात आली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.नागेश गवळी तर आभार प्रदर्शन पंढरीनाथ बनकर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!