आपला जिल्हा
सातारा पोलीस व परिवहन विभाग बेकायदेशीर ‘महाराष्ट्र शासनाच्या’ चारचाकी वाहनांवर कारवाई करणार का.?
(फलटण/ प्रतिनिधी):- पुण्यात तथाकथित पूजा खेडकर या त्यांच्या खासगी महागड्या वाहनावर ‘महाराष्ट्र शासन’ अशी पाटी लावून मिरवत असल्याचे प्रकरण राज्यातच नव्हे तर देशभरात गाजते आहे. असे असतानाही सातारा जिल्ह्यातही महागड्या चारचाकी वाहनांवर ‘भारत सरकार’, ‘महाराष्ट्र शासन’,अशा पाट्या वाहनाच्या दर्शनी भागावर व ‘लाल दिवा’ लावून ही वाहने जिल्ह्यात मिरवली जात आहेत.
विशेषतः शासकीय अधिकारी- कर्मचाऱ्यांकडूनही कायदा धाब्यावर बसवून असे कृत्य केले जात असताना मात्र ज्यांच्यावर कारवाईची जबाबदारी आहे, ते प्रादेशिक परिवहन विभाग आणि सातारा पोलिसांनी मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याची गंभीर बाब यानिमित्ताने समोर आली आहे. विशेषतः सातारा जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातच अशा पाट्या लावलेली खासगी वाहने असतात हेही विशेषच.शहरातील दुचाकी, चारचाकी वाहनांच्या नंबर प्लेट या फॅन्सी प्रकारातील असतात. तर काही क्रमांक हे नामसदृश करण्याचा प्रयत्न केला गेलेला असतो. परंतु अलीकडे नवीनच क्रेझ आली आहे. अतिशय महागड्या अशा गाड्यांवर ‘भारत सरकार’, ‘महाराष्ट्र शासन’, ‘न्यायाधीश’ अशी नावे असलेल्या पाट्या कार चालकासमोरील दर्शनी भागावर ठेवलेल्या असतात. तर काही वाहनांवर समोरील बोनेटवर आणि पाठीमागील काचेवरही ‘भारत सरकार’, ‘महाराष्ट्र शासन’ असेही लाल रंगाच्या अक्षरात ठळकपणे लिहिलेले असते.
प्रत्यक्षात, मोटार वाहन कायद्यानुसार कोणत्याही खासगी वाहनांवर शासकीय नावाची पाटी वापरण्यास सक्त मनाई आहे. एवढेच नव्हे तर अशा वाहनांवर कडक कारवाई करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेशही आहेत. मात्र, असे असतानाही शहरात अशा पाट्या लावून शेकडो वाहने फिरत असतात. याकडे ना सातारा पोलीसांच्या वाहतूक शाखेचे लक्ष नाही आणिप्रादेशिक परिवहन विभागाकडून कोणतीही कारवाई होत नाही.परिणामी अशा पाट्या लावण्याचे धाडस दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे.
सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना सरकारी वाहने उपलब्ध करून देत असली तरी काही कर्मचारी व त्यांच्या नातेवाईकांकडून खासगी वाहनांवर सरकारी नावाच्या पाट्यांचा सर्रास दुरुपयोग होताना सध्या पाहायला मिळत असून, परिवहन विभाग व सातारा पोलीस प्रशासनाने यावर योग्य पाऊले उचलायला हवीत, अशी सामान्य लोकांची अपेक्षा आहे.
अनेक खासगी वाहनांवर ‘महाराष्ट्र शासन’ नाव लिहिलेल्या पाट्यांचा वापर काही अधिकारी, कर्मचारी तसेच त्यांच्या नातेवाईकांकडून खासगी वाहनात सर्रास करत असतात, यामुळे बऱ्याचदा टोलनाके, सार्वजनिक पार्किंग किंवा इतर ठिकाणी वाद उद्भवतात. प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर देखील याचा अवैध वापर वाढला आहे.
सरकारने सरकारी वाहने पुरवून देखील सरकारी अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून सातारा जिल्ह्यात खासगी वाहनांचा वापर सरकारी वाहन म्हणून केला जातो. यासाठी अनधिकृत पाट्या, लोगो यांचा वापर वाढला आहे. अशा वाहनांवर कायदेशीर कारवाई करून चाप बसावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना ओळखपत्र पुरविले असताना देखील वाहनांवर अनधिकृत पाट्या लावण्याचे प्रमाण वाढले आहे. गुन्हेगारांकडून देखील या नावाच्या पाट्यांचा वापर होण्याची शक्यता असते, यामुळे परिवहन विभाग व पोलिस प्रशासनाने यावर कठोर कारवाई करून अनधिकृत पाट्यांचा होणारा वापर थांबवावा.
चारचाकी वाहनांवर अधिकारी व कर्मचारी ‘महाराष्ट्र शासन’ असे लिहितात. राजमुद्रेचा लोगो असलेले स्टीकर लावतात. अनेकदा अधिकारी यांच्या व्यतिरिक्त त्यांच्या नातेवाईकांकडून महाराष्ट्र शासन नावाचा व राजमुद्रेचा गैरवापर केल्याचे प्रकार घडलेले आहेत. अशा प्रकारे ‘महाराष्ट्र शासन’ पाटी लावून खासगी वाहन चालवित असल्याबाबत उच्च न्यायालयानेही नाराजी व्यक्त केली आहे.
तसेच संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत. सर्व नागरिकांना समान कायदा या तत्त्वानुसार महाराष्ट्र शासन सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचारी यांच्याकडून कायद्याचे उल्लंघन करणे, हे महाराष्ट्र शासनाची प्रतिमा मलीन करण्यासारखे आहे. अशा प्रकारे ‘महाराष्ट्र शासन’ पाटी लावलेली वाहने नाकाबंदी व सुरक्षा तपासणी न होता सोडतात. महाराष्ट्र शासन पाटीचा गैर उपयोग होऊन नागरिकांच्या जीवाला धोका होऊ शकतो.
महागड्या गाड्यांवर पाट्या कशा..?
शासकीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी असलेली वाहने ही इनोव्हा प्रकारातील तर उर्वरित अधिकाऱ्यांसाठी बोलेरो, इर्टिका, स्कॉर्पिओ आणि सुमो या प्रकारातील असतात. परंतु ज्या खासगी वाहनांवर अशा नावांच्या पाट्या आढळून आल्या, त्यात फॉर्च्यूनर, ऑडी, इनोव्हा, ग्लोस्टर, एक्सयुव्ही, डिझायर, होंडासिटी अशा महागड्या गाड्यांचा समावेश आहे. ही वाहने शासकीय नसल्याचेही आढळून आलेले आहे.
नातलगांची दबंगगिरी..!