(गोखळी / प्रतिनिधी )दहाव्या गोवा लघुपट महोत्सवात गार्गी प्रॉडक्शन निर्मित असलेल्या “पाषाण” या लघुपटाला सर्वोत्कृष्ट मराठी लघुपटाचा बहुमान मिळाला असून या लघुपटाचे निर्माते गणेश काकडे तर लेखन व दिग्दर्शक रहेमान पठाण यांनी केले आहे.
पणजी येथील संस्कृतीभवन येथे ४ आणि ५ नोव्हेंबर रोजी आयोजित या लघुपट महोत्सवाचे पारितोषिक वितरण ज्येष्ठ लेखक, समीक्षक श्रीकांत कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. शंभरहून अधिक लघुपटांचे प्रदर्शन या महोत्सवामध्ये करण्यात आले होते. या लघुपटामध्ये ग्रामीण भागातील जीवन आणि सामाजिक परिस्थितीवर, एका शिल्पकराच्या व्यथेच्या माध्यमातून भाष्य करण्यात आले असून लहान मुलाच्या मनातील अस्वस्थता ही अतिशय उत्तम पद्धतीने मांडण्यात आली आहे.
यावेळी लघुपटाचे निर्माते गणेश काकडे व दिग्दर्शक रहेमान पठाण म्हणाले, सामाजिक विषय घेऊन गार्गी प्रॉडक्शनच्या माध्यमातून ‘पाषाण’ या लघुपटाची निर्मिती करण्यात आली आहे. लघुपटाचे चित्रीकरण अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा फाटा व नागापूर (ता. नेवासा) या ठिकाणी झाले असून या लघुपटाच्या चित्रीकरणा दरम्यान गावकऱ्यांनी मोठे सहकार्य केले असल्याचे त्यांनी सांगितले.
या लघुपटात नामवंत अभिनेते राजकुमार तांगडे, कांचन काकडे, बालकलाकार आयुष देवकर यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. तर वेदांत काकडे, हर्ष सोसे, ज्ञानेश जाधव, बाबा बेलापुरकर यांनी सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. या लघुपटाची सहाय्यक ग्रूपमध्ये छायाचित्र चैतन्य साळुंके, रंगभूषा मंगेश गायकवाड व पार्श्वसंगीत राजु चांदगुडे तर प्रमोद आगडे, उदय गायकवाड, विजय शिंदे, बंडू हिप्परगे, किरण गायकवाड, महेश नाईक, यांनी तांत्रिक बाजू सांभाळली आहे. दरम्यान, वेगळे विषय घेवून त्याला न्याय दिल्याबद्दल चित्रपट अभ्यासक, समीक्षक आणि रसिकांचा उत्तम प्रतिसाद “पाषाण”ला मिळत आहे.