(जावली/अजिंक्य आढाव)- 255 फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ च्या उमेदवारीसाठी बौद्ध समाज करत असलेली मागणी अतिशय रास्त असून तोच समाज गेली पंधरा वर्षे प्रस्थापित पक्षाच्या व नेत्यांच्या आदेशाला ग्राह्य मानून एकाच जातीच्या उमेदवारांना सलग तीन वेळा निवडून देत आला आहे. हा मतदारसंघ राखीव झाल्यापासून सन २००९, २०१४,२०१९ असे सलग पंधरा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विद्यमान आमदार दीपक प्रल्हाद चव्हाण हे या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. या अगोदर या मतदारसंघातून श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनी १९५१,१९६२, कॉम्रेड हरिभाऊ निंबाळकर यांनी १९५७(कम्युनिस्ट पार्टी), डॉ.कृष्णचंद्र भोईटे यांनी १९६७,१९७२, श्रीमंत शिवाजी राजे नाईक निंबाळकर यांनी १९७८, चिमणराव कदम यांनी १९८०,१९८५,१९९०, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी १९९५,१९९९,२००४, दीपक चव्हाण यांनी २००९,२०१४,२०१९ असे सलग तीन पंचवार्षिक निवडणुकीमध्ये या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. असे असताना सुद्धा बौद्ध समाजाचा आमदार व्हावा असे या प्रस्थापित नेत्यांच्या व पक्षश्रेष्ठींच्या मनात का येत नाही? ५ पंचवार्षिक निवडणुकांचा अपवाद सोडला तर चाळीस वर्ष राजे परिवारातील व्यक्ती या मतदारसंघाचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नेतृत्व करत आला आहे.स्व. चिमणराव कदम यांनी १५ वर्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाच्या वतीने निवडणूक लढवून या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. उरलेली दहा वर्ष डॉ.कृष्णचंद्र भोईटे व एक पंचवार्षिक निवडणूक कॉम्रेड हरिभाऊ निंबाळकर यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. एवढे सगळे असताना फक्त पाच वर्ष बौद्ध समाज या मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची इच्छा बाळगून असताना त्यांना का डावललं जातंय याचे उत्तर या प्रस्थापित नेत्यांनी व पक्षश्रेष्ठींनी दिले पाहिजे. किती वर्ष अनुसूचित जातीतील संख्येने जास्त असणाऱ्या या बौद्ध समाजाला त्यांच्या राजकीय हक्कांपासून तुम्ही वंचित ठेवणार आहात? तसे पाहिले तर आतापर्यंत दीपक प्रल्हाद चव्हाण सोडले तर या मतदारसंघाचे नेतृत्व ६० वर्ष मराठा समाज करत आला आहे.
सर्वच प्रस्थापित पक्षांच्या नेत्यांनी व पक्षश्रेष्ठींनी बौद्ध समाजाबद्दल पूर्वग्रह दूषित विचार मनात ठेवून त्यांना त्यांच्या राजकीय हक्कांपासून वंचित ठेवण्याचे धोरण अवलंबलं आहे. हा एक प्रकारे बौद्ध समाजावर अन्यायच आहे. सर्वच प्रस्थापित नेत्यांच्या व प्रस्थापित पक्षांच्या समाजकारण, राजकारण, कला, क्रीडा साहित्य, संगीत क्षेत्रामध्ये बौद्ध समाजाने योगदान दिलेले आहे. फलटण तालुक्याच्या विधायक विकासामध्येही बौद्ध समाजाचे नेते, कार्यकर्ते व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेले लोकप्रतिनिधींनी कायमच आपलं योगदान दिलं आहे. तालुक्याच्या सर्वच शैक्षणिक क्षेत्रामध्ये बौद्ध समाजातील शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रयत्न केला आहे. कला, क्रीडा, साहित्य व संगीत क्षेत्रामध्ये फलटण तालुक्याचे नाव मोठे करण्याचा प्रयत्न बौद्ध समाजातील व्यक्तींनी केला आहे. आज बौद्ध समाजातील अनेक होतकरू, हुशार, बुद्धिमान व्यक्तींनी फुले, शाहू ,आंबेडकर यांचा विचार अंगीकारून मोक्याच्या व माऱ्याच्या जागा पटकावून वर्ग एक च्या पदावरती ते कार्यरत आहेत. आज पत्रकारितेमध्येही बौद्ध समाजाचा दबदबा आहे. असे कोणतेच क्षेत्र नाही की ज्यामध्ये बौद्ध समाजाने आपलं योगदान दिलेलं नाही. तरीही बौद्ध समाजाला त्यांच्या राजकीय हक्कांपासून वंचित का ठेवले जाते? हा महत्त्वाचा व कळीचा प्रश्न आहे. अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक अधिनियम म्हणजेच ॲट्रॉसिटी बद्दल लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा काम काही पक्ष, काही व्यक्ती, काही संघटना जाणीवपूर्वक करत आहेत. ॲट्रॉसिटी कायदा हा दलितांच्या वर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठी अस्तित्वात आला आहे. तुम्ही या समाजाशी सामाजिक समतेच्या भावनेने वागलात तर ॲट्रॉसिटी कायद्याचा वापर होणार नाही. काही प्रस्थापित राजकारणी आपल्या स्वार्थी राजकारणासाठी अनुसूचित जाती – जमातीतील व्यक्तींना हाताशी धरून आपल्या विरोधकावर सूड उगवण्याच्यासाठी जबरदस्तीने ॲट्रॉसिटी चा वापर करायला लावतात. यात अनुसूचित जाती जमातीतील व्यक्तींचा काय दोष आहे? त्यामुळे प्रस्थापित पक्षातील नेत्यांनी, जनतेने व पक्षांनी ॲट्रॉसिटी कायद्याची भीती मनात बाळगू नये.
बौद्ध समाजाचा उमेदवार देण्याच्या दृष्टीने संविधान संवर्धन समिती अतिशय विवेकी विचाराने प्रेरित होऊन आपल्याकडे उमेदवारीसाठी मागणी करत आहे. एवढी वर्षे या मतदारसंघाचे नेतृत्व तुम्ही केलेले आहे. येणारी पाच वर्षे बौद्ध समाजाच्या व्यक्तीला या मतदारसंघाचे नेतृत्व करून द्या. निश्चितच या मतदार संघातील सर्वच गाव खेड्यातील, वाड्या -वस्त्यांवरील, शहरातील विधायक विकास साठी बौद्ध समाजाचा आमदार कुठेही कमी पडणार नाही याची खात्री बाळगा. एकदा त्यांना संधी तर देऊन पहा. बौद्ध समाजाचा उमेदवार तुम्ही देऊन त्याला निवडून आणल्यानंतर तो तुम्हा सर्वांच्याच मार्गदर्शनाखाली या तालुक्याचा विकास करण्यासाठी कट्टीबद्ध असेल. कारण एवढी वर्षे या मतदारसंघाचे नेतृत्व तुम्ही लोक करत आलेला आहात. तुमचं मार्गदर्शन जर निवडून आलेल्या बौद्ध आमदाराला मिळालं तर निश्चित या तालुक्याचा विकास होईल. तुमच्या निर्णयाने सर्व समाजामध्ये सामाजिक समतेचा सुद्धा संदेश जाईल. दोन्ही पक्षातील तुम्ही दोन्ही निंबाळकरांनी ही निवडणूक आपल्या प्रतिष्ठेची केली आहे. बौद्ध समाजाच्या उमेदवारांच्या दृष्टीने तुम्ही दोघेही आमच्या दृष्टीने मार्गदर्शकाच्या भूमिकेत असाल. या तालुक्यात विधायक विकासाचं राजकारण व समाजकारण करत असताना चांगल्या सूचना जरूर अंमलात आणल्या जातील. कारण बौद्ध समाज हा आपल्यापेक्षा फुले, शाहू, आंबेडकर यांची विचारधारा मानणारा समाज आहे. त्यामुळे तो सर्व समावेशक भूमिका घेऊन, सर्वांना सोबत घेऊन काम करेल यात तीळ मात्र शंका नाही.
श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर म्हणतात की, ‘फलटणला भयमुक्त करायचं आहे!’ कोणापासून? एकदा बौद्ध समाजातील उमेदवार फलटणचा आमदार म्हणून निवडून आणा. पहा फलटण कसं भयमुक्त होतय. फलटण मध्ये वाढलेली गुंडशाही, दहशतीचे वातावरण आणि खुंटलेला विधायक विकास सर्व काही ठीक होईल.एकदा संधी तर देऊन पहा. कारण बौद्ध समाज हा कधीही कोणाला घाबरत नाही.त्याचा संविधानिक व्यवस्थेवर विश्वास आहे. प्रस्थापित घराणे शाहीच्यामध्ये अडकलेली लोकशाही मुक्त करायचे असेल सर्व समाजामध्ये सौहार्दपूर्ण वातावरण तयार करून तालुक्याचा विधायक विकास करायचा असेल तर बौद्ध समाजातील उमेदवार देऊन बौद्ध आमदार निवडून आणावा लागेल.
“आमचे प्रश्न जर सुटत नसतील तर आम्ही स्वतंत्र भूमिका घेऊन आम्ही आमचं राजकारण का उभं करू नये ?” असा सवाल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसला उद्देशून केला होता.त्याचे उत्तर आजपर्यंत मिळाले नाही. बौद्ध समाजाला आपण इतके खालच्या दर्जाच्या समजता काय? कॅबिनेट मंत्रीपद, राज्यमंत्री दर्जाची महामंडळावरील नियुक्ती हे सर्व नको.आम्हाला आमच्या हक्काची उमेदवारी देऊन निवडून आणा.येणाऱ्या काळात आम्ही कायम तुमच्या सोबत राहू. तुमच्या प्रतिष्ठेच्या लढाई पायी बौद्ध समाजाच्या राजकीय हक्कांचा बळी देऊ नका. सन्माननीय माजी खासदार आपण कायम बौद्ध समाजाच्या सोबत राहू असं आश्वासन दिलेले असताना सचिन कांबळे (पाटील?) यांची आपण जाहीर केलेली उमेदवारी हे वागणे दुटप्पीपणाचे नाही का? बौद्ध उमेदवाराला या तालुक्याचे नेतृत्व करण्याची संधी एखादा तरी देऊन पहा…! निवडून आल्यानंतर बौद्ध आमदार आपल्या मार्गदर्शनाखाली तालुक्याच्या विधायक विकास साठी कायम प्रयत्नशील राहील.बौद्ध समाज कायम आपल्या सोबत राहील.येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्येही पूर्ण ताकतीनिशी बौद्ध समाज आपल्या पाठीशी खंबीर राहील.