हि बातमी ईतर भाषेत वाचा
ताज्या घडामोडी

लम्पी आजार नियंत्रण व बाधीत पशू धनासाठी उपचार त्वरित करा : प्रांताधिकारी सचिन ढोले

(अजिंक्य आढाव/ जावली): पशू पालक शेतकऱ्यांना त्यांच्या गो – वर्ग पशू धनातील विषाणूजन्य आजार नियंत्रित ठेवण्यासाठी तसेच बाधीत पशू धनासाठी योग्य व पुरेसे वैद्यकिय उपचार त्वरित मिळतील यासाठी प्राधान्याने प्रयत्न करण्याचे आवाहन करताना आवश्यक औषध साठा पुरेसा उपलब्ध करुन घेण्याबाबत, वंचित पशूधन यांना लसीकरण करुन घेण्याबाबत सक्त सुचना प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केल्या आहेत.

फोटो : लम्पी आजार आढावा बैठकीत बोलताना प्रांताधिकारी सचिन ढोले शेजारी व समोर उपस्थित अन्य अधिकारी.

फलटण तालुक्यातील लम्पी आजार नियंत्रण उपाय योजना आणि बाधीत पशू धनासाठी प्राधान्याने उपचार या बाबतीत पशू वैद्यकिय उपचार विभागाचे अधिकारी आणि पशू वैद्यक यांची बैठक प्रांताधिकारी कार्यालयात घेण्यात आली. त्यावेळी मार्गदर्शन करताना प्रांताधिकारी सचिन ढोले बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी सी. ए. बोडरे, पशू संवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. व्ही. टी. पवार, पशूधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती फलटण डॉ. नंदकुमार फाळके यांच्यासह तालुक्यातील सर्व पशूधन विकास अधिकारी उपस्थित होते.
लम्पी आजारांबाबत पशू पालक शेतकऱ्यांना त्वरित प्रतिसाद देणे, औषधांचा साठा उपलब्ध करणे आणि लसीकरण १०० टक्के पूर्ण करणे ही उद्दिष्टे निर्धारीत करुन त्याच्या पूर्ततेसाठी योग्य नियोजन व कार्यवाही करण्याचे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले.
लम्पी चर्म रोग हा आजार गो – वर्ग पशूधनामधील विषाणूजन्य आजार असून त्यामध्ये बाधीत जनावरांमध्ये ताप, अंगावर गाठी, पायावर सूज, भूक मंदावणे, लसीका ग्रंथींना सूज येणे अशा प्रकारची लक्षणे दिसून येतात. सदर लक्षणे दिसून आल्यास पशू वैद्यकीय दवाखान्याशी तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी गट विकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांनी केले.
लम्पी आजाराची लक्षणे दिसलेले जनावर प्राधान्याने विलगीकरण करण्यात यावे आणि त्यास पशू वैद्यक यांच्या मार्फत योग्य शुश्रूषा व उपचार करण्यात यावे. सदर रोगाचा प्रसार डास, गोचीड, माशा वगैरे चावणाऱ्या कीटकांमार्फत होत असल्याचे निदर्शनास आणून देत सदर प्रसार टाळण्यासाठी गोठ्याची स्वच्छता आवश्यक आहे. गोठ्याची स्वच्छता करण्यासाठी कीटकनाशकांचे द्रावण, तज्ञ पशू वैद्यकीय अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली गोठ्यामध्ये फवारण्यात यावे, तसेच गोठा निर्जंतुकीकरण करण्यासाठी १ % फॉरमेलीन, २ % सोडियम हायपो क्लोराईड, ३ % फेनोल यापैकी द्रावण वापरावे तसेच परिसर स्वच्छता इत्यादी बाबींचे योग्य नियोजन करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त पशूसंवर्धन डॉ. व्ही. टी. पवार यांनी केले.
बाधीत जनावरांचा आहार संतुलित आणि सकस असल्यास उत्तम प्रतिकार शक्ती राहते. मऊ, हिरवा, लुसलुशीत चारा, चांगल्या प्रतीची प्रथीने, ऊर्जा युक्त खुराक, मुबलक पाणी असावे तसेच आहारात नियमितपणे जीवनसत्व, खनिज क्षार मिश्रणे, प्रतिकार शक्ती वर्धक तसेच यकृत वर्धक औषधे देण्याच्या सूचना पशू धन विकास अधिकारी नंदकुमार फाळके यांनी केल्या.
पाय पोळीवरील सूज असल्यास मिठाच्या संतृप्त गरम द्रावणाचा सुती कपड्याच्या सहाय्याने दिवसातून दोन वेळा उत्तम शेक द्यावा. जखमा झाल्या असतील तर ०.१ % पोटॅशियम परमॅग्नेटच्या द्रावणाने धुवून घेतल्यानंतर आयोडीन लावावे. माशा व इतर बाह्य परजीवी बसू नयेत म्हणून हर्बल स्प्रे चा वापर करण्याचे आवाहन पशू धन विकास अधिकारी नंदकुमार फाळके यांनी केले.
उपचाराधीन ५ जनावरे आहेत. तालुक्यामध्ये ९८ हजार १६६ जनावरांचे प्रभावीपणे लसीकरण करण्यात आले असून ज्या पशू पालकांनी आपल्या पशू धनाचे अद्याप लसीकरण करुन घेतले नाही त्यांनी तात्काळ पशू वैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून लसीकरण करुन घ्यावे तसेच बाधीत जनावरांचे खरेदी विक्री व्यवहार करण्यात येऊ नये असे आवाहन पशू संवर्धन विभागा मार्फत करण्यात आले आहे.
बैठकीस पशूधन विकास अधिकारी आदर्की डॉ. जी. के. नेवसे, पशूधन विकास अधिकारी फलटण डॉ. किरण देवकाते, पशूधन विकास अधिकारी साखरवाडी डॉ. एस. एस. भुजबळ, पशूधन विकास अधिकारी गिरवी डॉ. पी. एम. मोरकाने, पशूधन विकास अधिकारी आसू डॉ. ए. डी. राजे, पशूधन विकास अधिकारी बरड रुपनवर, सहाय्यक पशूधन विकास अधिकारी पाडेगाव एस. एस. मोरे, पशूधन पर्यवेक्षक हिंगणगाव एच. ए. मेटकरी, पशूधन पर्यवेक्षक तरडगाव डी. एस. काळेल, पशूधन पर्यवेक्षक जिंती जे. व्ही. फडतरे, पशूधन पर्यवेक्षक गुणवरे भगत, पशूधन पर्यवेक्षक ढवळ व्ही. बी. कदम, पशूधन पर्यवेक्षक घाडगेवाडी तांबोळी, पशूधन पर्यवेक्षक पंचायत समिती फलटण एस. एस. गावडे, पशूधन पर्यवेक्षक पंचायत समिती फलटण बनकर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!