राजकीय
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दि. २५ रोजी फलटण येथे बौद्ध समाजाच्या वतीने महामेळाव्याचे आयोजन
(फलटण/ प्रतिनिधी) – २५५ फलटण – कोरेगांव हा २००९ मध्ये नव्याने निर्माण झालेल्या राखीव विधानसभा मतदारसंघात अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या बौध्द समाजातील घटकाला गेल्या तीन विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाली नसल्याची समाजात खंत निर्माण झाल्याने व आपणास डावलले जात असल्याची भावना निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणूकीत बौध्द समाजाला उमेदवारी मिळावी यासाठी अवघ्या फलटण -कोरेगांव विधानसभा मतदारसंघातील बौध्दांनी ” एकच निर्धार …बौद्ध आमदार ‘ अशी प्रतिज्ञा घेत तालुक्यात संवाद अभियान सुरू केले आहे. या संवाद अभियानास फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर बौद्ध समाजातील बांधवांची राजकीय मोठ बांधण्यासाठी फलटण येथे बौद्ध समाजाच्या महामेळाचे आयोजन रविवार दि. 25 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, फलटण याठिकाणी करण्यात आले आहे.
शाहीर शीतल साठे व सचिन माळी यांचा भीम गीतांचा कार्यक्रम यावेळी होणार आहे. त्याचबरोबर नवोदित गायक, संगीतकार व गीतकार सागर भोसले हे आपले गाणे यावेळी सादर करणार आहेत.
फलटण – कोरेगाव मतदार संघातील ग्रामीण भागातील गांवा गांवात संवाद अभियानापुर्वी शहर व तालुक्यातील सामाजिक, राजकीय,शैक्षणिक, कला, क्रीडा, साहित्य, सांस्कृतिक, कृषी, सहकार, पत्रकारिता क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी यांची बैठक झाली या बैठकीत एकच निर्धार … बौध्द आमदार ” या संकल्पनेचा नारा देण्यात आला यातुन शहर व ग्रामीण भागात लोकसंवाद, गांव भेट कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता.
फलटण – कोरेगांव विधानसभा मतदारसंघातील बौध्द समाज बांधवांचा महामेळावा आयोजीत करण्यात आला आहे. या महामेळाव्यात फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघातील बौद्ध बांधव मोठया संख्येने उपस्थित राहणार आहे. त्यामुळे या मेळाव्याकडे अनेक राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे.