(जावली/ अजिंक्य आढाव) – नेमकं व्हायचं तेच होण्याचे चिन्ह दिसत आहे. हे प्रस्थापित पक्ष कधीच आंबेडकरी समाजातील बौद्ध आमदार करणार नाहीत.याची खात्री बाळगा आंबेडकरी विचारांना प्रेरित झालेला बौद्ध समाज हा एकटं पाडण्याच्या दृष्टीने प्रस्थापित राजकारणी कायम प्रयत्न करत आले आहेत. समाजातील होतकरू, अभ्यासू व काहीतरी करण्याची उमेद दाखवणारा उमेदवार ते अगदी ग्रामपंचायतीच्या सदस्यांपासून ते खासदारकीच्या पर्यंत कधीच देणार नाहीत.फलटणचे राजकारण दिसते इतके सोपे व सरळ नाही. सर्वच प्रस्थापित पक्षांच्या प्रमुखांच्या भेटी घेऊन बौद्ध आमदार देण्याविषयी विनंती करूनही त्या विनंतीची दखल घेतली गेली असे दिसत नाही. किंबहुना त्याविषयी पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्याचेही ऐकवत नाही. कोणताही पक्षाचा उमेदवार निवडून आणायचं म्हटलं की बेरजेचं गणित करावं लागतं. त्यासाठी मतांची जुळवा जुळवा आलीच. एका बाजूला सामान्य माणसांच्या हातातून निवडणुका बाजूला जात असताना निवडणूक जिंकून येण्यासाठी लागणारी आर्थिक तरतूद कुठून केली जाईल? हा ही प्रश्न आहेच परंतु सर्वच निवडणुका या पैशावर लढवता येतात असं नाही. त्यासाठी स्वच्छ प्रतिमा, पारदर्शक कारभार व व्हिजन व मिशन यांचं उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या उमेदवाराचा प्रभाव सुद्धा निश्चित पडत असतो.
फलटणचा बौद्ध समाज हा बौद्ध उमेदवाराला प्रस्थापित पक्षांची उमेदवारी मिळेल या भोळ्या भाबड्या आशेवर आजही लक्ष ठेवून आहे. पण प्रत्यक्षात मात्र कोणत्याही प्रस्थापित पक्षाकडून तसे कुठलेही चिन्ह दिसत नाही. माजी खासदार म्हणतायेत, ‘काहीही झालं तरी मी बौद्ध समाजा सोबतच आहे.त्यांच्या या म्हणण्याला काहीच अर्थ नाही. तुम्ही जर प्रामाणिकपणे बौद्ध समाजासोबत असता तर तुम्ही सचिन कांबळे या व्यक्तीला उमेदवारी देण्याविषयी अधिकारवाणीने बोललाच नसता. सदर उमेदवाराचे कुटुंबीय हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले आहेत हेही सांगायला आपण विसरला नाही. त्यामुळे तुमच्या विधानाला कोणताही अर्थ नाही किंवा त्यावर विश्वास ठेवल्या इतपत बौद्ध समाज मूर्ख नाही. हेही माजी खासदारांनी लक्षात ठेवावे. दुसऱ्या बाजूला नेहमीसारखीच दुटप्पी भूमिका घेऊन विधान परिषदेचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर हे दोन्ही डगरीवर हात ठेवून आहेत. खऱ्या अर्थाने जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सक्रिय असलेल्या आपल्या बंधूंना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासोबत पाठवून आपल्या अस्तित्वाची शेवटची लढाई ते लढत आहेत. यात त्यांची तरुण पिढी ही कंबर कसून उतरली असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटात कार्यकर्त्यांसमवेत प्रवेश केला आहे. लोकसभेसारखी गणित जुळून आली तर कोणी काहीही केलं तरी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) गटातर्फे दीपक चव्हाण हेच आमदार म्हणून निवडून येतील यात तिळमात्र शंका नाही. प्रस्थापित पक्ष कधीही बौद्ध समाजातील व्यक्तीला स्वीकारत नाहीत. किंबहुना बौद्ध समाजाच्या व्यक्तीवर त्यांचा विश्वास ही नाही. अनुसूचित जाती जमातींवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ॲट्रॉसिटी कायद्याचा उघड उघड विरोध हेच प्रस्थापित पक्ष करत असतात. ते बौद्ध समाजाचा किंवा अनुसूचित जाती – जमातीतील फुले, शाहू, आंबेडकर विचारधारेतील होतकरू, लायक, उच्चशिक्षित व अभ्यासू उमेदवार कसा स्वीकारतील? ज्या व्यवस्थेने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना कधीही निवडून येऊ दिलं नाही. ज्या व्यवस्थेने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज असणाऱ्या श्रद्धेय ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांना हरवण्यासाठी सर्व प्रस्थापित पक्ष एकत्र ताकत लावून अकोल्यामध्ये त्यांचा पराभव करतात. ते प्रस्थापित पक्ष बौद्ध समाजाचा उमेदवार कसा देतील..?
