हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

“एकच निर्धार बौद्ध आमदार ” राजकारणातून एखाद्या समाजाला सदासर्वकाळ बहिष्कृत करता येणार नाही – सोमीनाथ घोरपडे

(फलटण/ प्रतिनिधी)- अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या २५५ फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे सलग राष्ट्रवादी कॉंग्रेस(अजितदादा पवार गट) चे नेतृत्व विद्यमान आमदार दीपकराव चव्हाण करत आहेत.त्यांना राजेगटाचे म्हणजेच रामराजे नाईक निंबाळकर यांचे पाठबळ असून त्यांच्याच आशिर्वादाने ते सलग तीन वेळा या विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व करत आहेत.गेल्या काही दिवसापासून किंबहुना मागील १० वर्षांपासून बौद्ध समाजाचा आमदार या विधानसभा मतदार संघातून निवडून यावा अशी बौद्ध समाजाची मागणी होती आणि मनोमन इच्छा ही होती.त्यामुळे अगदी राजकीय व्यासपीठावर व खाजगीत ही बौद्ध समाजाचे नेते, कार्यकर्ते आपली भावना बोलून दाखवत होते.पण सर्वच नेते, कार्यकर्ते हे याच प्रस्थापित पक्षांच्या दावणीला बांधले गेले होते.त्यामुळे ते या व्यवस्थेविरुध्द द्रोह करतील याची सुतराम शक्यता नव्हती.यातील काही लोकांना नगरसेवक,काही लोकांना स्वतःला व त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत, नोकऱ्यांसाठी, उद्योग व व्यवसायांसाठी कर्ज, नगरपालिकेच्या कामात कंत्राट, नोकऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या विविध समित्यावर नेमणुका देण्यात आल्या होत्या.त्यामुळे त्यांची तोंडे बंद करण्यात आली होती.पण किती दिवस या बौद्ध समाजाला बांधून ठेवणार कारण हा समाज फुले, शाहू व आंबेडकर यांची विचारधारा मानणारा आणि त्यांच्याच विचारांचा आदर्श घेऊन स्वाभिमानाने जगणारा असल्याने तो विद्रोह करणारच होता.त्याची मुहूर्तमेढ याच मंगळवार पेठेतील जुन्या, जेष्ठ नेते व कार्यकर्ते यांनी आपल्यातला स्वाभिमान जागृत केला. त्याला मंगळवार पेठेतील उद्याच्या आंबेडकरी समाजाच्या नव्या दमाच्या कार्यकर्त्यांनी साद घातली आणि राजकीय भट्टी जमायला सुरवात झाली.त्यांनी एकाच निर्धार केला आणि तो म्हणजे पक्ष कोणताही असो येणारा २०२४ च्या विधान सभा निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या २५५ फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघाचा आमदार हा आंबेडकरी विचारांचा बौद्ध आमदार करण्याचा निर्धार केला असून सध्या जनसंपर्क व त्यामाध्यमातून समाज बांधवांशी संवाद सुरु केला असून त्याला उत्स्पुर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे येणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या विधान सभा निवडणुकीत प्रस्थापित पक्षांची कोंडी होणार हे निश्चित आहे.

अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये समाविष्ट असलेल्या ५९ जातींपैकी पूर्वाश्रमीचे महार व आताचे बौद्ध समाजाची इतर ५८ अनुसूचित जातींच्या लोकसंख्येपेक्षा या मतदारसंघांमध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असताना प्रस्थापित राजकारण्यांनी कायमच महार जातीच्या किंवा बौद्ध समाजाच्या व्यक्तीला राजकारणातून बहिष्कृत करण्याचं काम केले आहे.याला कोणताही प्रस्थापित पक्ष अपवाद नाही.अनुसूचित जाती – जमातींच्या न्याय हक्कांसाठी होणाऱ्या सर्व आंदोलनामध्ये बौद्ध समाज सर्वात पुढे आघाडीवर असतो. मग तो आरक्षणाचा प्रश्न असो, अनुसूचित जाती-जमाती मधील व्यक्तींच्या वर त्यांच्या कुटुंबांवर सामुहिक हल्ले असो, किंवा त्यांच्यावर झालेल्या अमानुष अत्याचाराची घटना असो, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न असो, दलित स्त्रियांच्यावर केलेल्या अत्याचाराच्या घटना,हत्याकांड असो बौद्ध समाज हा सर्वात पुढे असून तो कायमच अन्यायाविरुद्ध संघर्ष करत असतो. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या शिका, संघटित व्हा व संघर्ष करा या तत्त्वांचा आधार घेऊन आज तो माऱ्याच्या किंवा मोक्याच्या जागा पटकावत असताना राजकारणामध्ये आपल्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी कायम सज्ज आहे. परंतु प्रस्थापित यंत्रणेला, प्रस्थापित पक्षांना मात्र स्वतःच्या विचार, बुद्धी, न्याय नीतीचा विचार करून संविधानिक पद्धतीने राज्यकारभार करणारा लायक उमेदवार नको असतो. त्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे कटपुतली सारखा नाचणारा,उठ म्हटले की उठणारा व बस म्हटले की बसणारा उमेदवार लागतो.त्यांच्या दुर्दैवाने बौद्ध समाजातील अशी व्यक्ती त्यांना सहसा मिळत नाही.आणि मिळाली तर त्याच्यावर त्यांना विश्वास वाटत नाही. बौद्ध समाजातील व्यक्ती आपल्या न्यायी हक्कांविषयी जागृत असते.ती व्यक्ती अन्यायाचा प्रतिकार करते.म्हणून बौद्ध समाजातील म्हणजेच पूर्वाश्रमीचे महार समाजातील व्यक्तीला राजकारणातून बहिष्कृत केले जाते.

