(राजाळे/प्रविण निंबाळकर) गणेश उत्सवानिमित्त आणि गौरीपुजना निमित्त सगळीकडे सजावटी करण्यात येतात. सध्या चांद्रयान ३ ची सजावट जास्त पाहण्यात येत आहे. अशीच मठाचीवाडी येथील सौ.पल्लवी किशोर कदम यांनी मात्र भारतीय कर्तुत्ववान स्त्रियांचा देखावा करून वेगळीच सजावट केलेली पाहण्यात येत आहे.
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः म्हणजे जेथे स्त्रियांची पूजा केली जाते त्यांना मान दिला जातो तेथे देवता आनंदाने राहतात.पण खरंच स्त्रियांना मान दिला जातो का? त्यांची पूजा केली जाते का..? कारण चूल आणि मूल फक्त एवढ्यापुरतं तिचं आयुष्य न राहता ती आता प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर होताना दिसतेय.
पण या धावपळीत तिला घरातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. मुलांचं आवरणे, मुलांच्या शाळेच्या जबाबदाऱ्या, घर आवरणे, अन् धावपळीत गाडी पकडून कामावर वेळेत पोहोचणे , कामावरील ताणतणाव, आणि पुन्हा संध्याकाळी घरातील काम. खरंतर या सर्वामध्ये ती अगदी पिळून जातेय पण तरीही तिच्या चेहऱ्यावर आनंदच. असे कितीतरी छोटे छोटे पण महत्त्वपूर्ण संदेश त्यांनी द्यायचा स्तुत्य प्रयत्न केला आहे.
“बहिण” मनमोकळ करण्याची एक हक्काची जागा, मुलगी भार नाही तर जीवनाचा आधार आहे.
मावशी म्हणजे आईचं दुसर रूप “मुलगी” आहे अंगणाची तुळस तीच अस्तित्वाची कळस,”ताई”- म्हणजे आई नंतरची आई , “आई” आपलं आयुष्य झिजवते इतरांसाठी “बायको” – सुखदुःखात साथ देते.अश्या संदेशांद्वारे नात्यांमध्ये असलेली भावनिक गुंफण त्यांनी या उत्सवाच्यानिमित्ताने मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
त्याचबरोबर जिजाऊ, मदर तेरेसा, सावित्रीबाई फुले, किरण बेदी , कल्पना चावला यासारख्या कितीतरी स्त्रियांनी या समाजात प्रबोधन करण्याचे काम केले आहे. त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे.
सण म्हणजे फक्त साजरा करणे न्हवे. पर्यावरणाचा ऱ्हास करत ज्याप्रमाणे आपल्या इथे सण किंवा उत्सव साजरे केले जातात त्या सर्वांसाठी हे एक उदाहरण म्हणून ठरेल. जर सन- उत्सव समाजोपयोगी ठरत असतील तर त्यांचा स्वागत समाज नक्कीच करेल खरंतर पल्लवी कदम यांचा हा संदेश ग्रामीण भागातील मुलींना, स्त्रियांना बळ तर देईलच. सध्या ऐतिहासिक महिला आरक्षण विधेयक एकमताने ज्याप्रमाणे मंजूर केलंय त्याप्रती महिलांतर्फे स्वागतच म्हणावे लागेल.