हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

येणाऱ्या काळासाठी बौद्ध समाजाची एकजूट महत्वाची, फुट पाडू पाहणाऱ्या शक्तींपासून सावध राहा

(फलटण/ प्रतिनिधी)-अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या २५५ फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारांची प्रमुख लढत ही आता निश्चित झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने म्हणजेच महाविकास आघाडीच्या वतीने श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे राजे गटाचे निष्ठावंत विद्यमान आमदार दीपक चव्हाण व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे विश्वासू व भारतीय जनता पार्टीच्या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे म्हणजेच महायुतीचे अधिकृत उमेदवार सचिन पाटील अशी थेट दुहेरी लढत होत आहे.

दोघांनीही बौद्ध समाजाचा उमेदवार न दिल्यामुळे बौद्ध समाजामध्ये नाराजीचं वातावरण आहे. बौद्ध समाजाच्या वतीने संविधान समर्थन समितीच्या वतीने सर्वच राजकीय पक्षांकडे या मतदारसंघात उमेदवारी मागण्यात आली होती. परंतु अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या फलटण- कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या स्थापनेपासूनच महार जातीचा म्हणजेच बौद्ध समाजाचा उमेदवार न देण्याचं अलिखित धोरण दोन्ही पक्षांनी पाळले आहे. त्यामुळे बौद्ध समाजामध्ये याचा प्रचंड रोष आहे. नैसर्गिक न्यायाच्या दृष्टीने एखाद्या समाजाला त्याच्या राजकीय हक्कांपासून बहिष्कृत करणं, वंचित ठेवणं हे न्याय आणि नीतीला धरून नाही. परंतु राजकारणामध्ये न्याय,नीती व नैतिकता असण्याचा काळ आता उरलेला नाही.कोणीही कोणत्याही पक्षात प्रवेश करत आहे. प्रत्येक पक्षाची विचारधारा ठरलेली असताना आता त्या विचारधारेपेक्षा जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या तडजोडी व आघाड्या करण्याचा नवा प्रघात सुरू झाला आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या विचारसरणी या खुंटीला टांगून ठेवल्या आहेत. दुसऱ्या बाजूला सर्वच राजकीय पक्षांमध्ये घराणेशाही असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. सर्वच राजकीय पक्ष फुले, शाहू आंबेडकरांचे नाव घेत असले तरी महाराष्ट्राच्या राजकारणात तीच निवडक घराणी सत्ता स्थानी कायम आहेत. इथल्या गरीब कष्टकरी मराठा समाजापासून ते अनुसूचित जाती – जमातीतील सर्वसामान्य गरीब समाजातील नेतृत्वाला कोणताही थारा कोणताही पक्ष देत नाही.

बौद्ध समाजाची मागणी रास्त असताना सुद्धा त्यांना डावलण्यात आले आहे. कारण याच प्रस्थापित पक्षांचे धोरण स्पष्ट आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या २५५ फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून पूर्वाश्रमीच्या महार व आताच्या बौद्ध समाजाला व त्यांच्या खालोखाल मातंग समाजाला उमेदवारी द्यायची नाही या मुद्द्यावर सर्वच प्रस्थापित पक्ष हे एकच आहेत.त्यामुळे ते आताच काय पण येणाऱ्या काळातही बौद्ध समाजाला व मातंग समाजाला उमेदवारी देणार नाहीत. आज दोन्ही निंबाळकरांचे प्रतिष्ठा पणाला लागली असून आपले आपले उमेदवार निवडून येण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. साम, दाम, दंड व गरज पडली तर भेद ही नीती अवलंबणार आहेत.तेव्हा येणाऱ्या काळासाठी बौद्ध समाजाची एकजूट महत्वाची असणार आहे, फुट पाडू पाहणाऱ्या शक्तींपासून बौद्ध समाजाने सावध राहीले पाहिजे! बौद्ध समाजाची मते ही निर्णय ठरणार आहेत. त्यामुळे दोन्हीही आघाड्या काही करूनही मते आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्नशील असतील परंतु समाजाने या दोन्ही आघाड्यांना मतदान न करता तिसरा उमेदवार देऊन समाजाची ताकद दाखवून देण्याची गरज आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!