हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

जयश्री आगवणे यांच्या मतदारसंघातील भेटीगाठीमुळे प्रस्थापित पक्षाच्या उमेदवारांची चिंता वाढली ; जयश्री आगवणे यांच्या भेटीदरम्यान दिगंबर आगवणे यांनी केलेल्या मदतीतून उतराई होण्याचा मतदार देतायेत विश्वास

फलटण : अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या २५५ फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघातून राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने विधानसभेची निवडणूक लढवणारे दिगंबर आगवणे यांच्या पत्नी जयश्री आगवणे या निवडणुकीच्या निमित्ताने २५५ फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील गावनिहाय वाड्या वस्त्यांवर भेटी देऊन मतदानासाठी आवाहन करत आहेत. त्यांनाही वाढता प्रतिसाद मिळत असून महाविकास आघाडी व महायुती च्या उमेदवारांनी धसका घेतल्याचे चित्र आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे विश्वासू व भारतीय जनता पार्टी चे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) गटाचे सचिन कांबळे पाटील हे महायुती चे अधिकृत उमेदवार असून महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(शरद पवार)पक्षाचे व राजे गटाचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण हे चौथ्यांदा याच मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात उमेदवार असणारे दिगंबर आगवणे सध्या त्यांच्यावर झालेल्या अनेक गुन्ह्यांच्या तपासासाठी कारागृहामध्ये असल्याने सर्व प्रचाराची धुरा त्यांच्या पत्नी जयश्री आगवणे या सांभाळत आहेत. आपल्या मोजक्या कार्यकर्त्यांसह दिगंबर आगवणे यांच्यासोबत काम केलेले पूर्वीचे निष्ठावंत कार्यकर्ते, नेते, ग्रामीण भागातील पदाधिकारी यांच्या भेटी घेऊन या निवडणुकीमध्ये दिगंबर आगवणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना या निवडणुकीत विजयी करण्याचे आव्हान त्या करत आहेत. दिगंबर आगवणे यांनी यापूर्वी कोरोना काळात लोकांना केलेली मदत आज ही लोक विसरले नाहीत.त्यांनी या काळात किराणामाल, सुसज्ज हॉस्पिटल सोबत ऑक्सीजन बेडची व्यवस्था करून लोकांना केलेल्या वैद्यकीय सहकार्याची आठवण या भेटीदरम्यान लोक सांगत आहेत. गोरगरीब कष्टकरी लोकांना याच काळात किराणा साहित्य, पाणीटंचाईच्या काळात स्वतःच्या पैशातून टँकरने पाणीपुरवठा, गोरगरिबांच्या मुला-मुलींच्या लग्नामध्ये आर्थिक मदत, मुलांच्या शिक्षणासाठी केलेली मदत, रोजगार असेल, अडीअडचणीच्या काळात गोरगरीब जनतेला केलेली मदत असेल त्यामुळे अनेक लोक या भेटीदरम्यान आपल्यावर केलेल्या उपकाराची परतफेड करण्याची तयारी दाखवून जयश्री आगवणे यांना बळ देण्याची भाषा बोलू लागले आहेत.

दिगंबर आगवणे हे मागासवर्गीय समाजातील असूनही आपल्या स्वकर्तृत्वाने त्यांनी फलटणच्या राजकीय, सामाजिक व आर्थिक विकासामध्ये आपला खूप कमी कालावधीमध्ये नावलौकिक मिळवला होता. परंतु प्रस्थापित पक्षातील नेत्यांना,आणि त्यांच्या समर्थकांनी तयार होत असलेले त्यांचे नेतृत्व भविष्यातील धोक्याची घंटा आहे असं वाटल्यामुळे त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले. त्यांच्यावर झालेल्या गुन्ह्यांचा तपास सुरू असून प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने त्यावर भाष्य करता येणार नाही. परंतु दिगंबर आगवणे यांचे कुटुंब अतिशय अडचणीतून अजूनही जात असताना आपल्या न्याय हक्कांसाठी त्यांच्या पत्नी जयश्री आगवणे यांनी कंबर कसली असून त्यांनी या मतदारसंघात फॉर्म भरण्याच्या आधीपासूनच काही महिने सोशल मीडियाच्या माध्यमातून निवडणूक लढण्याची तयारी केली होती.

सद्यस्थितीमध्ये व येणाऱ्या काळातही अनेक अडचणींचा सामना करावा लागणार असल्याचे माहित असतानाही आपल्या राजकीय हक्कासाठी त्या स्वतः मैदानात उतरल्या असून त्यांना राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते पक्षप्रमुख मा.आम.महादेव जानकर, पक्षाचे जिल्हा व तालुका स्तरावरील सर्वच नेते, राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांचं पाठबळ मिळालं असल्याने त्यांची मदत या प्रचार कार्यामध्ये त्यांना होत आहे. माजी मंत्री, मा.आमदार महादेव जानकर यांच्यासोबत त्यांचा महायुतीतील मित्र पक्ष असणाऱ्या भाजपने राष्ट्रीय समाज पक्ष संपवण्यासाठी केलेला प्रयत्न व दिलेला त्रास लोकांना माहीत असल्याने धनगर समाज ही आता जागा झाला आहे. जयश्री आगवणे या कशाचीही तमा न बाळगता स्वतः गाव टू गाव व वाड्या वस्त्यांवर स्वतः जाऊन मतदारांच्या भेटी घेत आहेत.या भेटीदरम्यान निवडणुकीमध्ये पती दिगंबर आगवणे यांना मतदान करण्याचे आवाहन त्या करत आहेत आणि. त्यांच्या या प्रचार कार्यामुळे प्रस्थापित महाविकास आघाडी व महायुती यांची चिंता वाढली आहे. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये दिगंबर आगवणे यांचा एक मतदार असून दिगंबर आगवणे यांनी केलेल्या मदतीमुळे तो त्यांनाच मतदान करणार असल्याचे चित्र आहे. त्यातच त्यांना राष्ट्रीय समाज पक्षाची मदत मिळाल्याने त्यांचे पारडे जड मानले जात असून ही निवडणूक दुहेरी न होता तिहेरी होण्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी व महायुतीने आपल्या प्रचार कार्याचा वेग वाढवला असून आपल्यापासून बाजूला गेलेले व मूळचे आपल्याच पक्षाचे किंवा गटाचे असणारे नेते व कार्यकर्ते यांना पुन्हा एकत्र आणून त्यांची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.

पती दिगंबर आगवणे हे कारागृहात असतानाही आणि बाहेर प्रचंड संकटाचा सामना करूनही जयश्री आगवणे या पती दिगंबर आगवणे यांचा प्रचार करत असून त्यांच्या या धाडसाबद्दल संपूर्ण मतदारसंघातील लोकांमध्ये कुतूहल व त्याची सहानुभूती आहे ती त्यांना मिळत आहे. तेव्हा येणाऱ्या काळात फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक रंगतदार होणार असल्याचे चित्र समोर येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!