फलटण मधील जुन्या जाणत्या सर्व कार्यकर्त्यांनी आता एकच निर्धार केला आहे. तो म्हणजे, एकच निर्धार व आंबेडकरी विचारांचा बौद्ध आमदार हा निर्धार पूर्णत्वास जाण्यासाठी असणारा मार्ग खडतर आहे पण ज्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आहे त्यांच्यासाठी हा कठीण ही नाही.अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या २५५ फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघातून बौद्ध समाजातील व्यक्ती निवडून आणण्यासाठी इतर समाजाची मदत व पाठबळ लागणार आहे.ते जुळवणे आवश्यक आहे.तसेच सर्वच प्रस्थापित पक्ष या सर्व गोष्टींकडे कसे पाहतात यावर ही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहे.महाराष्ट्रामध्ये २०१९ मध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी राज्यामध्ये २९ जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित केल्या होत्या. या २९ जागांमधून फक्त ९ जागेवर बौद्ध समाजाचे उमेदवार निवडून आले.त्यापैकी धारावी मधून वर्षा गायकवाड तर नागपूर उत्तर मधून नितीन राऊत यांची जास्त चर्चा झाली.बाकी मात्र असून नसल्यासारखेच अस्तित्व हीन होते.यामध्ये चर्मकार व मातंग समाजाचे ही आमदार होते.पण ते ही आपल्या प्रस्थापित पक्षाच्या विचारधारेला घट्ट पकडून त्यांच्या मर्जी सांभाळण्यात व्यस्त होते.मागील २०१४ च्या विधान सभा निवडणुकीत फलटण मधील सर्वच राजकीय पक्षांच्या प्रस्थापित नेत्यांनी एक पत्रक फिरवले होते ते पत्रक मी ज्यांच्या घरी पाहिले ते आज ह्यात नाहीत.त्यात स्पष्ट असे म्हटले होते की, २५५ फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघाचा उमेदवार देताना तो कोणत्याही समाजाचा द्या.पण बौद्ध समाजातील म्हणजेच पूर्वाश्रमीचे महार समाजातील व्यक्तीला अजिबात देऊ नका असे म्हटले होते आणि त्यावर अनेक नेत्यांच्या सह्या ही केलेल्या होत्या.त्यामुळे राजकारणातून एखाद्या समाजाला बहिष्कृत का केले जाते?हा प्रश्न आजही मनात कायम आहे.त्यामुळे येत्या काळात राजकीय पक्षांच्या भूमिकेकडे लक्ष द्यावे लागेल.जुन्या व नव्या कार्यकर्त्यांनी आपल्यातील संयम ठेवून आपण कोणत्या कारणाने एकत्र आलोय आणि आपल्या सर्वांचे ध्येय सदैव डोळ्यासमोर ठेवले पाहिजे.प्रस्थापित पक्षाने आपला उमेदवार देऊ अथवा न देवो आपण आपला सर्व समावेशक उमेदवार तयार असली पाहिजे.मतदार याद्या व एकूण मतदार किती? तालुक्यातील प्रत्येक गावातील अडचण, समस्या काय आहेत, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.अनुसूचित जातीत येणाऱ्या आपल्या इतर समज बांधवाना सोबत घ्यावे लागेल. त्यात मातंग, व्होलार, चर्मकार, भटके विमुक्त जाती/जमाती, मुस्लिम,अल्प अल्पसंख्यांक समाज बांधव यांच्याशी ही संपर्क करावा लागेल.आपला निर्धार व तालुक्याच्या विकासासाठीचा स्पष्ट आराखडा तयार करून या विधानसभा श्रेत्रातील सर्व जाती, धर्म, पंथांच्या मतदारापर्यंत पोहोचवावा लागेल. बौद्ध समाजातील जेष्ठ व तरुण नेते कार्यकर्त्यांनी आपला निर्धार व ध्येय यापासून मागे हटता काम नये.त्यांना इथल्या प्रस्थापित व्यवस्थेशी लढाई करायची आहे. बौद्ध समाजातील समाजाचे सरपंच,ग्रामपंचायत समिती सदस्य,विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे पदाधिकारी यांनी आपल्या माध्यमातून जन जागृती करून इतर समाजाला आपला हेतू व संकल्प समजून सांगावा लागेल.नुसत्या बौद्ध समाजाच्या मतांवर ही निवडणूक जिंकता येणार नाही.हे ही लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
प्रस्थापित पक्ष या सर्व घटनेकडे कसा पाहतोय कदचीत सर्व कार्यकर्त्यांमध्ये फुट पडण्याचा प्रयत्न होईल.तेव्हा सावधान आताच आपण मनाशी खुणगाठ बांधणे आवश्यक आहे.जुन्या जेष्ठ कार्यकर्त्यांना सोबत घेऊन तरुणाई समाजाचे नेतृत्व करत आहे ही आनंदाची गोष्ट आहे.एरवी एकमेकांना वेगवेगळ्या वैचारिक भूमिकेमुळे उणेधुणे काढणारे हे सर्व जुने व नवे कार्यकर्ते नेते एकत्र आल्याने तालुक्यातील समाजामध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.प्रत्येकजण बोलताना वागताना एकमेकांचा विचार करत असून या सर्वांचे कौतुक करेल एवढे थोडेच आहे.पण गाफील राहू नका. प्रस्थापित पक्ष एवढे उदारमतवादी आहेत.असे समजू नका.आपला लढा हा न्यायी हक्कांसाठी आणि आपल्या अधिकारासाठी असून प्रत्येक गावातील लोकांच्या डोळ्यात आशेचा किरण दिसत आहे.तेव्हा सर्वाना मंगलमय शुभेच्छा!

श्री.सोमीनाथ पोपट घोरपडे ,सामाजिक कार्यकर्ता
मु.पो सासकल ता.फलटण जि.सातारा
मो.नं 7387145407
ईमेल : bhimai05@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!