(फलटण/ प्रतिनिधी)फलटण तालुक्यात आत्तापर्यंत हजारो ट्रान्सफार्मर चोरीला गेले आहेत. वीज महावितरणच्या तक्रारीनंतर पोलीस स्टेशनने डीपी चोरीचे हजारो एफ आय आर दाखल केले आहेत. परंतु डीपी चोरी थांबत नाही. कोण आवळणार डीपी चोरांच्या मुसक्या ? अखंडपणे डीपी चोरी सातत्याने फलटणमध्ये सुरू आहे. डीपी चोरी कधीही थांबली गेली नाही. यामध्ये शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे व होत आहे. याची दखल प्रशासन घेणार आहे की नाही असा संतप्त सवाल करत फलटण हा डीपी चोरांचा तालुका म्हणून घोषित करणेच फक्त बाकी असुन सरकारने व प्रशासनाने ही औपचारिकता देखील पूर्ण करावी.
प्रजा गट व फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागणीनंतर डीपी चोरी या विषयावर 10 डिसेंबर 2024 रोजी एक तालुकास्तरीय बैठक पार पडली. परंतु डीपी चोरी काही थांबली नाही. डीपी चोरांनी या तालुकास्तरीय बैठकीला अजिबात भीक घातली नाही. उलट या तालुकास्तरीय बैठकीची अक्षरशः पुरती पिसे काढली. ही गोष्ट प्रशासनासाठी अजिबात सन्मानजनक नाही. रोज डीपी चोरी होत आहे. हे सत्य आहे आणि संपूर्ण फलटण तालुका हे पाहत आहे, संपूर्ण फलटण तालुक्याला हे ज्ञात आहे. डीपी चोरांना कोणत्याही प्रकारचे भय फलटण तालुक्यात डीपी चोरी करण्यासाठी वाटत नाही. डीपी चोरांच्या या निर्भयी धाडसाला व आत्मविश्वासाला कोण जबाबदार आहे ? शेतकरी मात्र सातत्याने होत असलेल्या डीपी चोरीमुळे व शेत पिकांच्या नुकसानीमुळे प्रचंड भयभीत झालेला आहे. कधी थांबणार ही डीपी चोरी ? शेतकऱ्यांना भयमुक्त करण्यासाठी प्रशासन कधी पुढे येणार ? फलटण तालुक्यात कायदा व सुव्यवस्था शिल्लक राहिली आहे का ?
नुकत्याच झालेल्या 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनादिवशीच फलटण तालुक्यातील काशीदवाडी गावातील डीपी चोरीला गेला. त्यानंतर एक-दोन दिवसात डोंबाळवाडी गावातील आणखी एक डीपी चोरीला गेला. सातत्याने व अखंडपणे होत असलेल्या डीपी चोरीमुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीस आलेला आहे. सातारा जिल्ह्याला नुकतेच संतोष पाटील हे नवीन जिल्हाधिकारी लाभलेले आहेत. फलटणमध्ये आल्यानंतर ते फळांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या धुमाळवाडीत भेट द्यायला जातात. हरकत नाही. भेट द्यायलाच पाहिजे. परंतु हा संपूर्ण फलटण तालुका व तालुक्यातील शेतकरी डीपी चोरीने त्रस्त आहेत. दुर्दैवाने डीपी चोरीसाठी फलटण तालुका हा प्रसिद्ध होत चाललेला आहे. कधीतरी सातारा जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी या डीपी चोरी होत असलेल्या प्रसिद्ध फलटण तालुक्याला भेट द्यावी व फलटण तालुक्याची समस्या कायमची सोडवावी.
कधी नव्हे ती, चार चार कॅबिनेट मंत्री पदे या जिल्ह्याला लाभलेली आहेत. आदरणीय सर्व मंत्री महोदयांनी फलटण तालुक्यात गांभीर्याने लक्ष घालून डीपी चोरी थांबवण्याचे आव्हान स्वीकारून शेतकऱ्यांना भयमुक्त व नुकसानमुक्त करणे अपेक्षित व अत्यावश्यक आहे.
फलटण धडधडतंय – वाचा आणि थंड बसा
आपला नम्र जनसेवक
प्रदिप हरिभाऊ झणझणे
प्रजा गट फलटण
जनसंपर्क कार्यालय फलटण
संपर्क क्रमांक : 8600138961, 7774096430