हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

प्रस्थापित पक्ष आणि त्यांच्या नेतृत्वाचा सावध पावित्रा : बौद्ध आमदार परवडेल की वरचढ होईल..?

(फलटण/ प्रतिनिधी)आपण सर्वजण प्रामाणिकपणे बौद्ध आमदार असावा यासाठी प्रयत्नशील आहोत. आणि असलंही पाहिजे. तो आपला अधिकार आहे. सर्व प्रस्थापित पक्षांच्या नेत्यांना आपण भेटून केलेल्या विनंतीचा विचार तितकाच गांभीर्याने केला जात आहे असं तरी चित्र आता तरी दिसत नाही.

पण एवढं मात्र निश्चित आहे जिंकण्यासाठी आपल्या मतांची गरज आहे. त्यामुळे आपल्याला नजर अंदाज करणं हे प्रस्थापित पक्षांना परवडणार नाही. प्रस्थापित व्यवस्थेमध्ये कायमच पूर्वाश्रमीचा महार समाज व आताचा बौद्ध समाज हा वंचित व दुर्लक्षित ठेवण्याचा प्रकार सर्वच राजकीय पक्ष करत आले आहेत. आपली ताकद आपण दाखवली हेही काही कमी नाही. परंतु याच पक्षांची उमेदवारी मिळवणं आणि विजयश्री खेचून आणणे हे तितकसं सोपं दिसत नाही. वरकरणी आपल्याला पाठिंबा दर्शवणारे लोक आतून मात्र अजूनही तितकेसे मोकळे आणि आपल्याला स्वीकारण्या योग्य झालेले नाहीत.

प्रस्थापित पक्ष हे सर्व हालचालींवर लक्ष ठेवून आहेत ते अजूनही आपले पत्ते खुले करायला तयार नाहीत. ते अभ्यास करत आहेत बौद्ध समाजाचा उमेदवार देऊन आपल्याला विजय मिळवणं व पुढील काळात याचा आपल्या राजकारणाला उपयोग होईल का? हे चाचपून पाहत आहेत. निवडून आलेला उमेदवार आपल्याला डोईजड तर होणार नाही ना याचा विचार 100% त्यांच्या मनात आजही आहे. या समाजाला बाजूला ठेवून इतर पर्याय विचारात घेऊन आपल्याला विजय मिळवता येईल का हाही विचार सर्वच प्रस्थापित राजकीय पक्ष करत आहेत. वंचित, शोषित, उपेक्षित समाजातील कोणतेही नवीन संघटन व नेतृत्व उभे राहिलेले कोणत्याही प्रस्थापित पक्षाला सहजासहजी पचनी पडत नाही. ते संघटन कसं विस्थापित होईल यासाठी हस्ते पर हस्ते ते प्रयत्न करत असतात. तेव्हा आपण निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर जर ठाम असू तर यश अपयश याचा विचार न करता आपल्या परीने आपण कामाला लागणं गरजेचं आहे. प्रस्थापित राजकीय पक्षांसारखा आर्थिक निधी आपल्याकडे नाही. त्यामुळे संघटन शक्ती व फुले, शाहू, आंबेडकर व सर्वच महापुरुषांचे विचार घेऊन आपल्याला संघर्ष करावयाचा आहे. सर्वच पातळ्यांवर आर्थिक निधी हा परिणाम करतो असं माझं मुळीच मत नाही. पण आजच्या समाजव्यवस्थेमध्ये काही लोकांना त्याची सवय लागली आहे. ते समाज उपयोगी अनेक गोष्टींची मागणी करतात. काही नेते मोठी आर्थिक मदत मागतात. हेही सत्य आहे. ते आम्ही निवडणुकीच्या दरम्यान पाहिले आहे. लोकांना निधी देण्यासाठी, इतर खर्चासाठी त्या त्या मतदारसंघाला प्रस्थापित पक्ष निधी राखून ठेवत असतात आणि तो देत असतात. आपल्याकडे अशा स्वरूपाचा कोणताही निधी उपलब्ध नाही. तेव्हा प्रस्थापित पक्षांच्या भरोशावर बसण्यापेक्षा त्यांनी उमेदवारी दिली तर उत्तम नाही दिली तर आपण स्वतः निवडणूक लढवण्याच्या तयारीला लागणे गरजेचे आहे. कोणताही राजकीय पक्ष हा सहजासहजी आपल्याला जवळ करायला तयार होत नाही. त्याची कारणही आहेत. आपला माणूस हा कधीही दुसऱ्याच्या डोक्याने चालत नाही. तो स्वतंत्र अस्तित्व व विचार ठेवून असतो. त्यामुळे चांगलं, वाईट व विधायक विकासाचं काम त्याला माहीत असतं.तेव्हा जे होईल ते होईल तयारीला लागले पाहिजे असे वाटते. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागेल व निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल तेव्हा लढायचं आणि जिंकायचं हा विचार डोक्यात घेऊन पुढे जायला पाहिजे. अनेक वर्ष नेतृत्व केलेल्या प्रस्थापित नेतृत्वाला सुद्धा लोकांनी घरी बसवलेले आहे.तेव्हा जनता काय निर्णय देईल हे आपण आता सांगू शकत नाही.तेव्हा तयारीला लागू या. यश येवो आगर न येवो संघर्षातूनच निर्माण उभे राहत असते.तेव्हा लढायला कायम तयार राहिलं पाहिजे. इथल्या व्यवस्थेने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा पराभव केला आहे. म्हणून ते खचून गेले नाहीत. त्यांचाच वारसा आपण पुढे घेऊन जात आहोत.तेव्हा तयारीला लागू या. सर्वांना सोबत घेऊन निकराची लढाई लढू या…!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!