(फलटण/प्रतिनिधी)- रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची मुत्सद्देगिरी, ॲड. जिजामाला यांचे उत्कृष्ट व आश्वासक नियोजन आणि समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची जोरदार व काहीशी करारी साद आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांच्या विक्रमी सभा आणि त्यांच्या कार्यशैलीवर असणारा जनतेचा विश्वास,सोबत जनतेने दिलेला प्रतिसाद यातूनच अटीतटीच्या ठरलेल्या या विधानसभा निवडणुकीत मागील तीन पंचवार्षिक निवडणुकीत आमदार राहिलेल्या विद्यमान आमदार दीपकराव चव्हाण यांना धूळ चारत हा विजय मिळवला आहे……!_ फलटणसह जिल्ह्याचे राजकारण हे एका व्यक्ती भोवती एकवटलं जातं ती व्यक्ती म्हणजे रामराजे नाईक निंबाळकर त्यांच्या नाका खालून ही निवडणूक काढून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी हा ऐतिहासिक विजय मिळवला आहे. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने हा विजय प्राप्त करून राजे गटाला पर्यायाने श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना लोकसभेमध्ये केलेल्या पराभवाचा वाटपा काढला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
२५५ फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघातून विद्यमान सचिन कांबळे पाटील यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी सचिन कांबळे पाटील यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांना धूळ चारत ऐतिहासिक विजय मिळवला.अत्यंत अटीतटीच्या बनलेल्या या लढाईकडे संपूर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. दोन्ही निंबाळककरांच्या या प्रतिष्ठेच्या लढाईमध्ये राजे गटाचे अनेक दिग्गज नेते हे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या गटात सामील होत असताना राजे गटाचे बलाबल कमी होत चालले होते.रामराजे नाईक निंबाळकरांनी पहिल्यापासूनच २००९, २०१४ आणि २०१९ सारखाच दिपकराव चव्हाण यांच्यावर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे याही निवडणुकीमध्ये आपला फलटणचा गड राखण्यात रामराजे नाईक निंबाळकर यांना यश येईल असे बोलले जात असले तरी ते झाले नाही. तिन्ही वेळ तोच उमेदवार दिल्यामुळे चौथ्या वेळ हा उमेदवार बदलावा अशी जनतेची अंतर्गत मागणी होती. परंतु राजे गटाने पर्यायाने रामराजे नाईक निंबाळकर यांनी उमेदवार बदलला नाही. त्यामुळे या निर्णयाबाबत जनता नाराज होती.
अत्यंत प्रतिष्ठित ठरलेल्या या निवडणुकीमध्ये मूळचे भाजपचे फलटण कोरेगाव विधानसभा प्रमुख असलेले सचिन कांबळे पाटील यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश घेतला आणि फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीमार्फत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवली.राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये आलेल्या दीपक चव्हाण यांना चौथ्यांदा निवडून आणण्याचे आव्हान संपूर्ण राजे परिवारावर व राजे गटावर होते.राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांनी दीपक चव्हाण यांच्या प्रचारार्थ सभा ही घेतली. परंतु मतदारांवर त्याचा फारसा परिणाम झाला नाही. दुसऱ्या बाजूला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या गटात गेलेले विलासराव नलवडे, माणिकराव सोनवलकर, डि.के पवार, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शिवरूपराजे खर्डेकर यांच्या जाण्यामुळे राजे गटावर परिणाम झाला.
या निवडणुकीत प्रल्हादराव साळुंखे पाटील, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषद व जिल्हा नियोजन मंडळ माजी सदस्या ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर, निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक माणिकराव सोनवलकर, महानंदचे माजी व्हा. चेअरमन डी.के. पवार, संतकृपाचे विलासराव नलवडे, भाजप जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, भाजप अध्यात्म आघाडीचे अध्यक्ष अशोकराव जाधव, सुशांत निंबाळकर, शिवसेना तालुकाध्यक्ष नानासाहेब तथा पिंटू इवरे यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी खूप प्रयत्न केले. त्यांच्या अथक प्रयत्नामुळे या मतदारसंघात विजयी मिळवणे शक्य झाले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे राजे गटाचे प्रमुख श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत शिवांजलीराजे संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर,श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, सह्याद्री चिमणराव कदम यांनी खूप कष्ट घेतले. राजे परिवारातील युवा पिढीने संपूर्ण फलटण शहर, शहरांमधील सर्व पेठा, वार्ड अशा पदयात्रा काढून घर टू घर प्रचार केला.व आवश्यकतेनुसार तालुक्यातील विविध गावांमध्ये, वाड्या – वस्त्यांवर, त्या त्या ठिकाणच्या ग्रामदैवताला याचना करून दीपक चव्हाण यांना चौथ्यांदा निवडून देण्यासाठी प्रार्थना केली.परंतु जनतेने मात्र त्यांना प्रतिसाद न देता रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला.
राजे गटावर प्रेम करणाऱ्या फलटण कोरेगाव मतदार संघातील सामान्य जनतेचे मात्र घोर निराशा झाली.महायुतीचे व रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे निकटवर्तीय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार सचिन कांबळे पाटील यांच्या पाठीमागे रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी खूप ताकद निर्माण केली. मतदारसंघात अक्षरशः वारेमाप पैसा खर्च करण्यात आला. मूळचे राजे गटात दुखावल्यामुळे अनेक दिग्गज नेते,कार्यकर्ते आपल्या स्वतःच्या अडचणीमुळे बळी पडून खासदार गटात म्हणजेच भाजप चे मा.खा.रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना जाऊन मिळाले.त्यामुळे सचिन कांबळे पाटील यांचा विजय सुकर झाला.
या मतदारसंघात सुरुवातीपासून आणखी दोन उमेदवार तुल्यबळ मानले जात होते.त्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दिगंबर आगवणे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रा.रमेश आढाव यांचे आवाहन उभे केल्याचे चित्र दिसत होते तरी प्रत्यक्षात मात्र ते दिसले नाही.दिगंबर आगवणे हे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे मतदान आपल्याकडे वळवतील व प्रा.रमेश आढाव हे राजे गटाचे म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवाराचे मतदान आपल्याकडे वळवतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. परंतु या दोघांनाही या मतदारसंघांमध्ये आपला प्रभाव पाडता आला नाही.
२०२४ च्या विधानसभा निवडणूकीत महायुतीचे उमेदवार म्हणून सचिन कांबळे पाटील यांनी विजय मिळवला असला तरी निवडणुकीपूर्वी जनतेला त्यांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये अनेक आश्वासने दिली आहेत.या आश्वासनाचा पुनरुच्चार साखरवाडी, फलटण व पिंपोडे येथील सभेत अजितदादा पवार यांनी केला.त्यामुळे येत्या पुढील पाच वर्षात फलटणची बारामती करण्यासाठी निधीची गरज आहे.त्यासाठी नुसते बोलून फलटणची बारामती होणार नाही त्यासाठी निधी उपलब्ध करून घेण्याचे काम सचिन कांबळे पाटील यांच्या माध्यमातून रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना करावे लागणार आहे.तरुणांमध्ये वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव, फलटणमध्ये उच्च शिक्षणासाठी असणाऱ्या कमी संधी, नाईकबोमवाडी या ठिकाणी रखडलेला औद्योगिक विकास महामंडळाचा प्रश्न, शासकीय दूध संघाला ऊर्जेत अवस्था आणणे, कालव्यांची उर्वरित काम मार्गी लावणे. कमिन्स सारख्या मल्टिनॅशनल कंपनीचे अनेक नवीन प्लांट उभे करणे, फलटणसाठी व महिलांसाठी विशेषता अद्यावत सुसज्ज हॉस्पिटल उभे करणे.यासोबत तालुक्यातील सर्व खेडेगावातील रस्ते,पाणंद रस्ते व सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फलटणमध्ये बोकाळलेली गुंडशाही दहशतीचे वातावरण कमी करण्यावर भर द्यावा लागेल. त्यामुळे येणाऱ्या काळात फलटणच्या विधायक विकासासाठी रणजितसिंह निंबाळकर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन कांबळे पाटील यांना अजितदादा पवार यांच्या सहकार्याने निधी मिळवून विकास कामे मार्गी लावावी लागतील. येत्या काळात ते हा समतोल कसा साधतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.