या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून फलटण तालुक्यातील बौद्ध समाज जागृत झाला ही समाजाच्या पुढच्या लढाईसाठी जमेची बाजू आहे.आपलं अस्तित्व दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून कधीच सिद्ध करता येणार नाही. त्यासाठी बौद्ध समाजाने पराभवाची चिंता मनात न ठेवता आपला लढा, आपला संघर्ष हा शेवटपर्यंत चालू ठेवण्याची गरज आहे. ही लढाई क्रांती प्रतिक्रांतीची लढाई आहे. हे समजून समाज एकजूट करून हीच ताकद फक्त निवडणुकीपुरती न वापरता सर्वच अन्याय-अत्याचाराच्या घटना, आनंदाचे, दुःखाचे क्षण, समाजातील होतकरू उच्चशिक्षित विद्यार्थ्यांनी माऱ्याच्या व मोक्याच्या जागा पटकवल्या तर त्या विद्यार्थ्यांच्या सोबत राहून त्यांचे अभिनंदन करून बौद्ध समाजाची ताकद एकवटली पाहिजे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला व दिलेला संदेश आजही आपल्याला तंतोतंत पाळण्याची गरज आहे. तो संदेश म्हणजे शिका, संघटित व्हा व संघर्ष करा! आज त्याचीच गरज आहे.
विधानसभेच्या निवडणुकीपुरतं बोलायचं झालं तर बौद्ध समाजाने कुठल्याही प्रस्थापित पक्षाचा विचार न करता आपला उमेदवार देऊन त्याच्या प्रचाराची धुरा समाजातील सर्वच कार्यकर्त्यांनी समर्थपणे सांभाळून तन-मन धनाने जनतेपर्यंत आपल्या तालुक्याच्या विकासाचं मॉडेल घेऊन सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. सत्तेच्या आणि विकासाच्या चाव्या ज्या प्रस्थापित पक्षांच्या नेत्यांच्या व पुढार्यांच्या हातात आहेत त्यांच्याशी लढा देण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. ती ही तयारी बौद्ध समाजाच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना ठेवावी लागेल. दुसरा पर्याय म्हणजे श्रद्धेय ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांना भेटून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उमेदवारी मिळवून ही विधानसभेची निवडणूक लढवावी हाही पर्याय आपल्यासाठी एक पर्याय खुला आहे.
निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारी अर्ज विक्री सुरु झाली असून अजूनही २५५ फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा आमदार कोण असेल याविषयी स्पष्टता दिसून येत नाही. प्रमुख दोन्ही राजकीय गटांनी/पक्षांनी आपले पत्ते अजून खोललेले नाहीत. बौद्ध समाज मात्र एकच निर्धार बौद्ध आमदार यावर ठाम असून आता त्यांच्यातही अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र आहे. प्रस्थापित पक्षांनी सुद्धा जे असेल ते चित्र स्पष्ट करून आपले उमेदवार निश्चित करावेत. शेवटी चेंडू हा जनतेचा कोर्टात जाणार आहे. जनता जनार्दन ज्यांना निवडून देईल तोच 255 फलटण विधानसभा मतदारसंघाचे विधानसभेमध्ये नेतृत्व करेल. ही लढाई फलटणच्या विधायक विकासाचे नसून दोन निंबाळकरांच्या स्वअस्तित्वाची लढाई असल्यामुळे इथल्या बौद्ध समाजावर अन्याय होतो की काय हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे बौद्ध समाजातही प्रचंड प्रमाणात रोष आणि अस्वस्थता दिसून येत आहे. प्रस्थापित पक्षांनी ही व नेत्यांनी ही विचार करायला हवा. गेल्या पंधरा वर्षे एका जातीला प्रतिनिधित्व देत आपण आले आहात. शेवटची संधी बौद्ध समाजातील व्यक्तीला देण्याची नैसर्गिक न्याय मागणी असतानाही त्याला डावलण्याचा प्रकार होत आहे. हे न्याय आणि नीतीला धरून नाही. आज अनुसूचित जाती प्रवर्गातील इतर ५८ जातींपेक्षा बौद्ध समाजात अभ्यासू , उच्चशिक्षित, विधायक विकासाचा व्हिजन व मिशन असणारे खूप उमेदवार असताना का जनतेच्या, बौद्ध समाजाच्या मागणीकडे कानाडोळा केला जातोय?
यावेळी बौद्ध समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले तर येणाऱ्या जिल्हा परिषद,पंचायत समिती व नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये बौद्ध समाज याचा वाचपा काढल्याशिवाय राहणार नाही. हेही प्रस्थापित पक्षांनी व नेत्यांनी लक्षात ठेवावे. बौद्ध समाज आतापर्यंत तुमच्याच सोबत खांद्याला खांदा लावून तुम्हाला निवडून आणत आला आहे. बौद्ध समाजासाठी ही शेवटची संधी आहे. तेव्हा तुम्हीही मोठे उदार मन करून बौद्ध समाजातला होतकरू, लायक उमेदवार देऊन फलटणच्या विधायक विकासासाठी प्रयत्नशील राहायला पाहिजे. फलटण ची संविधान समर्थन समिती अजूनही आपला संयम बाळगून शांत आहे. ती अजूनही प्रस्थापित पक्ष व नेत्यांच्याकडे आस लावून बसलेले आहे. संविधान समर्थन समितीचा अंत पाहू नका. अजूनही समिती विवेकी विचारानं आपल्या अस्तित्वासाठी आपल्या न्याय हक्कांसाठी रास्त मागणी घेऊन योग्य प्रकारे आपला लढा देत आहे. तेव्हा प्रस्थापित पक्षांनी व नेत्यांनी याचा जरूर विचार करावा.