(फलटण /प्रतिनिधी ): फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री.सुधीर चिंतामण अहिवळे यांची २८ जानेवारी २०२५ रोजी शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेनंतर सेवापूर्ती होत आहे.
श्री.सुधीर अहिवळे यांचा शैक्षणिक व प्रशासकीय प्रवास अतिशय दैदिप्यमान राहिला आहे. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण फलटण नगर परिषदेच्या शाळा नं. २ मधून पूर्ण केले.त्यांनी माध्यमिक शिक्षण मुधोजी हायस्कूल व महाविद्यालयीन शिक्षण मुधोजी महाविद्यालय फलटण येथून पूर्ण केले.पुढे त्यांनी बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान मधून बीएड(शिक्षणशास्त्र) पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी फलटण एज्युकेशन सोसायटीमध्ये अध्यापनाच्या पवित्र कार्याला सुरुवात केली. त्यांनी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या विविध विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये अध्यापनाचे कार्य केले.त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात नवचैतन्य हायस्कूल,गोंदवले बु.येथे १९९३ ला शिक्षक म्हणून सेवेत दाखल झाले.पुढे आसू,पवारवाडी, म्हसवड, मालोजी राजे शेती विद्यालय येथे काम करताना शैक्षणिक क्षेत्रात अध्यापना सोबतच आपल्या कार्यकर्तृत्वाने प्रशासकीय कार्याचाही वेगळाच ठसा उमटवला. मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये उपप्राचार्य म्हणून विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या विकासासाठी त्यांनी खूप मोठे योगदान दिले. त्यांच्या कारकिर्दीमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा मराठी व भूगोल विषयात 100% निकाल कायम राहिला आहे.
समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांच्या प्रती असलेली त्यांची तळमळ, शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न, प्रशालेच्या आणि संस्थेच्या प्रशासकीय कामात वेळोवेळी दाखवलेले कौशल्य आणि सामाजिक कार्यामध्ये तन, मन, धनाने दिलेले योगदान यामुळे सुधीर अहिवळे यांची प्राचार्य म्हणून विधानपरिषद माजी सभापती विधान परिषदेचे आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवून नियुक्ती केली.त्यांनी सर्वांचा विश्वास सार्थ ठरवून शिक्षण क्षेत्रात अतुल्य असे योगदान दिले.
त्यांच्या गौरव समारंभाचे आयोजन २८ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता मुधोजी हायस्कूल, फलटण येथे करण्यात आले आहे.तरी श्री सुधीर अहिवळे सर यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व तमाम मित्र व सहकाऱ्यांना आग्रहाचे निमंत्रण आहे.